सोमवार, ३ सप्टेंबर, २०१८

आनंदअनुकार



आनंद अनुकार

भरून आलेल्या
गच्च आभाळातील
चार थेंब आहेत
माझ्या कविता

गरज नाही त्यांनी
कुण्या झाडांची
कुण्या मानवाची
अथवा प्राण्यांची
तहान भागवायची

वातावरणातील
सूक्ष्म जलकणिकांचे
इवलेसे संघटन होऊन
ओघळते जीवन
त्यांचे ते होणे
ते अवतरणे
अन् हरवणे
किती अभूतपूर्व असते

अन् शेवटी
अशा हजारो शब्दात
लाखो ओळीत
स्वत:ला सोपवून देणे
निरासक्त निर्लेप होत :
ज्ञानदेवांच्या मराठीशी
तुकोबांच्या मातीशी
स्वतःचे नाते सांगत
हा माझ्यात उमटणारा
सर्वात मोठा
आनंदाचा अनुकार आहे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २ सप्टेंबर, २०१८

सावली




सावली
********

येते आकाश भरून
भय मनात दाटून
दत्त स्मृतिची सावली
मन घेतसे ओढून

तोच घडवितो सारे
जन्म जीवन मरण
माझ्या श्वासाचे गणित
दिले त्यांनीच आखून

कसे सांगू मी तयाला
काही पुढती ढकल
गाठ प्रारब्धाची अन   
थोडी तरी रे उकल

कृपा एवढीच मागे
भेट द्यावी लवकर
सार्‍या मागण्यांचा अन
अंत एकदाच कर

मग यावीत येणारी  
सुख दु:खाची वादळे
तया प्रेमात स्वीकार
दारी चांदणे निखारे

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

मोहात मासोळी



मोहात मासोळी
*********

मोहाच्या डोहात
उनाड मासोळी
खेळते आंधळी
कोशंबीर 

धावते थांबते
माघारी फिरते
गळास जाणते
नाकारून

रुपेरी नाजूक
सुरेख सुंदर
होऊन उदार
घाबरट

जाऊन खोलात
बसते रडत
अमिषा स्मरत
आपुलिया

कोसते देवाला
कोसते मनाला
कशाला आणला
प्रसंग हा

आमिषा ठाव ना
आमिष आहे तो
दोरा न जाणतो
अदृष्य श्या

तरंगी डोलतो
रंगांत खुलतो
गंधात झिंगतो
उगाचच

मासोळी साठीच 
जन्म की त्यास
आणखी कशास
जाणतो ना

खेळ हा चालला
जीवास गाठतो
आणिक गिळतो
पुन्हा पुन्हा

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

कुपी


कुपी

तुझ्या आठवणी
धुकट धुसर
परी खोलवर
रुतलेल्या

तुजसी बोलणे
नव्हते घडले
अंतर मिटले
पावुलांचे

तुझे पाहणे
उरात घुसणे
अजून जगणे
काहि तिथे

कितीदा लिहिले
नाव वहीवर
परी ना धजले
ओठ कधी

उलटून गेली
तीन तपे अन्
आले वाहून
दूर  जीणे

तू ही असशील
गेली विसरून
बघ वेडपण
षोडशीचे

किती सुगंधी
पण ती स्मृती
होत न रिती
कधी कुपी


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

तू नाही भेटलीस तरीही



तू भेटली नाहीस तरीही

*****************

तू भेटली नाही तरीही
मी गाईन तुझे गीत
तू सोडून गेली तरीही
मी जपेन तुझी प्रीत

तुच आता मूर्तिमंत
झाली आहेस माझे गीत 
मी शब्द झालो अगणित
सखी तुझ्या छंद मिठीत

तू दूर गेलीस किती जरी
तुलाच गुंफिन मी स्वप्नात
तुझे असणे माझ्यातील
पाहत राहीन मी श्वासात

नभातील लाख तारकास
सांगेन तुझ्या आठवणी
किरणातून चंद्र रुपेरी
प्रीत देईन तुज पाठवुनी

तुझे पाहणे अन स्पर्शने
जरी गमते योजने दूर
तूच माझ्या प्राणात परी
धडधणारे सुरेल सूर

तुच असते ओठातील
माझे सहज गुणगुणणे
तुच होतेस मनी उमलते
असंख्य निशब्द तराने

तुझे हसणे मृदू बोलणे
तुझे मन मोहवून जाणे
रुंजी घालती या मनी
भास तुझे वेडे दिवाने

माझ्या मनीच्या अंधारात
निरव अंगणी एकांतात
मला सदैव साथ देतात
तुझे उमटले शब्द मौनात

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

रात्र



रात्र
***
आज पुन्हा चांदण्यांनी
बहरून रात्र गेली
रातराणीच्या फुलांनी
उमलून रात्र गेली

सरल्या शंका कुशंका
मूक व्यर्थ रुष्ठताही
विरहात अंध दीप
पेटवून रात्र गेली

कळले कुणास आज
जीव प्राण वाहीलेला
भरुनी डोळी कुणाच्या
पाझरून रात्र गेली

नियती सदैव देई
डाव अर्धा हरलेला
तव हाती बदलून
उजळून रात्र गेली

मन शुभ्र अंगणात
कोजगरी ही नटली
रित्या जगण्यास माझ्या
सजवून रात्र गेली

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

सहकार



सहकार

सहकार म्हणजे भ्रष्टाचार
असाच अर्थ आता
रूढ होत आहे
सहकार म्हटले की
वाटते गाढवं
गुऱ्हाळवर
मजेत गुळ खात आहे

कुणी  जेव्हा म्हणते
आम्ही सहकार करू
ओळखायचे हा तर
साला असणार
गल्ला भरू,

सरकार अन सहकार
किती सारखे दिसतात
दोन जुळे भाऊ जसे
पक्के चोर जसे वाटतात

सहकारी बँका
साखर कारखाने
गृह निर्माण संस्था
इथे काय घडते
हे सगळेच जाणतात
तेल लावलेले पैलवान
का कधी कुणाच्या
हातात सापडतात

इतका सुंदर शब्द
अन इतका सुंदर अर्थ
क्वचितच कधी कुठे
असा बदनाम झाला असेल
डबक्यातील इंद्रधनुष्य 
प्रतिमा चिखलात 
माखली असेल

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...