रविवार, २९ मे, २०२२

कामना



कामना
******

कामना धनाची 
कामना मनाची 
कामना यशाची 
जगतात ॥
कामना रुपाची 
कामना सुखाची 
कामना देहाची 
निरंतर ॥
सारी नाव रूपे 
क्षणाची काळाची 
तरीही जीवाची 
घालमेल ॥
मिरवती गादी 
संताचे संगती 
उभारली गुढी 
लौकिकाची ॥
कामनेचा अंत 
तरीही होईना 
जीवन पुरेना
भोगावया॥
म्हणुनी कामने 
द्यावे दत्त रूप 
मन आपोआप 
शांत होय ॥
काम क्रोध लोभ 
दत्ताला वाहून 
रहावे पडून 
दत्त पदी ॥
विक्रांत विकार 
पाहतो देहात 
परी आटोक्यात 
दत्त कृपे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शनिवार, २८ मे, २०२२

भाग्य

भाग्य 
*****
रांगोळीच्या ठिपक्या गत 
अस्तित्व असते आपले 
रांगोळी चा भाग होणे 
कर्तव्य असते आपले

रांगोळीत ठिपक्यांच्या 
असतात ही ठिपके 
आणि नसतात ही ठिपके 

ठिपक्या शिवाय रांगोळी 
होतच नाही कधी
पण होताच रंग भरुनी 
ठिपके उरतच नाही कधी 

या विश्वाच्या दारातील 
या महारांगोळीत 
मिसळून 
पुसले जाणे अस्तित्व 
हे आपले भाग्य आहे 

त्याहून मोठे भाग्य 
आपले ठिपका असणे 
या स्वीकारात आहे 
ते ओळखण्यात आहे 

त्यातून येणाऱ्या 
कृतज्ञता अन विनम्रतेच्या 
उदयात आहे .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शुक्रवार, २७ मे, २०२२

प्रेम निरवधि




प्रेम निरवधि 
**********
सुखात दुःखात 
आठवतो दत्त 
सदा असे हस्त 
डोईवरी ॥१

घडे पापपुण्य 
काही जे हातून 
तयाला सांगून 
टाकतसे ॥२

घेई बा सांगतो 
तया सांभाळून 
लेकरू अजाण
महामूर्ख ॥३

कधी ना कळते 
कधी न वळते 
मन उंडारते 
जगत्रयी॥४

परी देवराय 
न दे अंतराय 
करतो उपाय 
सांभाळण्या॥५

किती अपराध 
तया न गिनती 
अपार ती प्रीती 
अबाधित ॥

काय सांगू दत्त 
प्रेम निरवधि 
भेटला विक्रांती 
पूर्वपुण्ये॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, २६ मे, २०२२

दुषित अन्न

दुषित अन्न 
********
चायनीज बोटी  मेल्या कोंबडीची 
सकाळी ती घाई होय पळण्याची ॥१

करावया जाशी चैन ती जीवाची 
हाय आणशी तू पीडा विकतची  ॥२

चव जिभेला ती लय लय भारी 
गळा दाटे परी  कडूच ओकारी ॥३

खाई डाळ भात चटणी चपाती 
मोले घेतो का रे रोग शरीराती॥४

पोटच्या कळांनी जीवा होय त्रास 
पडे बाहेर त्या नरकाचा वास ॥५

अरे जीवा किती कितीही कामना
घ्यावे देवा लागी अन्न हे सेवना ॥६

मग तेच अन्न प्रसाद होवून 
निववे जीवास साधनी आणून॥ ७

जीभ ही नामास विक्रांत वाहून
न दे विटाळून कदा घसरून ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, २५ मे, २०२२

मुक्ताईचे जाणे


मुक्ताईचे जाणे 
************
निरोपा वाचून मुक्ताई चे जाणे 
मज जीवघेणे  वाटे फार ॥

नाही पुण्यक्षेत्र नाही महास्थान 
सहज गमन कैसे केले ॥

नाही आयोजन निरवानिरव 
हरपला ठाव क्षणार्धात ॥

विमान न येणे गुही न बसणे
समाधी बांधणे काही नाही ॥

कुठून आलीस कुठे नि  गेलीस 
चैन या मनास माझ्या नाही 

असे का हे कुणी जाते क्षणार्धात 
पंचमहाभूतात हरवून ॥

जरी बोललीस आले नच  गेले 
स्वरूपी साचले तत्व मीच ॥

जाणतो गे माय जरी तत्त्वज्ञान 
कोरडा पाषाण असे मी गं ॥

तेव्हा तुझे जाणे मज लागी गमे
माझेच तुटणे का न कळे ॥

विक्रांत उद्धट क्षमा करी माय 
सांग करू काय प्रेम फार ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

नस्ती


नस्ती
*****

रूप बदलते 
नस्ती मिरवते 
खरे काय खोटे 
कोणी न जाणते ॥१

चुका लपवते 
हतबल होते 
सह्या देहावरी 
उगाच झेलते ॥२

साहेबाच्या दारी 
तिष्ठत बसते 
होता कृपा त्यांची 
पळत सुटते ॥३

गोल गोल शब्द 
तरबेज बोटे
आहे तसे काल 
जग हे चालते ॥४

कशाला पुसशी 
विक्रांत चालले 
सारे पोखरले 
लाल निळे किल्ले ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘





एका इंग्रजी कवितेचा ( गाण्याचा) अनुवाद


एका इंग्रजी कवितेचा ( गाण्याचा) अनुवाद 
original song by: Glenn Valles
**********************

verse 
अब तक है याद मुझे 
जब मिले थे हम 
पहली बार . . .
भला कैसे भूल सकता हूं मैं 
जब देखा था तुमने, 
मुझे पहली बार .. ..
थम गई थी सांसे, 
रुक गई थी धड़कन 
न जाने कई कई बार ...

cores

तेरी आंखों मैं छुपी थी 
वह लगन वह अनोखी अदा 
मेरी आंखों ने छू ली थी 
तेरे होठों की हसीन अदा 
तेरी आंखे बन गई थी 
मेरी जिंदगी मेरा खुदा 
तेरे हंसी होठों ने कहा
जो कभी लब ना कहते 
(मैं तेरी हूं तेरी ही सदा )

verse
हे यार अब तुम मुझे 
कुछ भी मत कहना 
तुम्हारे प्यार का इजहार भी 
अब मत करना 
जानता हूं सब, लब 
ओंठो पर मत लाना 
एक एहसास कहता है 
दिल को 
तुम बनी हो मेरे लिए 
तुम्हें दिल में ही  रखना है

cores

तेरी नरम होंठों के प्यार को 
चख सकता हूं मैं 
तेरी कॉपति उंगलियॉ
छू सकता हूं मैं 
 
जो तेरे मनकी बाते 
करती है उजागर 
वह हरकते कैसे 
अनसुना कर सकता हूं मैं

bridge 

हर एक चेहरे की 
होती है एक कहानी
तेरा चेहरा कहता है 
तुम हो गई हो दीवानी 
हां वही तेरी नजर, बयां करती है 
मुझको तेरी कहानी 
मेरे प्यार की प्यासी पुकारती 
वह तेरी जिंदगानी

verse
हे यार अब तुम मुझे  
कुछभी मत कहना 
तेरे प्यार का
इजहारभी  मत करना 
जानता हूं सब, लब 
ओंठो पर मत लाना 
एक एहसास कहता है 
दिल को 
तुम बनी हो मेरे लिए 
तुम्हें दिल में ही  रखना है

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

मंगळवार, २४ मे, २०२२

आठवण

 आठवण
*******

फार काही फार काही आता उरलेले नाही 
राहू देत मजसवे तुझ्या आठवणी काही १

मागायला हात नाही बोलायला शब्द नाही
येते तुझी आठवण बघ थांबतच नाही २

भेटलीस कधीकाळी किती ऋण जीवनाचे
पुनवेचा देह झाला मन शुभ्र चांदण्याचे ३

ओघळून नभ आले चिंब चिंब रान झाले 
जपलेले स्वप्न उरी सत्य खरोखर झाले ४

जरी केला वायदा मी पुढील त्या जन्मातला
वृथा जरी समजुत शब्द होता मनातला ५

वाहतीच जिंदगानी सवे कुणा वाचूनही 
खळखळ होते तरी स्थिरावता प्रवाह ही  ६

सुख थोडे दुःख थोडे काळजात भरलेले 
जीवनाचे रंग बहु दत्त राये दाखवले  ७

मिटताच मन रात्री जग जरी मिटू जाते 
स्वप्न अन सुषुप्तिही स्मरणाचे गाणे होते ८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘




अमृताचा थेब

अमृताचा थेंब
***********
अमृताचे थेंब 
अमृताच्या डोही 
ऐसी झाली काही 
गोष्ट इथे ॥१

अमृताच्या घरी 
अमृत पाहुणा
गुण आले गुणा 
सोयरीका ॥२

ज्ञानराज शब्दी
ज्ञानाचा पाझर 
दाटला सागर 
थेंबोथेंबी॥३

देवे आळंदीत 
सांगितले मज 
तेच शब्द आज 
पुन्हा कानी ॥५

विक्रांत कृपेची 
जाहला ओंजळ 
सुखची केवळ 
अंतर्बाह्य ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

सोमवार, २३ मे, २०२२

मुळावर

मुळावर
*******
कळेना कोण असे
कुणाच्या मुळावर ?
ज्याचा त्याचा डोळा 
फुकटच्या फळावर  !

कोण ती छापती
सर्टिफिकेट खोटी 
आणिक वाटती
भीतीविन जगाती १

कोणास पाकीटे 
किती ते आवडते 
मरू दे जगा म्हणती
माझे काय अडते २

कोण भय दावून 
माल तो ढापतो 
आरटीआय शस्त्र 
सदा कदा उगारतो ३

पाोटासाठी पाप 
करावे ते म्हणती 
नरकाच्या दारात 
स्व पदेची जाती ४

अश्या या जगाला 
 विक्रांत विटला
पापी डोळा वाहून  
दत्ता रे थकला  ५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, २२ मे, २०२२

ज्ञानराया

ज्ञानराया
*******

देह हा विकला 
तुज ज्ञानराया 
आणि कुण्या पाया 
पडू आता ॥
जिथे जातो तिथे 
देवा तुझे पाय 
कानी गुरुराय 
मंत्र तुझा ॥
राम कृष्ण हरी 
हात खांद्यावरी 
चालविसी तरी 
कळेचिना ॥
संत मुखातून 
कानी तुझी वाणी 
येतसे सजूनी 
सारभूत ॥
किती करिसी तू 
माझ्यासाठी कष्ट 
लीन हा विक्रांत 
पायी तुझ्या ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शनिवार, २१ मे, २०२२

ज्ञानराज माणीक प्रभू गीता ज्ञान यज्ञातीलअ.१६ श्लोक ८ते ११विवेचना मधील काही मुद्दे.

ज्ञानराज माणीक प्रभू गीता ज्ञान यज्ञातीलअ.१६ श्लोक ८ते ११विवेचना मधील काही मुद्दे
********::::********:::::*****:::
आजही श्री जनी काल झालेल्या आणि अगोदरच्या श्लोकांचा आढावा घेतला आणि त्याला धरून आजच्या निरुपणाचे सूत्र पुढे चालू ठेवले
 
आज  त्यांनी  श्लोक 8 पासून ते श्लोक 11 पर्यंत निरूपण केले . निरुपना अगोदरच त्यांनी सांगितले की वेळ कमी आहे. त्यामुळे ज्या श्लोकांमध्ये पुनरावृत्ती होते ज्याचे निरूपण अगोदरच झालेले आहे त्याच्यावर ते भर न देता ते थोडक्यात सांग सांगतील व ज्यावर डिस्कशन चर्चा झाली नाही ते विशद करून सांगतील

श्लोका विशद केलेला असुरी गुण म्हणजे असत्य. हे असुरी लोक  असत्यात वास्तव करून असतात मूर्तिमंत असत्याचे रूप असतात हे सर्व जग हे असे सत्य मानत असतात अगदी देव-धर्म अगदी देव वेद आणि समोर प्रत्यक्ष दिसणार शिवलिंगही.

त्यानंतर हे असुरी गुणयुक्त लोक हे सर्व जग कुठलाही आधार नसलेले, ईश्वर नसलेले आहे असे म्हणतात
परंतु खरे पाहू जाता या जगाचा जीवनाचा आधार बेस किंवा फाउंडेशन हे धर्म आहे.
 धर्म म्हणजे जणू काही फुलांच्या माळेला धरून ठेवणारा धागा आहे धर्माच्या मर्यादा असल्यामुळे चक सुरळीत चाललेले आहे आपण आपल्या नात्यांमध्ये पहिली पत्नी आई बहीण यांच्याशी वेगवेगळ्या पद्धतीने वागतो कारण ते आपल्याला धर्माने घालून दिलेले नियम आहेत व जे आपल्या आत  रुजलेले आहेत त्यावरील विश्वास हा धर्माचाच भाग आहे.  किंबहुना धर्म हे एक प्रकारचे कॉमन सिविल कोडे आहे असे म्हटले तरी चालेल धर्म धर्माचे नियम हे का प्रत्यक्ष नसतात म्हणजे ते दिसत नाही असे सांगतात.  धर्म म्हणजे हिंदू मुसलमान शीख जैन या सार्‍या उपासना पद्धती आहेत .आपल्याला मोक्षापर्यंत जाण्यासाठी करण्याची उपासना आवश्यक आहे पण,  जे एकमेकांच्या नात्यांमध्ये व्यवहारांमध्ये माणुसकी मध्ये असलेले जीवनाचे नियम हे धर्म आहेत हिंदू मुसलमान ख्रिश्चन सारेजण आपल्या आईशी त्याच आदराने प्रेमाने वागतात आपल्या मुला मुलीशी वात्सल्य़युक्त प्रेम करतात. हाच धर्म.
आसुरी लोक देवही मानत नाहीत जगात ईश्वर कुठे आहे असे ते म्हणतात .व्हेअर इज गॉड ? त्याचे उत्तर देताना स्वामीजी म्हणतात स्वामीजी म्हणतात व्हेर इज गॉड हा प्रश्न चुकीचा आहे प्रश्न व्हॉट इज द गॉड असा पाहिजे. होतापरमेश्वर आहे किंवा नाही हा वाद तर जगाच्या अंतापर्यंत चालू राहील पण जर ज्याला खरोखरच  संपायचा हवा  त्यांनी बसून अगोदर परमेश्वराची व्याख्या करणे आवश्यक आहे, ती झाल्याशिवाय ती चर्चा करता येणे शक्य नाही. परंतु देव न मानणारा ती व्याख्या देऊ शकत नाही कारण तो देव मानतच नाही म्हणून देव मानणाऱ्या ची व्याख्या त्यांनी स्विकारावी असे प्रतिपादन सीजी करतात. ती व्याख्या स्वीकारून तो प्राप्त करण्याचे नियम पद्धती अत्मसात करून पहावी आणि जर त्यास देव सापडला नाही भेटला नाही तर मग पुढे वाद चालू राहायला हरकत नाही ,किंबहुना तो वाद चालणारच नाही असे ते म्हणतात.
 देवाची हि व्याख्या वेदांमध्ये उपनिषदांमध्ये केलेली आहे उपनिषदांमध्ये स्पर्श रस रंग रूप गंध याचा अनुभव ज्याच्यामुळे येतो किंवा जो हे जाणतो तोच परमेश्वर आहे असे म्हटले आहे .मृतदेहाला हे डोळे असतात कान असतात नाक असतात परंतु ते हा कुठला अनुभव घेऊ शकत नाही म्हणूनच त्याच्या पाठीमागे असलेली शक्ती ती जो डोळ्याचा डोळा, कानाचा हे कान असे म्हटले जाते तोच परमेश्वर आहे. त्याशिवाय दुसरे उदाहरण देतात ते म्हणजे मोबाईल मध्ये असलेल्या बॅटरीच. या मोबाईल मध्ये हजारो फंक्शन असतात परंतु  जर बॅटरी नसेल तर ती एक निरूपयोगी वस्तू होऊन जाते. तसेच देहामध्ये परमेश्वराचे अस्तित्व असते .
पण हे आसुरी लोक असे म्हणतात की आपल्या सगळ्यांचा जन्म हा केवळ परस्पर संबंध ठेवल्यामुळे झालेला आहे. त्याला अन्य काही कारण नाही.जग हे कामने पासूनच निर्माण झालेले आहे .इथे श्रीजी पाणी तयार होण्याची रासायनिक प्रक्रिया समोर ठेवतात, पाणी होण्यासाठी दोन हायड्रोजन व एक ऑक्सिजन यांचे अणू लागतात परंतु एका टेस्ट ट्यूब मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन टाकला असता पाणी तयार होत नाही ते पाणी तयार व्हायला आणखीन एक वस्तू लागते तिला कॅटलिस्ट असे म्हणतात. कॅटलिस्ट एक सूक्ष्म प्रकारची इलेक्ट्रिसिटी असे म्हणूयात. म्हणजेच ती कुठून येते तर परमेश्वरा तून.
पुढच्या श्लोकात भगवान त्यांच्यावर ती टीका करतात ते म्हणतात की अशाप्रकारे खोट्या दृष्टीचा अवलंब करून हे लोक स्वतःचा नाश करून घेत असतात आणि उग्र कर्म करायलाच जणू काही ते जमलेले असतात त्यांची सर्व कामे ही अहितकर आणि जगाचा नाश करण्यासाठी होतात तेव्हा त्यासाठी त्यांचा जन्म आहे की काय असे वाटते
पुढच्या श्लोकात खोट्या दृष्टीचा अवलंब करून स्वतःचा नाश करणे म्हणजेच अल्प बुद्धी पणा आहेआसे सांगतात

१०ओव्या श्लोकात ते असे म्हणतात की दम मद इत्यादीनी युक्त घेऊन कधीही पूर्ण न होणाऱ्या कामनाचा  आश्रय घेऊन हे राहतात .
कामना या कधीच कुणाच्याही पूर्ण झालेल्या नाहीत. कामनांना अंत नाही आणि कामना म्हणजेच दुःख आहे असे श्रीजी म्हणतात. कारण कामनांची वाढ ही जीवोमेट्रिक पद्धतीने होत असते तर कामांची मूर्तीही मॅथेमॅटिक गतीने होत असते. कामना आणि दुःख यांचा एक रेशो असतो .कामना आणि कामनापुर्ती त्यांची तुलना केल्यावर ती जो येतो तो रेशो. तो पाहता कळते का मनातून केवळ दुःख जन्मते.जेवढ्या जास्त कामना एवढे दुःख जास्त ,कारण कामना मधून अपेक्षा वाढत असतात अपेक्षा जसजसे वाढत जाते तसतसे सुखही कमी होत असते ,यांचे प्रकार अशी असतात.  कामना पुर्तीत आनंद नाही तर त्याचे शमन करण्यातच आनंद आहे. कामना जन्माला आली की मन प्रक्षुब्ध होते ते कामना पूर्ण करण्यासाठी ते धडपडते स्वतःला त्रास करुन घेते.  ती मिळताच शांत काय होते. नीट पाहता कळते इंद्रिय शांत होत नाही मन शांत होते. त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो इंद्रियाच्या तृप्तीने आनंद मिळत नाही मनाचे शमन झाल्याने.शमन करण्यासाठी घेतले जाणारे औषध आहे ते म्हणजे भक्ति ,आपण जी उपभोगतो खातो पितो वस्त्रप्रावरणे पांघरतो किंवा इतर उपयोगी आणि चैनीच्या वस्तू वापरतो या देवाला अर्पन करून वापराव्यात .तसेच दुसरा मार्ग म्हणजे आपल्या कामनाचे dilution करणे म्हणजे दुधात पाणी घालून तेपातळ केले जाते.जसे की आपल्या इच्छा सगळ्यांच्या सोबत शेअर करणे उदाहरणार्थ  त्यांनी सांगितले की एखाद्यास पाणीपुरी खायची फार इच्छा झाली पाणीपुरी तो सगळ्यांच्या सोबत घेऊन वाटून आपण ही खातो. त्याचप्रमाणे कामना या पुढे ढकलत राहिलं पोस्टपोन करत राहिलं तरी सुद्धा त्याचे शमन होऊ शकते याशिवाय या कामना  काम्यवस्तूच्या निर्मात्याचे चिंतन केले असता गळून जाते .या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले आहे कल्याणच्या सुभेदाराची सून पाहून छत्रपती म्हणतात की आमची आई अशीच   सुंदर असती  असती तर आम्ही असेच सुंदर झालो असतो .यामध्ये कामना हि मातृ स्मृतीमध्ये उच्च भावनेमुळे निर्माणच झालेली नाहीये (अर्थात महाराजांचीही दृष्टीच अलौकिक होती ते श्रीमान योगी होते ) ही वृत्ती तशीच आपल्यामध्ये बाळगली असता आपण त्या कामाना पासून दूर जाऊ शकतो .
मोहात आसक्त झाल्यामुळे ही लोक देहाच आत्मा समजतात किंवा आपण फक्त देहच आहोत असे समजतात अशा प्रकारच्या भ्रमा मुळे ते नेहमी अशुचीत्वा कडे प्रवाहित होतात.
११ हे असे लोक प्रलयाच्या अंतापर्यंत असंख्य चिंता मनात धरून  उपभोगालाच आपले परम ध्येय माननात त आणि हाच काय तो पुरुषार्थ आहे असा निश्चय त्यांनी केलेला असतो.
सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबणे ही वृत्तीच आसुरी आहे .परवश प्रकृती आहे सर्व  परवशअहे ते दुःखद सर्व आत्मवश सुख असे शास्त्रात म्हटलेले आहे .त्याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की तुम्हाला जर हॉलमध्येच जबरदस्तीने बसून ठेवून प्रवचन ऐकवली किंवा काही दिले तरी तुम्ही दुःखात राहत तेच तुम्हाला कधी यायला आणि जायला मोकळीक असेल तर तुम्ही सुखात असाल .त्याचप्रमाणे तुमचे पैसे चेकबुक क्रेडिट कार्ड तुमच्या ताब्यात असेल तर तुम्ही स्वस्थ चित्ताने आनंदात असतात. पण दुसऱ्याच्या ताब्यात असेल तर तुम्ही दु: खात असाल. हे व्यवहारिक साधे उदाहरण आहे।
पुढे ते चिता चिंता या दोन शब्दांमधील फरक विशद करतात एका अनुस्वार यामुळे खूप फरक पडतो चिता आहे फक्त मृत माणसाला जाळते तर चिंता जिवंत माणसाला. या जाळत्या चिंते बद्दल ते म्हणतात ही चिंता कधीही कुठेही कर कशी येते आणि मन व्यापून आपल्याला दु:खी करते.
हि चिंता जर संसारी माणसाला वाटत असेल तर मग ते त्याने चिंतेचे मॅनेजमेंट करण्याचा सल्ला देतात चिंतेचा विषय घेऊन एक तासभर बसावे तिचा उपाय करावा तिचे त्यातून मार्ग काढण्याचे प्रकार ठरवावेत उपाय ठरवावेत आणि ते कधी पासून अंमलात आणायचे हे ठरवावे आणि आपल्या चित्तातून ती चिंता बाजुला काढून ठेवावी. दुसरा उपाय म्हणजे परमेश्वराला पूर्ण शरणागती मी परमेश्वरच आहे म्हटल्यावर ती कसली चिंता.जसे मूल आईला संपूर्णतः समर्पित असत. ते मूल कसलीच काळजी करत नाही त्याच्या काळजी आई करते.त्याप्रमाणे परमेश्वर आपला सांभाळ करतो योगक्षेमं वहाम्यहम्!!

ज्ञानराज माणीक प्रभू गिता ज्ञान यज्ञातीलअ.१६ श्लोक ६ अणि ७ विवेचना मधील काही मुद्दे.


श्री ज्ञानराज माणीक प्रभू गीता ज्ञान यज्ञातीलअ.१६ श्लोक 6अणि 7 विवेचना मधील काही मुद्दे.
*********


श्रीजी सांगतात की भगवंतांनी पहिल्या तीन श्लोकात दैवी गुणांचे वर्णन संपूर्णतः केले आहे विस्ताराने केली आहे पुढील चौथ्या श्लोकांमध्ये मुख्य आसुरी गुण सांगून झाल्यावर  पाचव्या श्लोकात ते फलश्रुती सांगतात आणि या अध्याय  एका अर्थी इथे समाप्त होतो. परंतु त्यानंतर भगवान आसुरी गुण अधिक विश्लेषण करून सांगत आहेत

शौच या गुणाचे विश्लेषण करताना श्रीजी सांगतात की शौचाचा अर्थ स्वच्छता आणि पवित्रता असा आहे. वर सांगितल्याप्रमाणे आपल्या वाणी मध्ये बोलण्यामध्ये आचरणांमधे स्वच्छता हवी शुद्धता हवी 
श्री जी  एक उदाहरण देतात ते म्हणजे आपण बुट घालून घरी जेवतो का ?त्याचे उत्तर नाही असेच असते . परंतु हॉटेलमध्ये समारंभात बराच वेळा आपण बुट घालून जेवतो. खरंतर हे अयोग्य आहे कारण जेवण करणे हे एक यज्ञकर्म आहे. या यज्ञ कर्मामध्ये आपल्या पोटामधील अग्नी हे भगवंताचे स्वरूप आहे, त्याच्यामध्ये आपण अन्न टाकत असतो . 
जेवत कोण असते शरीर किंवा दुसरा आतमधला कुणी?  जर शरीर जेवत असेल असे म्हटले तर मेलेल्या माणसाला खडीसाखर खायला काहीच हरकत नाही. पण तो खडी साखर खाऊ शकत नाही . जेऊ शकत नाही
म्हणजेच शरीरामध्ये जेवणारा दुसरा कोणीतरी असतो सिद्ध होते .
तसेच शुद्ध आचरण म्हणजे काय तर जे धर्मग्राही आहेत ते . जे सारे धर्माने सांगितलेले आचरण. मंदिरात जाणे, तिलक, कुंकू लावणे ,दानधर्म करणे, कुलाचार पाळणे ही सर्व आचरण ही शुद्धी करणारी असतात ती टाळणे लपवणे योग्य नाही .

तर अश्या प्रकारे  असुरी गुणाचे लोक हे प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही गोष्टींना जाणत नाही त्यांच्या ठिकाणी शुचि नसते सदाचार नसतो आणि सत्य नसते . 
या लोकांना काय करावे आणि काय सोडावे हेही कळत नाही 
नीट पाहू गेले तर धर्म आणि मोक्ष ही प्रवृत्ती मध्ये मोडतात तर अर्थ आणि काम ही निवृत्ती मध्ये मोडतात याचे भान आले की आचरण योग्य होऊ लागते आणि हे पुरुषार्थ पालन केले जाते.
सत्य हे धर्माचे रक्षण करते याचे भान आसुरी गुणाच्या लोकांना नसते.

शुक्रवार, २० मे, २०२२

श्लोक १६.४ व १६.५ .श्री ज्ञानराज माणिक प्रभुजी महातराज गीता यज्ञ आधारीत.

श्लोक १६.४ व १६.५  .श्री ज्ञानराज माणिक प्रभुजी महातराज  गीता यज्ञ आधारीत.
*****************::
दैवी गुणांचे वर्णन केल्यानंतर आज श्री जी असुरी गुणा बद्दल सांगत आहेत .

आसुरी गुणांमधील पहिला गुण म्हणजे दंभ हा आहे 
दंभ म्हणजे आपण जे नाही ते दाखवणे आपल्यात नसलेल्या गुणाचे खोटे प्रदर्शन करणे किंवा ते आपल्याच आहे असे भासवणे . उदा. भित्र्या माणसाने आपण फार शूर आहोत असा आव आणणे.

दर्प म्हणजे ,मी फार कुठेतरी मोठा आहे असे भासवणे किंवा असे स्वतःलाच वाटणे .आपल्या जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीचा गर्व वाटणे .उदा घर गाडी बंगला धन  इत्यादी. ममत्व हा दर्पाचा स्थायी भाव आहे 

अभिमान म्हणजे जे आपल्या मध्ये जे आहे ते मिरवणे त्याबद्दल अहंकार बाळगणे .  उदा .रूप  कला गुण जसे की गायन नृत्य वकृत्व इत्यादी.
हे सारे गुण देवाने दिलेले असतात .ते त्याचेच दैवी गुण असतात .ते आपले म्हणणे हे देवाला कसे अवडेल .अहंता दर्पाचा स्थायी भाव आहे .

अश्या रितीने जिथे अहंता ममता तिथे आसुरी गुण .

पारूष्य म्हणजे ताठा , कठोरता .
ताठा (अकड) असलेल्या व्यक्तीची तुलना श्री जी नी मेलेल्या व्यक्तीशी केली आहे .मरून पडलेल्या मुडद्याशी केली आहे .देह मेल्यावर ताठ होऊन जातो त्याप्रमाणे या ताठ माणसाची अवस्था असते 
अज्ञानाबद्दल ते सांगतात ,ज्ञान हे सापेक्ष असते कधीकधी वर पाहता जे ज्ञान असते तेच अज्ञान असते .जसे की अणू बॉम्बचा शोध लावलेले शास्त्रज्ञ ज्ञानी वाटतात परंतु ते ज्ञान माणसाच्या विनाशाला कारणीभूत होते ते अज्ञानच होय. कोरोना व्हायरसचा जंतू निर्मान करणारे ज्ञान हे अज्ञान तर कोरोनाव्हायरस ची लस शोधून काढणारे ज्ञान हे खरोखर ज्ञान होईल .

क्रोध म्हणजे रागावणे ,चिडणे. श्री जी इथे पुन्हा वर अक्रोध मध्ये उल्लेख केलेले क्रोधाचे वैशिष्ट सांगतात जसे की क्रोधा विनाकारण नसतो त्याला कारण लागतं .कामना फलद्रुप न होणे हे ते कारण असते तसेच क्रोध हा सर्व नाशाचे कारण आहे असेही ते .सांगतात .ते सांगतात रामायण का घडलं तर कैकयीच्या क्रोधामुळे कळलं तसेच रावणाच्या क्रोधामुळे घडले .
महाभारत का घडलं द्रौपदीच्या क्रोधामुळे घडलं दुर्योधनाच्या क्रोधामुळे घडलं तसेच भगवंताच्या क्रोधामुळे घडलं .

हि सारी दैवी संपति कशाला गोळा करायची आहे तर मोक्षा साठी.मोक्ष कुणाला हवा असतो . तर याच दैवीगुण युक्ताला .
सारे काहि असुनही या जन्ममृत्युच्या चक्रातून बाहेर पडायची इच्छा असते पुढचा जन्म कुठला असेल ते आपल्याला माहित नसते पुढच्या जन्मात कुठल्या दुःखातून जावे लागेल त्याची ही खात्री नसते शाश्वत सुखासाठी  आनंदासाठी प्रत्येकाला मोक्ष हवा असतो .
तर आसुरी शक्ती ही सदैव बंध निर्माण करते

 त्यामुळे भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना तू शोक करू नको कारण तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलेला आहेस .
ज्याअर्थी अर्जुनच्या मनामध्ये करुणा  निर्माण झाली त्याअर्थी अर्जुना मध्ये दैवी गुण संपत्ती आहेच. परंतु समोर असलेल्या व्यक्ती ही आपली माणस आहेत आपली भाऊ काका मामा असे आहेत हे आपले पण ज्या क्षणी जन्मालआले तो मिश्र गुणी झाल. त्याच्यात असुरीगुण प्रादुर्भाव झाला त्यामुळे भगवंताला त्या गुणाला दूर करण्यासाठी ही गीता सांगावी लागली. पण मुळात तो दैवी पुन्हा युक्त होत।

आधारीत .
श्री ज्ञानराज माणिक प्रभुजी गीता यज्ञ



गुरुवार, १९ मे, २०२२

श्री जींच्या प्रवचनाचा दुसरा दिवस श्लोक 16.2 व 16.3


श्री जींच्या प्रवचनाचा दुसरा दिवस श्लोक 16.2 व  16.3
काल आठवतांना एक पहिला मुद्दा मी विसरून गेलो होतो त्यावेळी  श्रीजी सांगत होते की संपत्ती म्हणजे काय ?
हा अध्याय दैवी संपत्ती असुरी संपत्ती अन राक्षस संपत्ती त्यावर आधारलेला आहे. तर संपत्ती म्हणजे काय श्रीजी म्हणतात संपत्ती म्हणजे तुमच्या कडे असलेले सगळं काही धन दौलत पैसाअडका स्थावर जंगम व्यवहारांमधील संपत्ती असते परंतु अध्यात्मिक जगामध्ये संपत्ती ही वेगळी असते आणि ती संपत्ती म्हणजे दैवी गुण असतात.
 संपत्तीच्या मोबदल्यात आपण काहीतरी घेत असतो देत असतो म्हणजेच संपत्तीची अशी व्याख्या करता येते की जी वस्तू देऊन आपण काहीतरी घेऊ शकतो. तर ही दैवी संपत्ती अशी आहे ती देऊन आपण   मोक्ष मिळू शकतो. तर  ज्याला मोक्ष हवा मुक्ती हवी त्याला दैवी संपत्ती प्राप्त केल्याशिवाय पर्याय नाही.


आज श्री जी सांगत होते  दैवी गुणा बद्दल
 १० वा अहिंसा हा  दैवी गुण आहे अहिंसेचा अर्थ विशद करताना ते म्हणतात अहिंसा हा परम धर्म आहे हे खरंच परंतु त्याच्या पुढील जे वाक्य आहे हे बहुतेकांना माहिती नाही ते म्हणजे धर्मासाठी केलेली हिंसा हाही धर्मच असतो. भगवान कृष्णाने घडवून आणलेली हिंसा, कुरुक्षेत्र युद्ध ही धर्मासाठी होती म्हणून ती परमधर्मा मध्येच मोडते त्याचप्रमाणे देश, धर्म, देवासाठी केलेली हिंसा ही धर्मा मध्येच मोडली गेली पाहिजे .अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध केली गेली हिंसा हि अहिंसाच असते.

हिंसा तीन प्रकारचे असते कायिक वाचिक आणि मानसीक
 देहाने कुणाला न दुखावणे त्रास न देणे इजा न पोहोचणे मनाने कोणाबद्दल वाईट न चिंतने वाईट न बोलणे अपयश न चिंतने  हे मानसीक तर वाचिक अहिंसा म्हणजे कुणाला वाईट वाटेल असे न बोलणे कर्कश्य न बोलणे अपमानास्पद न बोलणे इत्यादी.

11 अकरावी दैवी संपत्ती किंवा गुण हा सत्य आहे सत्य बोलावे रुजू बोलावे कुणाला न दुखेल असे बोलावे. सर्व आचरण हे सत्याला धरून असावे .मनात एक आणि बाहेर एक असे न वागणे असते. तसेच सत्य भाषण सुद्धा दुसऱ्याला दुःखदायी होणार असेल तर न बोललेलेच बरे.

12. बारावी दैवी संपत्ती किंवा कोण हा अक्रोध आहे अक्रोध म्हणजे शब्दात सांगायचं तर न रागावणे. पुन्हा अक्रोधा सुद्धा श्री जी म्हणतात की भगवान श्रीकृष्णाला सुद्धा क्रोध आला होता त्यांनी क्रोध केला होता उदाहरणार्थ शिशुपालास 99 प्राप्त होईपर्यंत त्यांनी अक्रोध जपला होता परंतु शंभर वा अपराध केल्यावरती त्यांनी त्याचा वध केला होता तसेच रणांगणामध्ये आपले भक्त आणि जिवलग मित्र अन सैन्य भीष्मा कडून पराभूत होत  मारले जात आहेत हे पाहून क्रोधाने रथाचे चाक घेऊन ते भीष्मावर धावून गेले होते. याचा अर्थ क्रोध हा अस्वाभाविक नसतो परंतु तो सत्वागुणाच्या आधाराने उभा राहिला तर तेजाला साहाय्यक होतो.

तसेच श्री सांगतात की क्रोध हा अवलंबून असतो तो एकटा कधीच नसतो क्रोधाच्या अगोदर काम हा असतो कुठलीही कामना पूर्ण होत नाही तिला अडथळा येतो त्या वेळीच क्रोध उभा राहतो.

13 तेरावा गुण हा त्याग आहे . हा गुण समजावताना श्रीजी सांगतात की ज्या वेळेला गरुड आपल्या चोचीमध्ये मांसाचा तुकडा घेऊन फिरत असतो त्या वेळेला त्याच्या पाठीमागे खूप कावळे लागतात आणि त्याला बेजार करून सोडतात पण ज्या क्षणी तो मांसाच्या तुकड्याचा त्या करतो त्या क्षणी ते कावळे मांसाच्या तुकड्याकडे निघून जातात आणि गरुडाला सुख शांती मिळते.

14. 14 वा गुण शांती आहे..याचे वर्ण न मला आठवत नाही


15.  अपैशुनम हा पंधरावा गुण आहे पैशुनम् म्हणजे कोणाबद्दल तरी वाईट बोलणे चुगली चहाडी करणे.टिका करणे.
 चुगली करणे माणसांमध्ये हा फार मोठा दोष आहे ती ज्या वेळेला दोन व्यक्ती भेटतात त्यावेळेला बोलण्याच्या नादात ते तिसऱ्याची निंदा करतात ती  करतात त्यातून ते स्वतःलाच  पापाचे भागीदार बनवतात. ते  खिरीत गरुडाने पकडलेल्या सापाच्या मुखातील वीज पडून मेलेल्या ब्राह्मणाची गोष्ट सांगतात.अन ते पाप कोणाला असा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेला साप का गरुड का आचारी का राजा ही कोणीच पापाचे तसे जबाबदार नसतात. परंतु त्या घटनेची निंदा करणाऱ्या व्यक्तीला  या दहा ब्रह्महत्येचे पाप यमधर्म देऊन टाकतो. या गुणाचे महत्व  सांगण्यासाठी ही गोष्ट पुरेशी आहे.
16  दया  कुणाबद्दल सांगताना श्री सांगतात परमेश्वर दयाळू आहे म्हणजे काय आहे ज्या वेळेला तुम्हाला सर्व परिस्थिती अनुकूल असते हीच परमेश्वराची दया असते. दये बद्दल सांगता सांगता ते सांगून जातात कृपा म्हणजे काय तर परमेश्वर ज्या वेळेस तुम्हाला अनुकूल नसलेली परिस्थिती निर्माण करतो. दु:खद परिस्थिती निर्माण करतो की त्याची कृपा असते जेणेकरून त्यामधून तुमचे जमलेले पाप तो शोषून काढत असतो आणि तुम्हाला आपल्या जवळ येण्यासाठी मदत करत असतो.
दया हा गुण कसा असावा तर दया सर्व भूतान प्रति असावी केवळ आपली लोक आपले नातेवाईक त्यांच्या बाबतीतच दया उत्पन्न होऊ नये प्राणी जसे गाई कुत्रा मांजर इत्यादी सर्व प्रकारच्या पशु बद्दल पक्षांबद्दल मनात दया उपजयला हवी .भुतप्रेम ही दयेची अभिव्यक्ती आहे

17 अलोलुप्त्वं17 वा गुण किंवा दैवी संपत्ती आहे लोलुप्य म्हणजे एखादी गोष्ट अतिशय हवी असणे तिचा हव्यास वाटणे.त्या गोष्टीचे व्यसन लागणे

18. मार्दव भव्य म्हणजे सोफ्टनेस मृदुता कुणालाही न दुखावणे.

19ह्रिर म्हणजे.लज्जा . आपण करत असलेल्या कृत्याबद्दल जर, ते कृत्य योग्य नसेल त्याबद्दल लज्जा निर्माण होणे आणि त्यातूनच पश्चातापाची भावना उदय असणे हा दैवी गुण असा आहे. निर्लज्ज माणसे ही एक प्रकारे कठोर असतात आणि त्या कठोर तेथून ते योग्य निर्णय घेतात.

20 अचापलम म्हणजे अस्थिरता अन चंचलतेचा अभाव.
मनामध्ये उठलेले विचार विकार यांचे शरीरावर  प्रतिबिंब न उमटू देणे, स्थिर राहणे. किंबहुना  मनाचे छान चांच्यल वाढेल अशा गोष्टी न करणे.

21 तेज म्हणजे तेजस्विता. अन्याय आक्रमकता अत्याचार या विरुद्ध उभे राहण्याची शक्ती, गुण म्हणजे तेज होय. श्री जी नी याठिकाणी आपल्या देशावर होणाऱ्या आक्रमणाला दिलेल्या उत्तराची उपमा दिलेली आहे अगदी सार्थ आहे.
22. क्षमा या बद्दल बोलताना श्रीजी म्हणतात क्षमा ही त्याचीच असते कि ज्याला दंड करण्याचे सामर्थ्य असते .परंतु तो ते न करता त्या व्यक्तीला माफ करतो
दुबळा माणूस क्षमा करू शकत नाही ती क्षमा म्हणजे त्याचा नाईलाज असतो. तसेच क्षमे चे प्रकार सांगताना, ते मोहग्रस्त क्षमा हा प्रकार सांगतात मुला बद्दल वाटणारी बापाचे जो मोह असतो त्यामुळे तो मुलाचे अपराध पोटात घालून त्याला क्षमा करत असतो
23 धृती म्हणजे धैर्य श्री जी नी हा गुण फारसा विशद केला नाही पण धैर्य म्हणजे संकटामध्ये उभा राहण्यासाठी आवश्यक असलेला गुण आहे रणांगणातून पळ न काढणे, शत्रूला सामोरे जाणे अन्याया समोर उभा राहणे या सार्‍या गोष्टी धैर्यवान व्यक्तीच करू शकतो. त्याच पायावर तीच तेजाची इमारत उभी असते.
24 शौच म्हणजे स्वच्छता ही स्वच्छता सुद्धा देहाची मनाची आणि वाचेच्या असावी लागते. देहाची स्वच्छता आहे ती स्नानादी  गोष्टींनी होत असते. मनाची स्वच्छता मनात सद्गुणाचे संवर्धन करून होत असत। वाचेची स्वच्छता ही सत्य वचनाने मधुर भाषणाने होत असते
25 अद्रोहो  अहो म्हणजे मनात आपण समोरच्या व्यक्तीबद्दल जे वाईट विचार करतो ते होत. आपण समोर त्या व्यक्तीबद्दल तोंडावर चांगले बोलतो, गुणगौरव करतो पण मनी त्याचे वाईट चिंतेत असतो. त्याच्या वाईट झाले तर मनाला आनंदी होत असते, भले आपण त्याच्याबद्दल वाईट कृती करत नाही परंतु त्याच्याविरुद्ध वाईट कृती करायचे विचार आपल्या मनात अनेकदा येत असतात हे असे न घडणे यास  अद्रोह असे म्हणतात
26 सव्विसावा दैवी गुण म्हणजे न अति मान्यता स्वतःबद्दल कुठल्या प्रकारच्या मोठेपणाची आवड नसणे .आपण कोणीतरी मोठे आहोत अशी ग ची भाषा नसणे हे अमानीत्व, बऱ्याच वेळेला कुणाला अधिकार मिळतात, पदामुळे मिळालेले अधिकार, नशिबाने मिळालेले अधिकार पण हे त्या व्यक्तीला कळत नाही.की ते त्या पदाला खुर्चीला मिळालेले आदरातिथ्य मानसन्मान स्वतःचेच असे मानून घेतो .तर त्याबद्दल सावध राहणे व तो मान मान्यता आपले नाही हे ज्यांना कळते ते अमानित्व.

हे गुण दैवी संपत्ती जी जन्मला घेऊन आलेल्या मनुष्याची असतात.
*****
श्री.ज्ञानराज माणिक प्रभु महाराज

बुधवार, १८ मे, २०२२

श्री जी चे प्रवचन सार दिवस १

श्री जी चे प्रवचन सार 
*********†*****

ठाणे येथे ज्ञानेश्‍वर मंदिरात निवृतीनाथ सभागृहांमध्ये श्री ज्ञानराज माणिक प्रभू यांची भगवद्गीतेवर प्रवचन चालू आहेत त्यातील पहिल्या प्रवचनाचे सार सहज आठवेल तसे देत आहे.
***

भगवद्गीता हीच ही एकंदर तीन भागात वाटली गेली आहे पहिला भाग एक ते सहा अध्याय कर्मयोग सहा 7ते 13अध्याय भक्तियोग 14 ते 18 ध्यान ध्यान योग किंवा प्रॅक्टिकल.
अर्थात हे विभाग (ग्राॉसली) स्थुळ आहेत .

त्यापैकी सोळाव्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती त्याचे विश्लेषण भगवान करत आहेत 
याआधीचे म्हणजे 14 ,15 यामध्ये भगवंतांनी वर्णन केलेले आहे ,ते म्हणजे मीच सर्वकाही आहे आणि माझ्या पर्यंत पोहोचल्यावर  कुणी हि मागे परत येत नाही . या अर्थाने ज्ञान  सांगीतले आहे

भगवंतांनी पहिल्या चार लोकांमध्येच 27 दैवी गुण कोणते ते वर्णन केले आहे बाकी उरलेल्या चोवीस श्लोकांमध्ये आसुरी आणि राक्षसी गुणांचे वर्णन केले आहे

राक्षस कोण तर जे द्वेष करतात ते .हे राक्षस धर्माचा, गुणी लोकांचा, देशाचा,  यशाचा द्वेष करतात.
आणि जे सदैव शरीर मग्न असतात ते असूर त्यांना दैवी गुण तर आवडतच नाही त्यांना फक्त खावो-पिवो मजा करो हेच आवडते
हेच   त्यांच्या जीवनाचा सूत्र असते त्यापलीकडे जीवन जगणे आहे यावर तुमचा विश्वास सुद्धा नसतो

पहिला दैवी गुण अभय(१). 
अभय असणे आणि निर्भय असणे यात फरक आहे  गुंड दरोडेखोर हे सुद्धा निर्भय असतात पण पोलिसांना पकडल्यावर ते शिक्षेला सामोरे जातांना त्यांच्यातील भय उघड होतं 
अंतरात  ते भयभीत असतात. त्यांचे  भय दाबण्यात आलेलं असतं .अभय खरोखर सर्वकाळी सर्व देशी सर्वत्र समान असते. मनामध्ये अभय निर्माण होण्यासाठी भक्ती आणि विवेक असावे लागतात दोन गोष्टीच अभय निर्माण करतात जगात प्रत्येक गोष्टीला भय असते उदा. चोराला राजाची किर्तीला अपयशाची भीती असते इत्यादी
दुसऱ्या गुण (२)आहे सत्व संशुद्धी  सत्व म्हणजे अंतकरण .अंतकरणाची शुद्धी 
सं शोधन म्हणजे संपूर्ण मुळातून सर्वथा .
अंतकरणाचे मन बुद्धी चित्त इत्यादी 4 भाग असतात अंतकरण चतुष्टय असे त्यास म्हणतात 
सर्वांची शुद्धी होणे फार महत्त्वाचे आहे

तिसरा गुण(३) आहे ज्ञानयोग व्यवस्थिति म्हणजे ज्ञान योगात स्थिर होणे. महाराज याला ट्रेनमधून खाली उतरल्यावर ते पाच मिनिटांसाठी इडली वडा खाण्याचे उदाहरण देतात म्हणजे प्रत्येक क्षणी प्रत्येक मिनिटाला आपल्या मध्ये ज्ञान मिळवायचे ओढ जागी राहिली पाहिजे लक्ष  ज्ञानाकडे असले पाहिजे

चौथा (४)गुण दानाचा आहे दानाला आपल्या धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे दाना मुळे आपली आसक्ती कमी होते. आपल्याला मरताना सगळं सोडून जायचं आहे त्यामुळे सोडायची सवय लागणं  महत्वाचे आहे अन्यथा लोभग्रस्त होऊन मन आपल्या वस्तू मध्येच अडकून पडते. दानाचे महत्व यासाठी आहे की त्यामुळे आपण केलेल्या पापाचे परिमार्जन सुद्धा होते.
पाच(५) गुण हा दम, दमन आहे याचा अर्थ आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवणे .इंद्रिय ही सदैव बहिर्गामी असतात डोळे रूपासाठी जीभ चवीसाठी त्वच्या स्पर्शासाठी आसक्त असते  त्याना तिथून फिरवून मनामध्ये स्थिर करायचे असते. असे आतमध्ये वळवायचे  कर्म  तेच दम
यज्ञ हा सहावा ६ गुण  आहे आपण जे काही करतो ते देवासाठी करणे आत्म्यासाठी करणे याचं नाव यज्ञ 
जेवणाआधी देवाचे नाव घेणे प्रार्थना करणे हा यज्ञ आहे पूजा प्रार्थना हे देवाचे आभार मानण्याचे साधन आहे थँक्स गिविंग आहे काही मागण्यासाठी पूजा-प्रार्थना नसते.हे सारे यज्ञ आहे

या पुढचा गुण (७) आहे तो म्हणजे स्वाध्याय. स्वाध्यायचे दोन अर्थ आहेत स्वत:चा अध्याय स्वतःचा अभ्यास. आपण दिवसभर काय केले कसे वागलो किती पुण्य केले किती पापे केली किती देवाजवळ होतो किती दूर होतो त्याचे निरीक्षण करणे. याशिवाय संतांचे वचन ग्रंथ गीता ज्ञानेश्वरी वाचणे हे सुद्धा स्वाध्याय आहे ..
पुढचा गुण (८)आहेत तप म्हणजे तपणे, तापवणे स्वच्छेने शरीराला कष्ट देणे कारण मरणाच्या वेळेला देहाला अनंत स्पष्ट होतात अनेक व्याधी आधी ग्रासून टाकतात त्यावेळेला मन त्यात गुंतून जाते आणि देवाचे स्मरण होत नाही म्हणून या देहाच्या कष्टांना सवय म्हणून आणि कष्टा मध्ये सुद्धा ती देवाकडे लागलेली असणे याची ही तयारी आहे किंवा शिक्षा पद्धती आहे असे म्हणता येईल. त्यापुढचा गुण (९)आहे तो म्हणजे आर्जव .आर्जव म्हणजे ऋजुता सोफ्टनेस बोलताना वागताना येणारी नम्रता.सरळता होय.

श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराज.प्रवचनातून 


मंगळवार, १७ मे, २०२२

नृत्य.


नृत्य
*****
चार क्षणात वीजाच
गेल्या चार चमकून 
जेव्हा तुझी पाऊले ती
गेली उगा थिरकून

जशी हवेच्या झोताने 
वेल जावी लहरून 
नवतीच्या हिर्वेपणी
भाव यावे बहरून 

गीत जणू तुच झाली 
शब्द उमटले देही 
स्वर जणू तुच झाली 
अर्थ उमटले पायी 

नुपुर नव्हते पदी 
तरीही मनी गुंजले 
शब्द जरी नच ओठी 
मनामध्ये ओघळले 

त्या क्षणावर लिहले 
जरी की नाव तू तुझे
एक गाणे मनामध्ये 
उमलून आले माझे 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


सोमवार, १६ मे, २०२२

भोंदू गुरू

भोंदू गुरू 
*******:

जर तुमचा भोंदू गुरू 
तुम्ही टाकलात तर 
पडाल उघड्यावर 
म्हणून घाबरू नका 

डोळे घट्ट बंद करून 
वर भीतीची पट्टी बांधून 
सूर्य उगवणार नाही म्हणून 
स्वतः ला बजावू नका 

मान्य आहे मला की 
तुमची भक्ती आहे वादातीत 
तुम्ही आहात पूर्ण समर्पित 
पण लुटले जाऊ नका 

चुकतो आपण खूपदा 
वस्तू विकत घेतानाही 
म्हणून बाजार टाकत नाही 
तो तुमचा शोध थांबवू नका 

होतात अपघातही कधी 
गाडी चालवता चालवता 
चुकतो सिग्नल आणि फाटा 
म्हणून रस्त्यास दोष देऊ नका 

हा शोध महत्त्वाचा आहे 
तो लागो अथवा न लागो 
गंतव्य मिळो अथवा न मिळो 
पण चालणे सोडू नका 

इथे दु:ख अन वंचना आहे 
तितिक्षा अन परिक्षा आहे 
पण एक पूर्णता नक्की आहे 
ती अमोल संधी डावलू नका 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, १५ मे, २०२२

भगवान गौतमबुद्ध

भगवान गौतम बुद्ध
**********
जर त्या युवराजाला 
नसतेच पडले प्रश्न 
जन्म मृत्यू अन जरेचे 
नसतेच उठले वावटळ 
अंतरात मुमुक्षुत्वाचे
तो राहिला असता रममान 
आपल्या सुखोपभोगात 
गुरफटलेला सुंदर पत्नीत
रमलेला छोट्या बाळात  
राजोपभोगात विलासात 
जसे राहिले जगले आणि मेले 
हजारो राजे-महाराजे 
तर हे जग 
आहे त्यापेक्षा 
खूपच विद्रूप झाले असते 

ते एक फुल फुलले पृथ्वीवर 
अन हजारो हृदयात 
नंदनवन फुलले 
असे नाही की या देशात 
संत झालेच नाहीत 
तत्त्वज्ञ जन्मलेच नाही 
योगी उपजलेच नाहीत 
ही भारत भूमी तर अशा 
अगणित रत्नांची खाणच आहे .
पाहता पाहता 
डोळे दिपून जावीत 
मोजता मोजता 
आयुष्य संपून जावीत 
पण हे रत्न वेगळेच होते 

त्यांनी प्रतिपादन केले सत्य 
सत्यावर असलेला प्रत्येकाचा हक्क
 नाकारली वर्ण व्यवस्था 
नाकारली जातीव्यवस्था 
नाकारला लिंगभेद 
आणि यातूनच जन्माला आला 
एक संपूर्ण मनुष्य धर्म 
प्रखर  प्रज्ञेवर आधारलेला 
प्रचितीस सत्य मानणारा 
करूणेने ओतप्रोत भरलेला 
सु - शीलतेने नटलेला 
तेथे स्पर्धा नव्हती 
प्रचार नव्हता 
बळजबरी ही नव्हती 

तो आकाशात पाझरणारा 
पूर्ण चंद्र होता 
भर वैशाखात शांती देणारा 
निशीराज होता 
हृदयात मांगल्य पवित्रता 
उदारता भरणारा 
सारी धग शोषून घेणारा 
शुभ्र मोगरा होता 

तो गौतम तर होताच कधी 
तो बोधीसत्व ही होता कधी 
पण भगवान बुद्ध झाला तेव्हा 
त्याच्यातून पाझरला 
तो दिव्य प्रकाश 
मानवाच्या मुक्तीचा 

दु:खातून मुक्ती
अज्ञानातून मुक्ती 
अंधकारातून मुक्ती 
भेदाभेदातून मुक्ती 
उच्चनीच स्त्री पुरुष 
सार्‍या भेदातून मुक्ती

म्हणूनच 
माणुसकी जाणणारा 
प्रत्येक मनुष्य करतो नमन 
शतवार त्या महायोग्याला 
महावीराला महानायकाला 
भगवान श्री गौतम बुद्धाला !
अन ध्यानाचे फुलुुन आलेले 
फुल अर्पितो त्या पद कमलाला !!

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

जखमेवर मीठ


जखमेवर मीठ 
*****:*****:

ज्याने माझ्या राजाला 
हाल हाल करून मारले 
त्याचे डोळे फोडले 
त्याची चामडी सोलली 
मेल्यावरही तुकडे तुकडे 
करून टाकले 
आपल्या राक्षसी वृत्तीने 
कोत्या खुज्या श्रद्धेने
असंख्य मंदिर तोडली 
देव फोडली देऊळं लुटली 
त्यावर उभी केली 
त्याची श्रद्धा स्थान 

ज्याने माझे हजारो 
बंधू कापून काढले 
ज्याच्या सरदारांनी 
आणि शिपुर्ड्यानी 
माझ्या लाखो माय बहिणींना 
बलात्काराने ओढून नेले 
जनानखान्यात कोंडले
आपली अवलाद वाढवणारी 
जिवंत यंत्र बनवले 

त्याच्या थडग्या पुढे 
कोणी नतमस्तक होत असेल 
फुले वाहत असेल
चादर चढवत असेल
सन्मान करत असेल 
जाणून बुजून 
आमच्या जखमेवर 
मीठ चोळून

तर त्या महाभागाला
मोठे म्हणणे नेता ठरवणे
त्याच्या हात हातात धरणे 
त्याच्या पंगतीत बसणे 
त्याला आदरार्थी बोलणे 
हा आमचा षंढपणा ठरेल 

आणि ते
जे चार दिवसांच्या सत्तेसाठी 
करतात लाळघोटेपणा 
त्याच्यासमोर 
झोडतात त्याच्या पार्ट्या 
करतात जयजयकार
ते  तर वारांगणाच ठरतात .

आणि मला कळत नाही 
कि ही लोक आपल्या वाचेने
महाराजांचे नाव तरी
कसे घेऊ शकतात?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

दत्त माय


दत्त माय
********
कैसा जीवनाचा
चालला प्रवास
अवघे सायास
करू जाता ॥१

सदैव समोर 
असतो उतार 
न मिळे आधार 
थांबावया ॥२

नामाची ती काठी 
मिळता हातात 
बळ पावुलात
येते काही ॥३

ध्यानाचे झुडूप 
येता जीवनात 
होय यातायात 
सहनही ॥४

पण कधीकधी
पडताच खाली 
वेदना आरोळी 
मुखी येता ॥५

धावे दत्त माय
प्रेमे सावरते 
हातास धरते 
चालविते ॥६

किती रुपातून
किती हातातून
घेते सांभाळुन 
प्रेमळास ॥७

विक्रांता पातला
किती अनुभूती 
जीव तयाप्रती 
वाहीयला ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘




शनिवार, १४ मे, २०२२

ते डोळे

ते डोळे
*******

ते डोळे 
विस्फारलेले
मोठमोठाले
थांग नसले
डोह जाहले

ते डोळे 
बावरलेले
किंचित खुळे 
भान विसरले 
हरखून गेले

ते डोळे 
केसा आडले 
लज्जित ओले
काजळ ल्याले 
दूर थबकले 

ते डोळे 
नितळ काळे
टपोर भोळे
भूल पडले
जीवन भरले

ते डोळे 
हरखून गेले 
मनी ठसले 
गीत जाहले 
वसंतातले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘४५२

केतकीचे शब्द

केतकीचे शब्द
***********
कुठे घोस केतकीचा
कुठे चंद्र शरदाचा ? ॥

एक शब्द मतासाठी 
एक शब्द सत्वासाठी ॥

म्हणताच कुणी अरे 
तेथे उमटतो का रे ॥

जातिभेद गाडा सारा 
धर्मध्वज हाती धरा ॥

बोलू नये जाणत्याने 
ज्याने दुखावती मने ॥

अजाणाचे शब्द तेही 
नको करणारे लाही ॥

जग सारे जाणते रे 
पाणी कुठे मुरते रे ॥

घेत हाती फावडे ते 
कोण पुढे धावते ते ॥

खणू नका कुणी अरे 
रोप मराठी ते मरे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शुक्रवार, १३ मे, २०२२

दत्त सर्वव्यापी


दत्त पाहिला 
*********
दत्त पाहिला जनात 
दत्त पाहिला मनात 
दत्त पाहिला वनात 
दत्त ठाई ठाई ॥१

दत्त पाहिला प्राण्यात
दत्त पाहिला पक्षात
दत्त पाहिला वृक्षात 
दत्त कणोकणी ॥२

दत्त पाहिला पाण्यात 
दत्त पहिला धान्यात 
दत्त पाहिला अन्नात 
दत्त प्रसादात ॥३

दत्त पाहिला डोळ्यात
दत्त पाहिला मनात 
दत्त पाहिला हृदयात 
दत्त अंतर्बाह्य ॥४

दत्त  पाहिला स्थुळात 
दत्त पाहिला सूक्ष्मात 
 दत्त पाहिला सर्वांतरात
 दत्त महाशून्यात ॥५

दत्त उणे या जगात 
काही दिसेना विक्रात 
दत्त गाण हे दत्तात 
उमटे कौतुकात ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, १२ मे, २०२२

असे कसे म्हणू


असे कसे म्हणू
***********

जर का तू अजूनही
सापडली नाहीस मला
तर तू हरवली आहेस
असे कसे म्हणू मी तुला॥

जर का तू  अजूनही
दिसलीच नाहीस मला 
तर तू कळली आहेस 
असे कसे म्हणू मी तुला॥

तुझे सोनसळी लावण्य 
अन उर्जेचे  अवतरण
मजला जाणवत नाही 
असे कसे म्हणू मी तुला॥

एक अनाकलनिय 
गुढ तरीही हवे हवेसे
अनूभुतीचे जग नकोय
असे कसे म्हणू मी तुला॥

येण्या जाण्याचे सारेच
स्वातंत्र्य आहे तुला
तू बेपर्वा चंचल आहेस
असे कसे म्हणू  मी तुला॥

शक्ती वृती जगण्याची 
आस प्यास ह्रदयाची
तुुला विसरून जगावे
असे कसे म्हणू मी तुला॥

स्वप्नांचा देश दाखवते 
सुखाची सावली होते
तुझी प्रतिक्षा सुंदर नाही
असे कसे म्हणू  मी तुला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, ११ मे, २०२२

जुगार


जुगार
******
खेळलो बहुत खेळ हा शब्दांचा 
भक्तीचा प्रेमाचा दत्तात्रेया

फिरवून शब्द तेच मागितले 
अक्षरी घोटले प्रेम तुझे 

पाहियली स्वप्ने मनाच्या मुक्तीची 
नि:संग चित्ताची पुन्हा पुन्हा 

लाविले पणास अवघे जीवन 
पाठ फिरवून आकांक्षांना

फुका गेला डाव बहुदा खेळून 
जाणार येथून रिक्त हस्त 

सारेच जुगारी कुठे जिंकतात 
तरीही येतात खेळायला 

जिंकण्या तुजला येईल परत 
राहिल खेळत विक्रांत हा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘१८९

मंगळवार, १० मे, २०२२

ती.. युक्रेन मधली /काश्मिर मधली/आणि कुठली कुठली. . . .

ती.. युक्रेन काश्मिर मधली/आणि कुठली कुठली. . . 
**************::*

कोसळून पडू नकोस 
हे माझ्या प्रिय घरा 
ढासळून जाऊ नकोस 
हे माझ्या प्रिय घरा 

धरून ठेव 
आधाराचे पिलर
भिंती घट्ट धर 
विटा पक्क्या धर
धरुन ठेव छत
घट्ट बीम धर 
आधाराचे पोलाद 
गळल्या वाचून 
गंजल्या वाचून
ठेव  वाचवून
माझ्यासाठी स्वत:ला 
ठेव राखून

मी नक्की येईल 
घरी परत 
तेव्हा तू माझे 
कर स्वागत

तुटतील दारे 
कडाडत 
पडतील खिडक्या 
धडाडत 
फुटतील काचा 
खच  होत
कोसळतील तावदाने  
निखळत 

मला माहित आहे 
हौसेने लावलेले रंग 
पडतील काळपट 
धूराने दारूने 
उडणाऱ्या धुळीने 
तेज हरवत 

जमवलेले सामान 
जाईल चोरीला
पडेल कुणा उपयोगाला
ते ही बरेच  पण 
काही विखुरले जाईल
तर काही तोडून मोडून 
फेकले जाईल बाहेर 
हरवेल सार

तो सोफा तो पियानो 
तो शोकेस तो ऑर्गन 
कदाचित होतील 
छिन्न भिन्न.
वेळ नाही मला 
ते डीश उचलायला 
बेडशीटची घडी घालायला 
गाद्या झाकायला 
नाईलाज आहे माझा
असे एकटे सोडते तुला 

आकाशात घरघर 
होऊ लागली आहे 
रणगाड्यांची धडधड 
ऐकू येऊ लागली आहे 
सायरन वाजू लागले आहे
आता त्वरा केली पाहिजे 
मला हवे निघायला 
हे कुशीतले बाळ 
हवय सांभाळायला

पण निघता निघता 
एवढेच सांगते 
हे माझ्या घरा 
तू म्हणजे मीच आहे 
तुझ्या कणाकणात 
अन कोपऱ्या कोपऱ्यात 
माझे अस्तित्व आहे 

तुझ्या पासून दूर राहणे 
म्हणजे माझेच 
दोन भाग होणे आहे 
पण मी कुठेही असेल 
अन कशीही असेल 
सदैव इथेच असेल 
हे माझ्या प्रिय घरा.......... . .


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


सोमवार, ९ मे, २०२२

हासताच तू

हासताच
******

बदलून रंग डोळ्याचे 
तू तेव्हा हासली होतीस
मग मीही बदललो थोडा
तू मनात बिंबत होतीस
हलवून हात लगेच 
तू पुन्हा निघाली होतीस 

एकेक केस मोकळा 
वाऱ्यावर लहरत होता
गीत धुंद यौवनाचे 
गंध हवेत दरवळ होता 
विझणार्‍या आकाशात 
अंगारही हलकाच होता 

मग पुन्हा झाला अंधार
पुन्हा उगवला तारा
वाळूवर वाहत्या लाटा 
प्राणात पहुडला वारा 
दाटला व्याकूळ एकांत 
जगण्याची झाली कारा 

अवसेच्या अंधारात 
दिसतेच लख्ख आभाळ 
तम भरल्या अरण्यात 
काजवाच गमतो जाळ
पडताच पुढती पाऊल 
ये कानात कुणाची हाळ .

हे जगणे असेच असते 
कळणाऱ्याला कळते
असण्याच्या तावावरती
कविता एक उमटते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘













रविवार, ८ मे, २०२२

येवो कळवळा


येवो कळवळा
***********
विटल्या सुखाचा 
मनात कल्लोळ 
वाहती ओघळ
नको ते रे ॥१
कैसे मज देवा 
असे फसविले 
संसारी गोवले 
असक्तीच्या॥२
धनदारा सुत 
ठेविले मानात 
ठकविण्या हात 
कोणा ऐसा ॥३
चोरले आयुष्य 
भजना वाचून 
माप ते देऊन  
तोट्यातले॥४
तुझिया मायचे
कळू ये लाघव
परंतु उपाव
सापडेना ॥५
तुझिया वाचून 
तारी अन्य कोण 
म्हणून शरण 
येई तुज ॥६
विक्रांत फुंकतो
दिवाळे विठ्ठला 
येवो कळवळा 
आता तरी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘१३३

शनिवार, ७ मे, २०२२

कृपेचा वारा


कृपेचा वारा .
************
कृपेचा तो वारा 
यावा माझ्या दारा 
आणि मी भरारा 
उडू जावा ॥
कस्पटास ठावे 
काय कुठे जावे 
उगे वा रहावे 
कोपर्‍यात ॥
अगा मी ओवळा 
धुळ माखलेला 
प्रारब्धी पडला 
जगण्याच्या ॥
उडण्याचा अंत 
जरी भूमीवर 
कणकण क्षर 
ठरलेला ॥
परी नसण्याचा 
स्पर्श असण्याला 
घडावा जीवाला 
हीच आस ॥
विक्रांत पथात 
पायी अंगणात 
पाउले स्मरत 
श्री दत्ताची ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


शुक्रवार, ६ मे, २०२२

जाणीव जगत


जगत जाणीव
**********
डोळे मिटतात स्वप्न सजतात 
सुख पाहतात आत्मरंगी ॥
परी कानावर पडतो कल्लोळ 
होय होरपळ श्वासात या ॥
पेटल्या मशाली येती डोळ्यावर 
उठवते वेळ पहायला ॥
मना पलीकडे शब्दातीत सुख 
संतांचे कौतूक खुणावते ॥
निगुढ निशब्द प्रज्ञेचा तरंग 
येतो अंतरंग पालवीत ॥
एका निमिषाचे केवढे अंतर 
अनंत पदर पापण्यात ॥
स्वप्न सत्य कधी असे दोन होते 
आत-बाहेर ते वेगळाले ॥
जाणीव जगत भेद हा धूसर 
मन मनावर आरोपीत ॥
विक्रांत जगत पाहतो सुंदर 
शून्यात अपार हरवतो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, ५ मे, २०२२

ओढ


ओढावते
********

नको नको म्हणतांना 
मन ओढावते मोही 
कडाडते वीज नभी
जाळ उमटतो देही 

सुखातल्या सुखासाठी 
अनावर वृत्ती होते
माझ्यातले माझेपण 
पानावर लहरते

मिटायचा क्षोभ जरी 
उरात या पेटलेला 
कसा कुठे कुणीकडे 
मेघ असे दाटलेला 

शब्दात त्या हरवावे 
स्वरामध्ये चिंब व्हावे
गंध उरी भरूनिया
रंग रूपी वितळावे

केसातले मेघ निळे
डोळ्यावर ओणवावे
दूर रानी टिपूरसे 
चांदण्याचे गीत गावे 

चित्र म्हणू स्वप्न किंवा 
घनदाट धुके होते 
शहारते भान सारे 
वारे हरवून जाते 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


बुधवार, ४ मे, २०२२

मौन

मौन
****
आता बोलणे हे 
सारे व्यर्थ आहे
अर्थशून्य सारे 
संवादही आहे ॥

शब्दाचा आशय 
शब्दात अडतो 
मनातला भाव 
मना न कळतो ॥

तिथे कुणी कोणा 
काय ते सांगावे 
बंद दारावरी 
डोकेची फोडावे ॥

निरर्थ सतार 
तुटताच तार 
कोसळते झाड 
फुटताच पार ॥

सांभाळणे सारे 
कुण्या हाती आहे 
त्याहुनी बरे की 
उगा उगा राहे ॥

विक्रांता मौनची 
आता पांघरावे 
शिवशिवे जीभ
ओठ बांधू  घ्यावे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

मंगळवार, ३ मे, २०२२

शहर


शहर
******
 शहर घडते शहर मोडते 
कळल्यावाचून क्षितिज बुडते 
तोच सूर्योदय तोच तो सूर्यास्त 
सावल्या विक्राळ होती अस्ताव्यस्त 
भरला अंधार तळमजल्यात
आवळतो पाश होतो घनदाट 
वृक्ष कत्तलींचे भेसुर शहर 
मुक  चित्कारांचे होते कुरुक्षेत्र 
जगायला येती कोण ते कुठून 
इथल्या अंधारी जातात संपून 
कोणास खुराडे कुणा काडेपेटी 
अनामिक एक अंतही शेवटी 
शहराची भूक मिटता मिटेना 
रांग येणाऱ्याची थांबता थांबेना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

मित्र


मित्र
*****

चमकती चार 
नक्षत्र सुंदर 
मैत्रीचा आधार 
सदा खांद्यावर ॥१

लाभणे हे मैत्र 
भाग्य खरोखर 
उधळती जीव 
जिथे जीवावर ॥२

ठरविल्याविन 
मित्र भेटतात 
अन आयुष्याला 
प्रकाश देतात ॥३

आपणा अंतरी
मित्र कळतात  
लिहल्यावाचून
शब्द दिसतात ॥४

मागणे न जिथे 
मैत्री असे तिथे 
किती सहज ते 
देणे परी घडे ॥५

भेटताच मित्र
जपावे सर्वदा  
कधी व्यवहार 
केल्याविन वादा ॥६

विक्रांता दुरस्थ 
मित्र अंतरात 
सदैव तयांचे 
सुयश चिंतित ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

सोमवार, २ मे, २०२२

लळा


लळा
****

असा कसा लळा
तुझा रे विठ्ठला 
लागला जीवाला 
नच कळे ॥१

जरी भक्ती उणा 
जाणे तुझ्या खुणा
रूप डोळीयांना 
भिजवते ॥२

तुझ्या रावुळात 
होतो असा सान
मज आठवण 
नये माझी ॥३

तुझ्या दर्शनात 
कोण कुणा पाही
कोण कुणा घेई
हृदयात ॥४

ज्ञानोबाचे शब्द 
झरती मनात 
विक्रांत सुखात 
डोलतसे ॥५ .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...