सोमवार, २४ मार्च, २०२५

श्रद्धा

श्रद्धा
****
मुक्काम तर नक्की येईल 
चालणे थांबू नये कधीच 
पाय दुखतील खूपतील 
रडणे घडू नये कधीच ॥१
वाटा नागमोडी वळणाच्या 
वाटा उंच चढउताराच्या 
होईल त्रास चालण्याचा 
चिडणे घडू नये कधीच ॥२
भेटतील साधू सज्जनही 
भेटतील खट लुटेरे ही
देतील कुणी वा सर्वस्वही
बंधन घडू नये कधीच ॥३
मंत्र सदोदित चालण्याचा 
तुझ्या अन् माझ्या जीवनाचा 
माय शिकवते पुन्हा पुन्हा 
अरे विसरू नये कधीच ॥४
संकटे येथील अचानक 
घटना घडतील थरारक 
दृढ विश्वास परी तो एक 
श्रद्धा सुटू नये कधीच ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २२ मार्च, २०२५

दरवळ उपक्रमासाठी

दरवळ (उपक्रमासाठी )
******************
तो दरवळ तुझ्या स्मृतीचा 
असतो वाहत माझ्या सभोवत 
तुझ्या सहवासातील ते इवले क्षण 
राहतात माझ्या मनी झंकारत 

आता तर तू हाकेच्या पलीकडे 
करून बंदिस्त स्वतःला दुसऱ्या जगात 
आणि माझे असणे जगरहाटी 
चाललेय त्याच त्याच आवर्तनात 

भेटशील तू कधी वा न भेटशील 
धरणात तुझ्या तू बंद  राहशील 
पण हा दरवळ पूरे आहे मला 
माझी उरलेली वाट चालायला 

तो पाऊस तेव्हा कोसळलेला 
तो वसंत तेव्हा फुललेला 
वसतो आहे माझ्या रंध्रा रंध्रात 
अन् मी आहे त्यांना धन्यवाद देत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २१ मार्च, २०२५

शिकार

शिकार
*****
शब्द चांदण्याचे 
भूल पाडतात 
नेती आडरानी 
चकवा देतात  १

स्पर्श तरंग ते  
सुख वर्षतात 
भोवरे होवून 
तळाशी नेतात २

डोळे लकाकत  
खोल घुसतात 
जग तोडोनिया 
वेदना देतात ३

स्मित सुमनाचे 
वाट मोडतात 
वणवा जीवना 
आग लावतात ४

अगा अवघे हे 
पारधीचे गाणे 
भुलता हरीण 
प्राण पडे देणे ५

दिसे दूरवर 
अमृताचे तळे 
धाव धावूनिया 
मृगजळ मिळे ६

असे हा जिहाद
खुळ्या प्रेमासाठी 
बाण  मखमली 
शिकार शेवटी  ७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २० मार्च, २०२५

शल्य

शल्य
****
पुन्हा पुन्हा तुझे गाणे मनात या उमटते
त्याचं शब्दी त्याच वृत्ती पुन:पुन्हा जन्म घेते ॥ 

पुन्हा पुन्हा तीच वाट मज नागमोडी दिसे 
तीच तुझी पडछाया तेच येणे पुन्हा भासे ॥

तुझ्याविना जीवन हे चाले नीट नेटकेसे 
घरदार संसार हा सारे काही ठीक असे ॥

माळेतील मणी जणू ओवलेले एकसरी
हरवला कोणी जरी नवा तया जागेवरी ॥

परी दोर जाणतोच कोण कुठे निसटले 
मौन त्याची गाठ घट्ट शल्य असे झाकलेले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

बुधवार, १९ मार्च, २०२५

हट्ट

हट्ट
****
एक हट्ट माझा पुरवी दयाळा 
माळ तुझी गळा पडो माझ्या ॥

एक स्वप्न माझे येऊ देत फळा 
पाहू दे रे डोळा रूप तुझे ॥

एक अर्थ माझ्या देई रे जीवना 
पायीच्या वाहणा करी मला ॥

अगा ज्ञानदेवा जीवीच्या जिव्हारा 
पावुलाशी थारा देई मला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

मंगळवार, १८ मार्च, २०२५

आळंदीत

आळंदीत
********
चालला गजर राम कृष्ण हरी 
 नाद नभावरी दुमदूमे ॥

 वाहे खळखळ इंद्रायणी जळ 
जाय मनोमळ वाहूनिया ॥

वैष्णवांची दाटी लाट लाटेवरी
पुण्य भूमीवरी पुण्यमूर्ती ॥

जया जैसा भाव तया तैसे फळ
माऊली दयाळ देत असे ॥

भारलेले क्षण दिव्य कणकण 
गेलो हरखून पाहुनिया ॥

विक्रांता जाहले जड देह ओझे 
चित्त चैतन्याचे साज ल्याले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

सोमवार, १७ मार्च, २०२५

सावल्या

सावल्या
****
जरी जीव खुळा उतावीळ होता 
कुणासाठी तरी टाळल्या मी वाटा 

कुणासवे तरी थांबलो बोलता 
मनात असंख्य असून कविता 

कुणा सवें झालो तटस्थ उदास 
कोरडी करून डोळ्यातील आस 

असेल कुठल्या जन्माचे हे देणे 
अथवा पुढे हे ऋण मी फेडणे

किती सोडवल्या बसलेल्या गाठी 
 नच येवू दिले नाव ते ही ओठी

परी कानी येती कुठले हे सूर 
विराण एकांती उरी का काहूर 

सुटूनिया गेले गाव दूरवर
तरी खुणावती वाटा का धूसर

हालती सावल्या मनात दडल्या 
चाहुली वाचून भोवती दाटल्या

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...