गुरुवार, १३ जून, २०२४

खेळ

खेळ
.****
दुःख दबकत्या चाली 
येते निजलेल्या घरी 
व्यथा अंधार काजळी 
जाग साकळते डोळी ॥१
होती सांज सजलेली 
धुंद गंधाने व्यापली 
मंद मदीर झुळूका 
स्वप्न गूढ रंगलेली ॥२
सारे खेळच शेवटी 
तना मनात नाचती 
जगी लाख बुडबुडे 
नाही कोणाची गणती  ॥३
मनी निर्धार करून 
घेई पुसूनिया पाणी 
रात्र जायची अजूनी
धरी संकटे रोखुनी ॥४
नसे कधी मरणात 
भय असते मनात
देई झुगारुनी भीती 
सुख दिसते क्षणात ॥५
बाकी संकटाची कथा 
ती तो चाले अविरत 
नच थांबते नाटक 
पात्र जाती बदलत ॥६
प्रीत स्नेहाची मंगल 
देई झुंज कळीकाळा
असे मध्यंतरी आता 
रंग येईल रे खेळा ॥ ७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .


बुधवार, १२ जून, २०२४

दलाल




दलाल
******
काय वाढवले तुझे तू दलाल 
झाले मालामाल देवराया ॥
कष्टाविना द्रव्य येई आपोआप 
घेऊन या माप श्रद्धेचे ते ॥
कोण कुठे करे कैसे अनुष्ठान 
कुणाच्या नावानं हास्यास्पद ॥
करे कि ते नाही कोण पाहतसे 
दान तो देतसे अंधपणे ॥
देवाचा बाजार बाजारात देव 
भयभीत भाव पोसतसे  ॥
धर्मात लपले विज्ञान तो जाणे 
त्याला हे खेळणे सारे वाटे ॥
ऊर्जेची स्पंदने जयास कळती
तयास मध्यस्थी नको वाटे ॥
विक्रांत साक्षीत उभा असे द्वारी 
दत्त निराकारी जाणवेत ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, ११ जून, २०२४

झाड


झाड
****
फांदीफांदी वठलेली पानंपानं सुकलेली 
कलथून खोड जुणं अर्धी मुळे उन्मळली
तरी झाड पडेना माती काही सुटेना ॥१

जरी आभाळ जमेना सावली काही धरेना
जीर्ण शीर्ण फांदीवर वेडा पक्षीही बसेना
तरी झाड रडेना आस काही सरेना ॥२

स्वप्नाची ती साद नाही मेघाची ही साथ नाही
आणि पहाटे भुवर दव ते उतरत नाही
तरी झाड हालेना हट्ट आपुला सोडेना ॥३

तापलेला कणकण मरणारा क्षणक्षण
सर्वदूर भितिजा पर्यंत फक्त एक मरण
तरीही झाड मोडेना पांढरे निशाण लावेना ॥४

प्रेम मरत नसते आस तुटत नसते
आषाढाचे स्वप्न उरी सदा झुलत असते
म्हणून झाड मरेना वेल मनीची सुकेना ॥ ५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .


सोमवार, १० जून, २०२४

खरा


खरा
****

तोच तो उजेड सदा खरा असे 
प्रतिबिंब ज्यात स्वरूपाचे दिसे ॥१

तेच ते स्पंदन  सदा खरे असे 
माझेपण ज्यात मला नच भासे ॥२

तोच तो ध्वनी रे सदा खरा असे 
कोलाहल जगण्याचा ज्यात नसे ॥३

कळता गूढ हे मौन जागे झाले 
माझे पण मग प्रकाशात न्हाले ॥४

विक्रांत दत्ताचा दत्ते उजळला 
पुन्हा जीवनाचा अर्थ कानी आला ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .


रविवार, ९ जून, २०२४

प्रेमाच्या थपडा


प्रेमाच्या थपडा
************
कर्ता करविता 
प्रभू गुरुदत्त 
रक्षतो सतत 
भक्ता लागी ॥१
पुसतो अक्षरे 
शापित माथीची 
लावता तयाची 
पायधूळ ॥२
घेतो सांभाळून 
अडता पडता 
देऊनिया हाता 
अलगद ॥३
अन उधळता 
घालतो बंधने 
विविध कारणे 
दावुनिया ॥४
दिसते तयाची 
लीला जगतांना 
देह चालतांना 
कळसुत्री ॥५
विक्रांत दत्ताचा 
वेडा नि वाकुडा 
प्रेमाच्या थपडा 
घेतो सुखे ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, ८ जून, २०२४

अयोध्या


अयोध्या
*******
हा शाप फुटीचा भोवतो हिंदूंना 
होतात शकले देशाची या पुन्हा ॥१

ती क्षुद्र ओंजळ भरता रूप्यांनी
ठाकते जमात आंधळी होऊनी ॥२

तो रोष दबल्या पिचल्या हाडांचा 
तो गर्व उद्दाम मातल्या मनाचा ॥३

करतो संहार आपल्या हिताचा
पुन्हा वनवासी राम अयोध्येचा ॥४

जाळूनी रावणा मारुनी मारीचा
फळतो कृतघ्न कावा परटाचा ॥५

 हरवते सीता  स्वप्ने जीवनाची
 नाचतात भुते राष्ट्र घातक्यांची ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .


ॲबस्ट्रक्ट


ॲबस्ट्रक्ट
********
शक्यता आणि गृहीतकांचे 
हातातून उडून गेलेले पेपर 
दिसत आहे डोळ्यांना दूरवर 
फडफडतांना वाऱ्यावर 

त्यातील एकही शक्यता 
आता शक्य राहिलेली नाही 
आणि एकही गृहीतक 
अस्तित्वात आलेलं नाही 

आताही आहे हातात 
काही नवे कोरे पेपर 
पण वाटतच नाही 
की लिहावे काही त्यावर 

जगण्यासाठी लिहिलेल्या 
कित्येक योजना केलेल्या कामना
तुटलेल्या ओळींचे कपटे होऊन 
आडवत असतात वाटा 
घेऊन जाणाऱ्या स्वप्नांना

खरंतर त्यांनाही माहित असते 
त्यांची ती अटळ अपूर्णता 
आणि अपूर्णतेची ती टोचणी 
जी थांबवते चित्ता
पुनःपुन्हा लिहिता लिहिता 

तरीही आवडलेले हृदयात ठसलेले 
ते प्रसंग ती जागा अन ते चेहरे 
तरळतात मनात पुन्हा पुन्हा 
अन त्यांच्या कविता होतात

 मग लिहली जातात  
खुळे पणाची धूसर धुरकट
अतृप्त स्वप्नांची काही ॲबस्ट्रक्ट
जी नेतात धरून हात हातात
नेणीवेच्या  साम्राज्यात 
सुखदुःखाच्या अतीत 
तेच फक्त माझे जग असते
खरे तर मीच माझे जग असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...