बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

रितेपण

रितेपण
****

सुखाची ही ओढ सुखे मावळली 
डोळे झाकलेली उघडेना ॥१

किती मनोहर बाई हा अंधार 
प्रकाशाची सर आठवेना ॥२

सारे धुरकट स्मृतीचे आकाश 
पाण्यावर रेष उमटली ॥३

गळे एक एक शिशिराचे पान 
पाचोळ्याचे गाणं वाऱ्यावर ॥४

एक जरतारी चांदण्याची वेल
मनात अबोल लख्ख उभी ॥५

किती घनदाट असे रितेपण 
नको नकोपण तेही मज ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 


मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

आडवे यमुना


आडवे यमुना
**********

तिचे गुणगाण निजला कळेना 
देऊळ सुटेना सजलेले ॥

तिचे जन्मभान मुळी मावळेना 
काकण सुटेना पिचकली ॥

तिच्या ती जगात परी ना मनात
पहातसे वाट कुणाची गा ॥

आला क्षण देई खुळे समाधान 
तृप्तीचे साधन सापडेना ॥

परी आस मोठी दडलेली पोटी 
व्याकुळली दिठी तयासाठी ॥

जाणे कुठवर तिजला कळेना 
आडवे यमुना पदोपदी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

सुखगोष्टी

सुखगोष्टी
********
सुखाच्या साऱ्याच तऱ्हा 
सारख्याच असतात 
त्याच गोष्टी त्या वयात 
बघ तशाच घडतात ॥१
तेच चक्र गरगर 
फिरते रे जगभर 
झाडे वेली फुले पाने 
येतो नि जातो बहर ॥२
तीच पार्टी तीच मस्ती 
फक्त बदलती साथी 
तीच आशा तीच उर्मी 
देश वेष भिन्न प्रांती ॥३
सुखदुःखाचे फार्मूले 
अगदी तेच असती
फॉर्मुल्यात जगणारी 
खरेच काय जगती ॥४
कोडे असते जीवन 
सोडवणाऱ्यासाठी 
वेडे असते जीवन
हे धावणाऱ्या साठी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 


रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

गिरणार काठी

 
गिरणार काठी
************

ठक ठक ठक हातामध्ये काठी
गिरणार घाटी चालणारी ॥१

कितीतरी वेळा गेली वर खाली 
होऊन सहेली घेणाऱ्याची ॥२

कुणा सांभाळले कोणा बळ दिले 
शिखर दाविले आवडीने ॥३

दत्तनाथ भक्त तापस शर्थीचे 
जणू की काठीचे रूप झाले ॥४

सांभाळा तयाला करा हो आदर 
आणिक साभार परत द्या ॥५

 ठक ठक ठक दत्त दत्त दत्त
राहो उच्चारत ध्वनी तिचा ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 

शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

सोडवण

सोडवण
*******
किती सांभाळले हाती धरीयले 
भक्त पार नेले दत्तात्रेया ॥
किती संत केले पूर्णत्वास नेले 
शेजारी ठेविले आपुल्या तू ॥
जाहला उदास का रे मजसाठी 
घेई देवा पोटी लेकरास ॥
अवघी सोडून आलो ती खेळणी 
नको दावू आणी नवनवी ॥
घेई रे शोषूण माझे पंचप्राण 
नको तुजविण राहणे ते ॥
नसे तुजविण अन्य दयाघन 
करी सोडवण कृपाळूवा ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 


शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४

मीन

मीन
****
प्रेमाला नसते देहाचे बंधन 
द्वैताचे अंगण अर्थहीन ॥१
देहाच्या मातीत जरी उगवते 
फुल बहरते वेलीवरी ॥२
परी तो सुगंध दिसे न कोणाला 
कळतो प्राणाला गंधातुर ॥३
असू दे अंतर अनंत जन्माचे 
काळाचे भयाचे बंदीवान ॥४
आसक्ती वाचून बंधन गळून 
यावा खळाळून झरा जैसा ॥५
जगात असून कशात नसून 
भेटल्या वाचून भेट व्हावी ॥६
फक्त मना ठाव मन हरवले 
चित्त धुंदावले भाग्यवशे ॥७
प्राणाचे पेटणे प्राणाला कळावे 
ओवाळले जावे प्राणावरी ॥८
तैसे तुझे येणे जीवनी श्रीहरी 
अस्तित्व बासुरी करू गेले ॥९
नुरे राधिका ही नुरे गोपिका ही 
भाव अर्थवाही प्रेमरूपी ॥१०
विक्रांत रुतला मीन गळावर 
भाव पायावर राधिकेच्या ॥११
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

वर्तुळ

वर्तुळ
*****
जाहले वर्तुळ आलो जागेवर 
कळे व्यासावर फिरणे ते ॥१

झाली धावपळ घालविला काळ 
जाणले सकळ एक मूळ ॥२

तोच केंद्रबिंदू अनादी अनंत 
दडला शून्यात निरालंबी ॥३

सुटली ना त्रिज्या हेही कमी नसे 
पुसले ना ठसे पाऊलांचे  ॥४

तुटली ना नाळ पतंग दोरीचा 
कृपाळू हाताचा भाग्यवान ॥५

आता जाणिवेत स्वरूपाचे सूत्र 
भरला सर्वत्र सोहंध्वनी ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...