शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४

मीन

मीन
****
प्रेमाला नसते देहाचे बंधन 
द्वैताचे अंगण अर्थहीन ॥१
देहाच्या मातीत जरी उगवते 
फुल बहरते वेलीवरी ॥२
परी तो सुगंध दिसे न कोणाला 
कळतो प्राणाला गंधातुर ॥३
असू दे अंतर अनंत जन्माचे 
काळाचे भयाचे बंदीवान ॥४
आसक्ती वाचून बंधन गळून 
यावा खळाळून झरा जैसा ॥५
जगात असून कशात नसून 
भेटल्या वाचून भेट व्हावी ॥६
फक्त मना ठाव मन हरवले 
चित्त धुंदावले भाग्यवशे ॥७
प्राणाचे पेटणे प्राणाला कळावे 
ओवाळले जावे प्राणावरी ॥८
तैसे तुझे येणे जीवनी श्रीहरी 
अस्तित्व बासुरी करू गेले ॥९
नुरे राधिका ही नुरे गोपिका ही 
भाव अर्थवाही प्रेमरूपी ॥१०
विक्रांत रुतला मीन गळावर 
भाव पायावर राधिकेच्या ॥११
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...