मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४

डॉ.शरद पिचड

डॉ.शरद पिचड 
************

खरंतर शरद हे एक बहुरंगी बहुढंगी 
बहु आयामी असे व्यक्तिमत्व आहे 
त्याच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत 
त्या अनेक पैलू पैकी मला प्रामुख्याने 
जे दिसतात भावतात आणि
आपला ठसा उमटवतात 
 ते म्हणजे त्याची सौम्यता नम्रता
आणि अजात शत्रुत्वता हे गुण 

त्याच्या वागण्यात बोलण्यात 
चालण्यात हसण्यात
नम्रता आहे ऋजुता आहे 
एक आत्ममग्न शांतता आहे

खरंतर अजातशत्रू व्हायला 
मलाही आवडले असते
पण त्या खुर्चीवर बसलं की 
शत्रूचं मोहोळ समोर उभा राहते
ते खुर्ची चे शत्रू असतात 
आणि मग तुमचे होऊन जातात 
म्हणूनच कदाचित 
शरदने ती खुर्ची मोठ्या हुशारीने टाळली 
आणि आपली अजातशत्रुत्वाची पदवी 
कायम ठेवली 
याचा अर्थ त्याला राग येत नाही 
किंवा तो वैतागत नाही असे नाही
पण ते त्याचे रागवणे इतके सात्विक असते 
की ते कढईतून काढलेल्या 
गरम गरम पुरीसारखी वाटते किंवा
पातेल्यातील उकळत्या आमटी सारखे दिसते
 म्हणजे तिचे चटके तर बसतात 
पण ती प्रेमाने खाताही येते 

त्याच्या रागातून उमटणारी 
तळमळ प्रामाणिकपणा आणि 
कामाबद्दलची आस्था त्याला 
एक चांगला मित्र करते 
उत्तम मनुष्य बनवते 
शरदला आपल्या स्वभावाची 
पूर्णपणे जाणीव आहे 
ते अनावश्यक ताण युनियनची कटकट 
राजकारणी लोकांची दादागिरी 
कृतघ्न आणि बेमुर्वत रुग्णांची बडबड 
त्याला कधीच आवडायची नाही 
शक्य होईल तेवढे तो त्यांना टाळत असे
 पण वेळ आलीच  प्रसंग ठाकलाच समोर 
तर त्यातून आपली शांती न ढळू देता  
वैताग न दाखवता  सहजपणे 
त्यातून मार्ग काढत असे   

खरंतर तो एक पूर्णतः फॅमिली मॅन आहे 
आपले कुटुंब हे त्याचे मुख्य जग आहे
आणि त्याच्या मुली त्याच्यासाठी
जणू सर्व सुखाचे निधान आहेत 
त्याने जोडलेले मित्र त्याला सोडून 
कधीच जाऊ शकत नाहीत
भले मग एकमेकां गाठ 
कित्येक वर्ष  न पडू देत
कारण गुणग्राहकता रसिकता 
हे गुण  त्याच्या ठाई 
कोंदणातील हिऱ्यासारखेआहे 

तो उत्तम श्रोता आहे आणि 
एक छान गाणारा गळा आहे 
संगीत त्याच्या गळ्यात आहे 
मनात आहे आणि जीवनातही आहे
तो त्याच्या जीवनावर खुश आहे 
जे मिळाले त्यात समाधानी आहे 
प्रचंड महत्वकांक्षाचे विमान
त्याने कधी उडवलेच नाही 
कारण जमिनीवरील आनंद
त्याच्यासाठी शतपटीने मोलाचा आहे
तो सदैव जमिनीवर पाय असलेला 
आपल्या जगात रमलेला 
ते जग सांभाळणारा अन फुलविणारा 
त्याला झळ लागू न देणारा 
कुटूंब प्रिय जीवन रसिक आहे 

तो सावध तरीही साधा आहे 
चतुर तरीही नम्र आहे 
बुद्धिमान तरीही निगर्वी  आहे
गंभीर तरीही शांत आहे 
व्यवहारी तरीही उदार आहे
खरंतर तो जिथे आणि जसा आहे 
त्याहूनही त्याची पात्रता क्षमता खूप मोठी आहे 
पण त्याने स्वीकारलेली ती वाट 
शांत सुंदर गजबज नसलेली 
आनंददायक अल्हाददायक आहे
 ती तशीच प्रियकर हितकर आणि सुंदर राहो  
हीच माझी त्याला 
त्याच्या पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
 .
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...