बुधवार, ७ फेब्रुवारी, २०२४

चिन्मया

चिन्मया
*******

तुझी ऊर्जा तुझी शक्ती या विश्वाच्या या मनाच्या कणाकणातून वाहणारी 
कधी आभाळ होऊ पाहणारी तर कधी काळ्याशार मातीत रुजणारी 
कधी वीज होऊन लखलखणारी कधी वणव्यात उफाळणारी 

जिथे चैतन्य प्रेरणा कर्म तिथल्या प्रत्येक कृतीतून झरझरणारी 
इथल्या प्रत्येक घटनात असतेस तुच दिग्दर्शन करत त्याला सौंदर्य बहाल करत 
इथल्या  स्थुल आणि सूक्ष्म हालचालीतून मनोज्ञ लय साधत
इथल्या प्रगट आणि गुह्य बोलातील अर्थाचे प्रगटी करण होत.

आणि मला वाटते ते मी केले म्हणून घडले 
खर तर त्या मी चा डोलारा तोही तूच असतेस 
आपल्या मायेने सगळे नटवून असतेस कौतुकाने हसत 

तुच स्फुरण होऊन वसतेस माझ्या कवितात
तू करुणा होऊन असतेस माझ्या हृदयात 
तू प्रज्ञा होऊन विद्यमान माझ्या बुद्धीत 
तर कधी दया क्षमा शांतीचे वरदान देत 
चित्तास तुष्टवत सात्विकतेचे घास भरवत 

तरीही भान नसते कधी कधी अस्तित्वाचे 
समई वर पेटलेली ज्योत समईचीच असावी तद्वत 
तुझा बोध होणे म्हणजे मी पणाचा बोध होणे 
आपण आपणास पाहणे देह मनाची गाठ सुटणे 
असणे आणि नसणे यातील सीमा स्पष्ट करणे 

तुझ्या अपार कारूण्याने मला जगण्यातील मरणे  
आणि मरणातील जगणे लख्ख दिसत आहे 
तू माझे पाहणे झाली आहेस 
इथून तिथे जायचे द्वार झाली आहेस
माझे असणे तुझे चैतन्यमय स्पंदन झाले आहे.
हे चिन्मया..! चिरंतना !! चिद्विलासनी !!!
मी धन्य झालो आहे.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी ) ****** वळवले दाम ठोठावले काम  मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥ तुझाच भरोसा आता तीर्थंकरा उणीव न यावी तु...