रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

नाटक

 नाटक
*******
तसे तर जन्माच्या नाटकात 
प्रवेश घेणे आणि जाणे 
सारे ठरलेलेच असते 
तो लेखक किंवा तो दिग्दर्शक 
त्याचे शब्द आणि त्याच्या सूचना 
त्या बर हुकूम सारे घडते 
आणि जीवन असते 
एक प्रेक्षक होऊन बसलेले 
वर्तमानात खिळून गेलेले रंगून

पण कधी कधी घडते भलतेच
कुण्या कुठल्या पात्राची
एन्ट्री किंवा एक्झिट होते अचानक 
आणि चुकते सारे गणित
आणि तो प्रेक्षक जीवन नावाचा 
जातो बावचळून 
कधीकधी प्रवेशाची वेळ टळून जाते 
आणि त्या सरदाराची राणी 
दुसऱ्या कोणाची तरी होते
तर कधी कधी प्रवेशाची जागा बदलते 
अन प्रियजन वैऱ्याची सेना होते 
सह कलाकार घेतात सांभाळून 
वेळ मारून कधी कधी नाटक जाते वठून
पण त्या चुकलेल्या नटाच्या 
मनाचा विभ्रम संपत नाही 
भलत्या वेळी भलत्या जागेत असण्याची 
किंवा जाण्याची खात्री मिटत नाही 
तरीसुद्धा ते नाटक चालू राहते 
तिसऱ्या अंकाचा पडदा पडेपर्यंत .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...