शुक्रवार, २६ जून, २०२०

दत्त भेट

दत्त भेट
*****
दत्त भजतो 
तोही मरतो 
नच भजतो 
तोही मरतो 

दत्त पाहतो 
तोही जगतो 
नच पाहतो 
तोही जगतो 

तर मग सारे 
कशास करणे 
दत्त पाहण्या 
व्याकूळ होणे 

जगती कुंजर 
जगती कुत्रे 
पशुपक्षी हे 
कीटक सारे

कशास जगती
कशास मरती 
प्रश्न तया न
कधीच पडती 

काय फरक रे
तुझ्या तयात 
बघ वळून रे
ते तुच आत

जो पेट घेतो 
तो दीप असतो 
प्रकाश स्वतः 
जगास देतो 

फक्त भरला 
दुसरा अन तो 
तेलाचा जणू 
खड्डा ठरतो 

भजणे म्हणजे 
असती पेटणे 
दत्त भेटणे 
प्रकाश होणे 

दिवा तसाच 
तसेच जगणे 
परी निराळे 
असते पेटणे 

पेटण्याची ती 
आस उरात 
बघ रे घेऊन 
उभा विक्रांत
*****
https://kavitesathikavita.blogspot.com

सावळा

सावळा
******

सावळे आकाश 
सावळा प्रकाश 
सावळ्या मनात 
सावळ्याचे भास  ॥
सावळ्या निद्रेत 
सावळ्याचे स्वप्न 
सावळी जागृती 
सावळ्यात मग्न ॥
सावळ्या वृक्षात 
सावळी सावली 
सावळ्या फांदित 
सावळा श्रीहरी ॥
सावळी यमुना 
सावळ्या लहरी 
सावळ्या गोपींच्या 
सावळ्या घागरी ॥
सावळी राधिका 
सावळी का गौर 
सावळ प्रश्नास 
सावळे उत्तर ॥
सावळ्या तनुला 
सावळ्याचा स्पर्श 
सावळे रोमांच 
सावळाच हर्ष ॥
सावळा विक्रांत 
सावळे लिखाण 
सावळ्या शब्दात 
सावळे चिंतन॥
***
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, २५ जून, २०२०

दत्ता या हो

दत्ता या हो 
*********
दत्ता या हो जगण्यात 
श्वासांच्या या संगीतात 
सोहमच्या उमाळ्यात 
आनंदाचे झाड होत ॥

दत्ता या हो डोळियात 
सुवर्ण प्रकाश होत
उजाळाच्या ऐश्वर्यात 
मनाचे मालिन्य नेत ॥

दत्ता या हो काळजात 
प्रेमाचा तो डोह होत
निववा हो सभोवात 
तहानले सारे ओठ ॥

दत्ता या हो सदा साथ 
जीवलग सखा होत
अलिंगून प्रेमभरे 
रहा मम हृदयात ॥

दत्ता या हो या धावत 
व्याकुळली माय होत
बाळ तुमचा विक्रांत 
तुम्हां असे बोलावत॥
**
https://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, २३ जून, २०२०

पथिक

पथिक
******:

तुझिया पथीचा 
पथिक मी दत्ता 
चालतो परी का 
सरेना हा रस्ता ॥

वाट चुकली का 
दिशा हरवली 
कळेना मज का 
पडे रान भुली ॥

चालतो उन्हात 
तापाने पोळत
कधी अंधारात 
खडी ठेचाळत ॥

माझा उत्तरेचा 
प्रवास सदाचा 
मागतो प्रकाश 
तुझिया कृपेचा॥

येऊ देत वारा 
हिवाचा बोचरा 
फुटू देत टाचा 
छातीचा पिंजरा ॥

परी अंतरात 
पेटलेला दिवा 
नच देवराया 
कधी रे विझावा ॥

मिटताच डोळा  
दिसतो सामोरा 
नच हरवावा  
कधीच तो तारा ॥

विक्रांत ही वाट 
झाला वाटसरु 
विनवितो दत्ता 
चाल तयावरू ॥
****
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com


दत्तराज

दत्तराज 
*****
दत्त माझा राजा 
बसे गिरनारी 
ठेवुनिया दृष्टी 
सार्‍या  भक्तावरी 

कर न कुणास
सदा करी दान 
मागे तो ते सारे 
जातसे घेऊन 

तया नको धन 
स्वर्ण सिंहासन 
जिंकायला मन 
सांगे आवर्जून 

करतो न दंड 
चूकलिया भक्ता
येऊनिया दावी 
सन्मार्गाचा रस्ता 

अहो ती माऊली 
राजवस्त्रे ल्याली 
विरक्तीत न्हाली 
कृपेची सावली 

सदैव पाठीशी 
भक्तांचा रक्षक 
दुर्जना शासक
करतो नाटक 

त्याची सजा पावे 
तोही भाग्य लाहे
भेटते जन्माचे 
पुण्य लवलाहे 

विक्रांत तयाच्या 
प्रजेचा पाईक 
गातो ते ऐकती
प्रेमे सकळीक
*****
https://kavitesathikavita.blogspot.com
+

रविवार, २१ जून, २०२०

मनीचे वस्त्र

मनीचे वस्त्र
**********

माझिया मनीचे 
वस्त्र हे घडीचे 
तुझिया पदाचे 
स्वप्न पाहे ॥

किती सांभाळावे 
किती रे जपावे 
डाग न पडावे 
म्हणूनिया ॥

मोडली न घडी 
परी डागाळले 
मोहाचे पडले 
ठसे काही ॥

कुठल्या हवेचे 
कुठल्या वाऱ्याचे 
गंध आसक्तीचे 
चिकटले ॥

कुठल्या ओठांचे 
कुठल्या डोळ्यांचे 
पालव स्वप्नांचे 
फडाडले ॥

बहु दत्तात्रेया 
समय तुम्हाला 
आम्हा जोडलेला 
काळ थोडा ॥

पाहुनिया वाट 
जाहलो विरळ 
फाटे घडीवर 
आपोआप ॥

या हो क्षणभर 
स्पर्शा हळुवार 
विक्रांत जुनेर 
धन्य करा॥


*****
https://kavitesathikavita.blogspot.com
+++

शनिवार, २० जून, २०२०

सोनार


सोनार 
*****
श्रीदत्त सोनार 
मज दे आकार 
फुंक हळूवार 
मारूनिया॥

जाळ वळवून
तपे तापवून
किंचित ठोकून 
आणे गुणी॥

वितळवी मुशी 
दे दोष  जाळून 
सद्गुण घालून 
किंचितसे ॥

करी घडवणं 
देऊन आकार 
नाम अलंकार 
अनाम्याला ॥

नीट घडवितो
परी कर्मागत
जगण्या प्रारब्ध 
वाट्याचे ते  ॥

जगात विक्रांत 
जरी मिरवितो 
स्वरूप ठेवतो 
परी ध्यानी ॥
****
 copy @डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...