बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९

ती...






ती...
***
कळल्यावाचून जीवन तिला
कसे जगणे चालले वाहून  
काय तिच्या आयुष्याचा
साराच धूर गेलाय होवून  

कुणाशीच मैत्र नव्हते
कुणाशीच सख्य कधी
बेपर्वा बेदरकार एकटी 
असून भोवताली गर्दी 

इतके कडवट का रे देवा
कुणा असा घडवतोस
देहावरती काटे त्यांच्या
अन जगाही रडवतोस

तुटलेली स्वप्न सारी
सुटलेले धागे दोरे
धार अशी धाग्याला
जमलेले जखमी सारे

त्या तिच्या शब्दातून
जहर सदा उकळते
अन अंधारी कोठडीतून
नकार घंटा खणखणते

करू करुणा की राग कळेना
जाता जवळी हो अवहेलना
असेल काही कर्मभोग हा
गमते  दंश ते साहतांना

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९

दत्ताला मागणे

दत्ताला (दिवाळीचे सर्व भक्तांसाठी)मागणे
***********
समृद्धी मधले
सुख ओघळावे
तम मावळावे
भागी आले ॥
व्हाव्यात सकळ
कामना सफल
नच अमंगळ
दिसो डोळा ॥
स्वप्नांचे तोरण
सत्यास दिसावे
उन्मेष फुलावे
चहूकडे ॥
गेले ते विरावे
नवे उगवावे
अंकुर फुटावे
आकांक्षांचे ॥
विक्रांत मागतो
दत्ताला मागणे
घडो तुझे येणे
जीवनात ॥

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१९

उगाचच झाडे तोडणाऱ्यांनो


झाडे तोडणाऱ्यांनो
**************
उगाचच
झाडे तोडणाऱ्यांनो
तुम्हाला क्षमा नाही
कदापी नाही
तुमच्या पिढीला ही
अन् तुमच्या पुढच्या पिढीलाही
तुमच्या पापाचे कर्ज
फेडावे लागेल त्यांनाही

लाज नसलेली
तुमची वक्तव्य
अवतरणे उदाहरणे
कायद्यातील पळवाटा शोधणे
राजकारणी कारणे
छी छी
किती घाणरडे !
होय
तुम्ही जिंकलात
कत्तलीची संमती घेत
चौकटीत अडकलेल्या
कायद्याकडून
अन
आंधळ्या न्यायाची
परवानगी घेवून
पण तुमच्या या पापाला
क्षमा नाही
या गुन्ह्याला माफी नाही
पडणाऱ्या प्रत्येक झाडाचे आक्रंदन
प्रत्येक फांदीचा शाप
निर्वंश करील तुमचा
उगवून विनाशाची बीज
तुमच्या छातीत
तडफड कराल तुम्ही
प्राणवायुसाठी
तेव्हा हसतील
या झाडांचे अतृप्त आत्मे
तोवर हसून घ्या
जिंकल्याबद्दल
हि लढाई
पण त्या न्यायालयात
क्षमा नसते
कुठल्याही गुन्ह्याला
एवढे मात्र ध्यानात ठेवा.
**
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोवळ्याचा अंत व्हावा


दत्ता तुझ्या दारातल्या 
सोवळ्याचा अंत व्हावा
उच्च नीचतेचा भाव
मनामनातील जावा ॥

तीच पूजा तिचा अर्चा
अभिषेकी तोच लोटा
भावनांना भिडणारा
पावत्यांचा गठ्ठा मोठा ॥

चालू दे रे घर त्यांचे
अन्य आहेतच वाटा
तूच तोड साऱ्यां कड्या
पार होऊ दे रे ओटा ॥

कोण शूद्र कोण श्रेष्ठ
स्पर्श कैसा अपवित्र
हिंदू हेच उपादान
राहू दे रे सार्वत्रिक

  डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१९

भार्गवाच्या नाथा


भार्गवाच्या नाथा
**************
मातीचाच किल्ला 
मातीचे मावळे 
तरीही सजले 
राज्य एक ॥
मातीचाच वाघ 
मातीच्या गुहेत 
मातीच्या नाट्यात 
सहभागी ॥
मातीचा विक्रांत 
पाहतो देखावा 
म्हणतो वाहवा 
पुन्हा पुन्हा ॥
दावी ज्ञानदेव 
वैभव सत्तेचे 
सजल्या साक्षीचे 
मातीविना ॥
ठेवा दत्तात्रेया 
तत रूपी आता
भार्गवाच्या नाथा
मजलाही ॥
**
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

दत्तभक्तास

दत्तभक्तास
**********

दुःखाने भरली
सखी तुझा वस्ती
लागलीसे पथी
जीवनाच्या॥
सरेना अंधार
होईना पहाट
पाहुनिया वाट
उजेडाची ॥
परि नभी स्थिर
एक दत्त तारा
तुझिया आधारा
सदा असे ॥
नाही प्रियजन
जरी सभोवती
जिव्हाळ्याच्या गोष्टी
 सांगावया॥
तुटलेली नाती
तुझी खरी खोटी
देई दत्ता हाती
सोपवून ॥
तोच एक सखा
जन्माचा सांगाती
धृढ धरी चित्ती
सदोदित ॥
आणिक कुणास
नको घालू गळ
दुनिया ओंगळ
संधीसाधू ॥
विक्रांता कळला
हाची तो उपाय
आणि सांगू काय
तुज लागी
**
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

वाट रुळलेली


सुटावा जगाचा
मायेचा आधार 
मिटावा अंधार 
अज्ञानाचा

मग मी चालावी
वाट रुळलेली 
पदी मळलेली 
भक्तांचिया

पुरे दोन घास 
वस्त्र या देहास 
उन  पावसास 
छत काही 

याहून काहीच
नाही रे मागणे
होणे दीनवाणे 
अर्थासाठी 

विक्रांत मनात 
राहावा सतत 
कृपाळुवा दत्त 
विराजित
**
 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...