रविवार, २ जून, २०१९

पहा रे जगता




पहा रे जगता

**********


माझ्या जाणिवेला
फुटावे धुमारे
जग पाहणारे
यथावत 

होवूनी निवांत
सुटूनिया कष्ट
पाहण्याचे फक्त
कर्म उरो 

अवघाची खेळ
चालला केवळ
वाफेचे ते बळ
इंजिनाला 

दुनिया चालते
मनही धावते
काय अन कुठे  
ठाव नाही 


माय मदालसा
सांगते विक्रांता
पहा रे जगता
निरखून 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

*****





नशा

नशा
(word no tobacco day)

क्षणी सुखद वाटते
अंती दुःखद ती होते
नशा जीवन ओढून
मृत्यू पंथाशीच नेते

विडी तंबाखू गुटखा
यांचा लागता चटका
जीव वेडापिसा होतो
धरी टपरीचा रस्ता

धन जळते धुरात
धन पडते थुंकीत
करी बधिर मेंदूला
येतो अर्धांग देहात

नसा होतात कडक
वाढे रक्तचाप खूप
अंती झटका हृदयी
होय सुखाची ती धूप

मग चकरा दव्याला
चाट पडदा खिशाला
रोग कॅन्सरसारखे
होती कारण घाताला

माझे आइका मित्रांनो
दूर फेका हे लोढण
मनोनिग्रह करून
आणा सुख समाधान

फार नसे रे कठीण
पाहा जागृत होऊन
जीव दुर्दैवी भोवती
नशा केलेले पाहून

मित्र डॉक्टर विक्रांत
तुम्हा मागतो मागणं
विडी काडीची ही बेडी
दूर द्या रे ती फेकून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १ जून, २०१९

दत्ताने दाविले




मनाचा किनारा
चिवट चिकट
सोडता सोडत
नाही कधी ॥

रंगांचे विभ्रम
दाखवी अनेक
घडती कित्येक
भावे

भय दलदल
कधी दाखवून
घेतसे ओढून
स्वतः कडे ॥

कधी अधिकार
कवण्या पदाचा
संतांच्या मठाचा
महाथोर ॥

कधी अनुभूती
ध्यानी ज्या येती 
त्याची संगती
बांधुनिया ॥

रंग रूप रस
अवघे इमले
मनाने बांधले
असे जगी ॥


दत्ताने दाविले
म्हणूनी कळले
विक्रांता घडले
पाहणे ही  


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, ३१ मे, २०१९

ओवळा




ओवळा 
******
सोवळ्या वस्त्राला चाले 
ओवळा तो का रे पैसा 
विटाळतो माणसाला 
माणसाचा स्पर्श कैसा 

जात माणसांची मोठी 
देवाहून असते का ?
घाबरून तुझी माझी 
देव पूजा चालते का ?

जातीपातीचे हे गट 
कळपाचे का रक्षक 
तेच अन्न खातो ना रे 
संत भक्त नि भिक्षुक 

त्याच संवेदना आत
तिच स जाणण्याची 
तीच कळ अंतरात
तुकोबा नि चोखोबाची

दत्ता दे रे मती काही 
रीतभात बदलाची 
सर्व कर्मकांड वर्ण 
गुढी उभार आस्थेची 

दास विक्रांत ओवळा 
विनवितो दत्ता तुला 
असा धर्म देई जगा 
स्वीकारी जो माणसाला 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

*****


बुधवार, २९ मे, २०१९

इडा पीडा सारी टळो





इडा पीडा सारी टळो 
दत्त प्रेम उरी झरो
मध्यमेचे महासुख  
चेतनेत माझ्या उरो ॥

उलथून स्वर्ग सारा 
गंगा धरे अवतरो
प्राशितांना पुण्य परा 
मला मीही नच स्मरो ॥

डिंडिंमता अनुहत 
हृदयात असा भरो
कणकण पारा होत 
वारा आर पार सरो ॥

पेटलेल्या वन्हीला त्या
घोट सागराचा पुरो 
स्वप्न सत्य मांडणारे 
वस्त्र अंतरीचे विरो ॥

दत्त स्वप्न विक्रांतचे
दत्ता मध्ये पूर्ण मुरो
भासमान अस्तित्व नि
नाम रूप सारे हरो ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


मंगळवार, २८ मे, २०१९

जगण्याच्या वाटा






*****

जगण्याच्या वाटा 
दाखव रे मला 
धरून हाताला 
दत्तात्रया
विकाराचे काटे 
कैसे मी टाळावे 
तुजला भेटावे 
कैशा रीती 
पापाचे उतार 
कैसे करू पार 
घेऊन आधार 
दयाघना 
आणि येता चढ 
प्राण मेटाकुटी 
कुठे ती विश्रांती 
घेऊ सांगा
जयाचा तो संग 
होय संतसंग 
शांतीचे अभंग 
भेटो मज 
विक्रांत ओढाळ 
खुळा वाटसरू 
नेई पैल पारू 
मायबापा 
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, २७ मे, २०१९

तुझ्यावाचून



तुझ्यावाचून
*******:
सरला दिन तुझ्या वाचून 
व्यर्थ जगलो जन्मा येऊन ॥

भांडी घासली या जगताची 
कचरा पाणी गेले वाहून ॥

तेच हिशोब पुन्हा मांडले 
त्याच खर्चात मन सांडून ॥

कळते मजला माझ्यावाचून 
जग चालते युगे होऊन 

तरीही चाले उठाठेव ही
चक्र कुठले पायी बांधून 

नकोस जावू असे सोडून
दत्ता भगवे स्वप्न मोडून 

माळावरती पडली काडी
तुझ्या धुनीत जावी जळून 

जळता देह या जन्मातून 
तुझाच दत्ता जावो होऊन 

आस लागली विक्रांतला या 
आतूर काया जावी मिटून 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...