सोमवार, ६ मार्च, २०१७

जिंदगीचे नखरे




जिंदगीचे नखरे

थांबायचे होते तेव्हा
रानोमाळ गेल्या वाटा
जागे जरी स्वप्न माझे
भोवतीच्या रुते व्यथा

चढ सारा वाया गेला
उताराचे कष्ट उरे
चलो यार जिंदगीचे
करू साजरे नखरे

पायाखाली काटे जरी
पडू खाली पुन्हा पुन्हा
कधीतरी कुठे तरी
काताळा फुटेल पान्हा

सारे काही साऱ्यासाठी
असते का इथे कधी
भरूनही ओंजळीत
आपली नसते नदी    

आजचे करू साजरे
प्रेमातील उन वारे
उद्या मोजू विरहात
हाती न येणारे तारे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


रविवार, ५ मार्च, २०१७

अंतरीचे गुज




अंतरीचे गुज
**************

किती कसे लपशील
कुठे कसे थांबशील
डोळ्यातील भाव सखी
गाजावाजा करतील

घरदार कारा मग
मन बासरी होईल
डोळियांच्या बाहुल्यांना    
रंग निळूला येईल

भेटणार नाही तरी  
भय मिटणार नाही
विषाचा तो डंख तुला
मग साहणार नाही

बघ मन मिटू नको
जगण्यात रुसू नको
घे बाहूत स्वप्न वेडे  
व्यवहारी बसू नको

हृदयाची ऐक फक्त
हलकीशी कुजबुज
ओठावरी येऊ देत
मग अंतरीचे गुज

उमगलेले जीवन 
रक्तातून उमलू दे
जन्मांमधून भेटले 
गाणे गळ्यात फुलू दे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


दत्त प्रेम




आसावले मन।
पाणावले डोळे ।
दत्तप्रेम आले ।।
उफाळून । ।
दत्तकृपा शब्द ।
तुम्ही सांगितले।
बुडत्या घेतले ।
तारुवरी ।।
घडो काही सेवा ।
दत्त मी पाहावा ।
इतुका घडावा ।
विनियोग।।
विक्रांत होवुनी  
दासांचाही दास।
वंदी पाऊलास ।।
भक्तांचीया।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, ४ मार्च, २०१७

तुझे अश्रू !



तुझे अश्रू !

क्षणभर मला वाटले
मी वाहून जाणार   
त्या तुझ्या अश्रूत
कायमचा
पण थांबलो आणि आलो
जीवनाच्या तीरावर
चिंब भिजलेलो
व्यथांनी आणि वेदनेनी
खूप शिणलेलो
स्वप्नाचे वाहणारे कपटे
जमा करून

ते अपमान आणि अतृप्तीचे
ओरखडे मनावर वागवत
दुभंगलेले माझेपण घेवून
उभा राहिलो
पडत सरपटत कसाबसा
नाचक्कीच्या गाळात  
तुझी एकही स्मृती न कुस्करता  

तुझ्या अप्राप्तीचे दु:ख
जणू नशिबाचा वार होता
कटू कुत्सित आणि जहरीला
पण तो ही साहिला
केवळ तुझ्या अश्रूंमुळेच

तुझे अश्रूच होते तेव्हाही
माझे मर्मस्थान  
आणि तेच आहेत आताही
माझे बलस्थान  

सखी ते अश्रू तेवढे सांभाळून ठेव
माझ्यासाठी
मी आषाढ होणार आहे आता

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




शुक्रवार, ३ मार्च, २०१७

हसता हलकेच तू




हसता हलकेच तू
ऋतू बहरून येतो
मी पाखरू होवूनिया
हिरव्या मनात गातो

तिरपा कटाक्ष तुझा
मन उजळून जातो
त्या क्षणाच्या प्रतिक्षेत
मी रातदिन जळतो  

अबोल ते बोल तुझे
घेरून मनास राही
मी जगात कोणत्या त्या
नको विचारूस काही

हा भ्रम असे का माझा
शून्यात मनाच्या खुळा
भाग्योदय नशिबाच्या
वा प्राचीवरती दाटला

हे गीत संगीत कसे
हृदयातून उमटे
मी बेहोष असे आत
जगणे उगा वाटते

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने



गुरुवार, २ मार्च, २०१७

अवकाळी आभाळा





अवकाळी आभाळा

शारद सुंदर पुनव नभात
फुलतो मनात चंद्र माझ्या ||
नको रे आभाळा भरून येवूस
घेवून जावूस स्वर्ग माझा ||
आलास तरीही पडणार नाही
राहणार नाही फार काळ ||
मग रे कशाला देतोस यातना
प्रकाश अंगना पडू दे ना ||
दुधेरी पांढरा अमृत कोवळा
चैतन्य सोहळा कणोकणी ||
बिंबास पाहतो मी माझा न राहतो
जणू हरवतो रम्य स्वप्नी ||
होतो ना सावळ्या आषाढी भेटलो
सुखात नाहलो ओतप्रोत ||
असा अवकाळी उगाच येवून
पिशाच होवून हिंडू नको ||
भिजू दे अंतर प्रकाशी पाझर
जन्माचा विसर पडू दे रे  ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने

http:\\kavitesathikavita.blogspot.in 

बुधवार, १ मार्च, २०१७

कुठाय माझी लंगोटी





कुठाय माझी लंगोटी
रे कुठाय माझा लोटा
लबाड करणी तुझी
दत्ता देई माझा सोटा ||

बरा राहशी एकटा
लावून आम्हा संसारा
दुरुनी मजा पाहशी
फिरविशी गरागरा ||

घरदार नाही तुला
मीठा पिठाची चिंता
का रे मग माझ्यामागे
लावसी असला गुंता ||

तुझ्याकडे येवू जाता
मोही घालसी लबाडा  
पुन्हा जडून लोभी मी   
वाहतो संसार गाडा ||

क्षणभर झालो जागा
म्हणून जाणतो थोडा
जै घेतले नाम तुझे
देई मज माझा वाटा ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...