बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

ओघळून स्वप्न सखी




ओघळून स्वप्न सखी
आज माझ्या दारी आले
एक नवे धुंद गीत
पुन्हा मनात जागले  ||

कळल्या वाचून काही
मी माझ्यात हरवले    
अनंत उल्का लेवून
मनी आकाश सजले ||

या ओढीस काय म्हणू
मी नाव कुठले ठेवू  
या सुखाच्या वणव्यात
जळून कितीदा जावू ||

सुख दु:खाच्या पल्याड
मी क्षणात या थिजले
मधुकण अमृताचे   
मी झेलूनिया घेतले  ||

मी जन्म होवूनि सखी
या जीवनास भेटले
जे होते रिते रिते ते
हृदय आज भरले ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in



मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

मन्मथ चंद्र




खोट्या किती शपथा पाहिल्यास तू चंद्रा
साक्षी किती जनांना राहिलास तू चंद्रा ||
देहात पेटलेले प्रेम ते ही असते
स्मरून रोहिणीला राहिलास तू चंद्रा ||
ती स्त्री मालकीची रे असे काय कुणाच्या 
देवून साथ शाप तो घेतलास तू चंद्रा ||
भोगून प्रेमास धुंद रीती भितीविना
घटास अर्थ मातीच्या दिलास तू चंद्रा ||
रात्रीस रूप काही नसेच तुझ्याविना  
विदेही मन्मथाच्या उरलास तू चंद्रा ||
हो स्पर्श जीवनाला पुरुषार्थ पूर्णकाम
ती मातृका तयांची झालास तू चंद्रा ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

मरुस्थळी




वाटले मज की विझलो मी
कुण्या मरुस्थळी पडलो मी  
ते माझे प्राक्तन समजुनी
दुरवरी मग बसलो मी

गीत एक मग आले कानी  
ओला वारा श्वासात भरुनी
डोळ्यांनी अन आग पिवूनी
पुन्हा खोलवर रुजलो मी

कांचन झाली तप्त मृतिका
क्षणात भास्कर मंद फिका
काही तुजला मिळे बहाणा
हे विश्वकारका कळलो मी 

किती देखणी तरीही माया
फितूर झाली अवघी काया
चार पाचूचे शब्द दयाळा
तया प्रकाशी विरघळलो मी  


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://Kavitesathikavita.blogspot.in




रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

बांधलेली नाती




बांधलेली नाती
----**-------

बांधलेली नाती
मानलेली प्रीती
तरी न सुटती
सखे बाई   ||

येतात कुठूनी
आवेग हे मनी
कळल्या वाचुनी
गूढ ध्वनी  ||

उडू उडू जाती
जन मन रिती
पण नवी मिती
नच दिसे ||

त्याच सीमारेखा
अडवती पाय
तडफड काय
सांगू शब्दी ||

विरेल वादळ
वा नेईल नभी
दारात मी उभी
जीवनाच्या ||

भाळीचे हे भाग्य
कसे विनटावे
मना सांभाळावे
व्यवहारी ||

मिळावा प्रकाश
जीवनाचे श्रेय
हरवून भय
मनातील  ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

प्रेम केल्याने





प्रेम असते अकारण अनाहूत जाणीव
पौर्णिमेच्या आकाशातील चंद्रबिंब सोलीव ||

का रे बाबा नभी आला त्याला कोण म्हणते का ?
अरेरे आला म्हणुनी डोळे झाकून घेतो का ?||

तो येतो नभी नि भरभरून प्रकाश देतो
त्याचे नाते या धरेशी युगांचे प्रकट करतो ||

मनी प्रेम येण्याहून मोठे अरे पुण्य नाही
अमृताचा डंख होता नाही कधी म्हणू नाही ||

फक्त प्रेम करण्याने चंद्र मनी ओघळतो
अनाहती दाटलेला अडसर दूर होतो ||

प्रेम दिवाणी झाली राधा प्रेम विराणी मीरा
अवघे विश्व प्रेमानेच आले इथे आकारा ||



विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://Kavitesathikavita.blogspot.in



अजपा



अजपा
******

श्वास येतो श्वास जातो
अंतरी मी स्तब्ध होतो
उधानते प्राणशक्ती
शून्य स्पर्श मना होतो

खोलवर सागरात
शिंपला मी जणू होतो
दाटूनिया  समर्पण
शुभ्र कण नवा होतो

दुनियेत कोलाहल
जीव जंतू ओरडतो
कानावरी नाद व्यर्थ
अळवाचे पाणी होतो

अव्याहत धुनी जळे
छातीतल्या कुंडामध्ये
एक एक कर्म जळे
प्रणातल्या आगीमध्ये

मागे किती उरले ते
पाहण्या कारण नाही
सागराची गाज कानी
सारितेला भान नाही

दत्त अवधूत स्वामी
अजपा जपात कोंडी
नादावूनी विक्रांत हा
पुनःपुन्हा चाखे गोडी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

मनाचा आकार ..


***************


मनाचीच मुक्ती  
मनाचाच बंध
घडतो संबंध   
येण्याजाण्या ||

मनाचीच मूर्ती
मनाचाच देव
उभा तो सावेव
चतुर्भुज ||

मनाचीच माती
मनाचा आकार
चालला संसार
अंतहीन ||

मनाचे बिंदुले
मी पणी सजले
जगत घडले
अंतर्बाह्य ||

मनाचे आकाश
मनाचा प्रकाश
विश्वाचा या नाश
मन करी ||

मनाचा आधार
सारून विक्रांत
मनाचे स्वगत
ऐकतसे ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...