रविवार, १६ जून, २०१३

पान टपरीच्या बाजूला





पान टपरीच्या बाजूला
भिंतीच्या आडोश्याला
नुकतीच मिसरूड फुटली
मुले येती सिगारेट प्यायला
काही चुकल्या चुकल्यागत
काही अगदी बेपर्वा
चुटकी वाजवत राख झाडत
धूर सोडती आडवा तिडवा
जणू जातात एकटेच
जगापासून दूर दूर
सभोवती ओढून घेत
निळा पांढरा तो धूर
कुणी तरी येतो उगाच
कुणी आणला जातो ओढून
तंबाखूच्या उग्र गंधात
स्वत:स देती सारे झोकून
पाहता पाहता कोपऱ्यात
पाकिटांचा होतो किल्ला
मोठ्या टाईपात पाटी असतो  
केविलवाणा आरोग्य सल्ला

 विक्रांत प्रभाकर              

http://kavitesathikavita.blogspot.in/









शनिवार, १५ जून, २०१३

हा माझा नाही प्रताप




तोंडास जयांच्या घट्ट
लागली आहे मलई
म्हणती ठामपणे ते  
दूध प्यायलोच नाही

अहो नक्कीच काम हे  
कुण्या दुष्मनाचे आहे
आणुनी हे रंग त्यांनी
मज रंगविले आहे

होतो तेधवा तिथे मी    
हा तो योगायोग आहे
बिलात भैयाच्या सांगा
काय माझे नाव आहे ?

किती सांगू पुनपुन्हा
हा माझा नाही प्रताप
फुटती उगाच हात
खुर्चीस असे हा शाप

विक्रांत प्रभाकर
http://vikrantchishodhyatra.blogspot.in/





शुक्रवार, १४ जून, २०१३

तो देव






तो देव इथे राहतो इथेच जगतो
इथल्या जंगलात शहरात फिरतो
इथल्या नदीत स्नान करतो
इथल्या गावी मागून खातो
म्हणूनच तो मला सदैव
आपला असा वाटतो
दूर दूर कुठे ढगात
खोल गहन सागरात
शोधणे आम्हा शक्य नाही
या माती शिवाय मनाला  
अधिक काही माहित नाही
त्याचा बद्दल विचार करता  
हृदय भरून येते
आपलेपण उगा दाटते
त्यामुळेच कदाचित
तो भेटण्याची शक्यता हि वाटते

विक्रांत प्रभाकर

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...