शनिवार, ३१ जुलै, २०२१

झोका

झोका 
******
धुंदावल्या मनाचा या
झोका उंचावर जाई 
बांधलेली दोर फांदी
तया मुळी भान नाही .॥

झोक्यावर झोका चाले
गतिला त्या अंत नाही 
तना मना कैफ चढे
काळवेळ बंध नाही  ॥

माझ्यासवे झोका माझा 
माझेपण तया येई 
वर खाली जग होई 
हर्ष शोक येई जाई ॥

पाहतांना खेळ वेडा
झोका दिसेनासा होई 
दोर फांदी झाड झोका
जणू एकरूप होई.॥

आकाशाचे अंग होता
सुख अन दु:ख नाही
निथळतो चंद्र नवा 
उतरणे होत नाही ॥

म्हटले तो झोका होतो 
म्हटले तो रिता होतो 
मन पवनाचा गाठी 
अवधूत  खुणा  देतो ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...