कधी येशील?
**********
कधी येशील तू दत्ता
रूप तुझे रुपातीत
भरशील या चित्ता ॥१
शोध शोधले तुजला
रूप दिसले नाही रे
लाखो गुरूदेव जगी
कुणी आपले नाही रे ॥२
जगणे माझे बदल
मागत हे मी नाही रे
दे मोठेपण जगती
सांगत ही मी नाही रे ॥३
एक कण दे कृपेचा
विष वा दे अमृताचा
अन मला कळू दे रे
अर्थ या रे जगण्याचा ॥४
सुख भरले भोवती
पण मी सुखात नाही
जळे आग अंतरात
मिटता मिटत नाही ॥५
हे ही बरे केले म्हणा
पाश सारे सुटले रे
गृहसौख्य प्रेमबिम
नावालाच उरले रे ॥६
सुटला एक किनारा
दुजा मिळत नाही रे
प्राण कंठात येवून
श्वास सरत जाई रे ॥७
वाहिल्या वाचून तुला
जन्म निर्माल्य झाले रे
जाय ओघळून खाली
पदी पडले नाही रे ॥८
गेला जन्म फुका तर
दत्ता खंत असणार
किती जन्म कसा पुढे
आम्हा कसा कळणार ॥९
प्राण ठेवून डोळ्यात
जेव्हा मरेन मी इथे
आशा बांधून तयात
पुन्हा येईन मी इथे॥१०
नाव नसेल विक्रांत
देह नसेल विक्रांत
आस तझीच कृपाळा
पण राहील तयात ॥११
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा