लता
🌿🌱🌿🌱🌿
फक्त आधार
झाडाचा खांबाचा मंडपाचा
वर वर चढायला
बाकी ती कधीच मागत नाही
त्या वृक्षापासून अन्न
शोषून घेत कधी त्याचा जीवनरस
स्वयंसिद्धा असते ती
स्वतःची पाने मिरवणारी
तेजस्विनी
स्वत: च्या फुलात धुंद असणारी
मनस्विनी
स्वतःच्या फळांनी लगडणारी
स्वामिनी
कधीकधी तिला
नाही मिळत तो
भक्कम नीटस आधार
पण अपरिहार्य असते
जीवन आणि जगणे
मग ती जवळ करते
कधी ताराचे कुंपण
कधी काट्यांचे अंगण
वादळात वाऱ्यात
त्या काट्यांनी तारांनी
ओरबाडली जाते ती
फाटली जाते ती
जागोजागी तुटते ती
खिळखिळी होते ती
पण तिची जीवननिष्ठा
इतकी प्रबळ असते की
तिला फुटतात नवीन कोंब
नवीन पालवी नवे धुमारे
वेढून टाकतात ते
काट्यांचे जाळे कुंपणाच्या तारा
मग त्या खूपणाऱ्या तारा
अन टोचणारे काटे
विसरून जातात
त्यांचे स्वतःचे स्वरूप
अन जणू वेलच होऊन जातात
तिच्या रूपात हरवून
तिच्या असण्यात मिसळून
तिच्या कर्तुत्वाने बहरून
ही किमया केवळ
वेलच करू शकते
स्वतःच्या मार्दव्याने
लवचिकतेने धिटाईने
सबुरीने अन जीवनावरील श्रद्धेने
तिचे हळूवरपण
तिचे नाजूक पण
तिचे समर्पण
अन् स्वावलंबन
हेच तिचे सामर्थ असते
कारण ती लता असते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा