बुधवार, २८ जुलै, २०२१

शुन्याला भेटाया

शून्य
*****

शून्याला भेटाया 
शून्य हे अधीर 
संमोहाचा तीर 
सोडुनिया ॥

आकाशा आधार 
खांब खांबावर 
बांधून अपार 
चढू पाहे ॥

मिटताच डोळे 
जग मावळले 
एक उगवले 
नवे आत ॥

धरिले देहाला 
मनाच्या भुताला 
प्रतिमे म्हटला 
तूच आत ॥

सुख दुःख वाटे 
खरे भोगतांना
रडू प्रेक्षकांना 
चित्रपटी॥

रोज तीच कथा 
रोज तीच व्यथा 
परंतु पडदा 
कोरा सदा ॥

विक्रांत नसला 
कुठेच कसला
रंगात सजला 
प्रकाशाच्या ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...