गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

निरोप



निरोप
*****
भाऊ निघाला समरी
दही देते हातावरी
आई सांभाळ भावड्या
आण सुखरूप घरी

भाऊ शिवबाचा भक्त
त्यांच्या रक्तात तान्हाजी
खिंड राखेल शर्थीने
जणू दुसरा की बाजी

सीमा पेटली पेटली
विष दंतानी वेढली
नाच फड्यावर असा
कृष्ण होवून मुरारी

नको येऊन देऊस
आच एका घरावरी
भूमी इंच इंच लढ
कुळनाव सार्थ करी

वैनी लाडकी लहान
हात पिवळे अजून
नको पाहूस वळून
तिला डोळ्यात ठेवीन

येशी परतून जेव्हा 
गावी पिटेल दवंडी
जगी मिरवेल द्वाही
आला शिवबाचा गडी

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

अजुनि रक्त माझे



अजुनि रक्त माझे
**************

अजुनि रक्त माझे थोडे
 रे येथे सांडणार आहे
 सावध, फौज कोडग्यांची
 लपूनही पुन्हा येणार आहे

तेज तर्रार हे शस्त्र झाले
तुटूनिया पडणार आहे
एकेक रिपू  नग्न संगीन
रे आता टिपणार आहे

होऊ  दे रे अंत , इथला तो
प्रत्येक गद्दार मरणार आहे
हातात घेत मरण आता 
प्रत्येक कण लढणार आहे

आलो असे जन्मा  इथे मी
सार्थक ते करणार आहे
जननी जन्मभुमी तुझे गं
पांग मी फेडणार आहे


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

तर्पण




तर्पण
*****

जाहले तर्पण
आत्मा उर्ध्वगामी
निवली ही भूमी
तापलेली 

उधळली राख
चितेत थांबली
प्रवाही निघाली
अस्थि फुले 

आता शिवतील
काक त्या पिंडी
उमटून शांती
अंतरंगी

पेटलेल्या मनी
दुःखाची कहाणी
स्मृतीच्या सुमनी
शांत होय 

झालेय आता
तक्षकाय स्वाहा
इंद्राय स्वाहा
होवो काही  

भले केले वीरा
म्हणतो विक्रांत
असे पुरुषार्थ 
हाच खरा

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

दत्ता सांभाळी





दत्ता सांभाळी
***********
 दत्ता तुझा दास मजला करावे
सदा सेवेसी तुझ्या मी झिजावे

तुझे कृपा प्रेम पावते मी व्हावे
पदासी लागूनी जन्म हा तरावे

जन्म सारा हिंडलो मी तृष्णेपाठी
नच झाली कधी तुझी गाठी भेटी

सुख शोधतांना इथे दुर्दशाच पातलो
वेचले ते सारेच आता लोटून आलो

अनाथासी नाथा या तुचि सांभाळी
शरणागत विक्रांत दत्ता प्रतिपाळी

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

दत्ताचे भजन




दत्ताचे भजन
**********

दत्ताचे भजन
सदा करी मन
घडते चलन
देहाचे या

दत्ताचे वच
सदा स्मरे मन
भरण पोषण
घडे सवे

दत्ताला शरण
जाता शब्देविण
मन विलोपण  
घडतसे

हरविता मन
लिहिण्याकारण
नसे काही आन
दत्ता विन

लिहिणारा दत्त
वाचणारा दत्त
जाणणारा दत्त  
स्वयमेव

विक्रांत धुळीचा
कण दत्तपदी
दत्ताची बिरुदी
मिरवितो
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in




शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९

कधी येईल




कधी येईल हृदयी
दत्त माझा गिरनारी
कधी नेल मला
सवे प्रभू गिरनारी

कधी हरेल भवाचे
घर बांधले माचे
काही नसल्या भ्रमाचे
होता दर्शन रवीचे

कधी सरेल हा टाहो
असा माझ्या रातला
कधी पेटेल रे दिवा
न मंदिरा मधला

बापा करी रे करुणा
हाक पडू दे रे काना
दास म्हणवितो तुझा
नच ठरावी वल्गना

बघ सरला प्रकाश
दिस आला मावळती
येयेई जगजेठी
दाटे अंधार भोवती

घाली तुजला हाकारे 
दाटे पाणी डोळीया
वाट पाहून शिणला
होई उदास विक्रांत

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९

देव गजानन


देव गजानन
*********

हालवितो सोंड
फडफडी कान
आनंद निधान
गजानन

हासतो मधुर
सोंडेच्या मागून
मिश्किल डोळ्यान
पाहतसे

ध्यान लंबोदर
सुबक ठेंगणे
पायात पैंजणे
वाजतात

मस्तकी देखणा
मुकुट विशाल
मिरवितो भाल-
चंद्र छान

मूषक वाहन
ठेविले धरून
विश्वा या देऊन
अभय ते

दंत टंक करी
ज्ञानाचा वर्षाव
अज्ञान अभाव
सज्जनांस


पाश अंकुशाचा
धाक कळीकाळा 
भक्तांचिया गळा
कृपा हार

अैसा पाहियला
देव गजमुख
झाले प्रेमसुख
विक्रांत या

c.डॉ.विक्रांत प्राभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१९

त्या रक्ताचे मुल्य मागते



त्या रक्ताचे मुल्य मागते
*********************

त्या रक्ताचे मुल्य मागते
आता इथली माती रे
मना मनात आग पेटली
विद्ध प्रत्येक छाती रे

तडफडणारे क्षुब्ध मानस  
चरफडणारे श्वास असे रे
करण्या तर्पन त्या रक्ताने
हाताला या आस असे रे

शिशुपाला अपराध तुझे
शंभर आता भरले रे
ये क्षण उडविण्या शिर
चक्र आता आतुरले रे

क्षुद्र घातकी सर्पदंश हे
किती एक ते साहिले रे
चिरडण्यास डोके त्याचे
पाय आता उगारले रे

दया न आता व्याळाला 
मैत्री शब्द ही मेला रे
सूड हवा फक्त सूड तो
रक्ताभिषिंचित माला रे

वाट पहाते टकमक टोक
फितुराला भिरकावण्या रे
देशद्रोही जे आग लावती
इथल्या नंदनवनाला रे

शांतीचा हा देश ठरवला
तो शुभ्र कपडा फेकला रे
शांती नांदते त्याच घराला
जो बळी मुठी आवळला रे

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

आवाहन




आवाहन
******

उठा उठा हो
रुद्र भैरवा
उठा उठा हो
शिवशंकरा   

यावे तुम्ही  
तांडव करीता   
आणि उघडा
तृतीय नेत्रा

पाप साचले
नष्ट करा
नतदृष्ट ते
सारे मारा

ध्वस्त करा
पाप नगरा
घेवून तीक्ष्ण
त्रिशूल करा

येई चामुंडा
तू महाकाली
दुष्ट दानव
अवघे संहारी

शीर एकेक
घेई कापूनि
नदी वाहू दे
तिथे रुधिरीं

नाच थयथय
अशी अन
पाप्यांचा त्या
कर्दम करी

समुळ त्यास
नष्ट करी
पुन्हा न यावे
ते देहांतरी

सूड सात्विक
मनात पेटवी
रुजव अघोरी
तंत्र ते काही

खल निर्दालना
विना कधीही
सुखी होणार
नाही ही मही 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

माझे सचोटीचे गाणे




माझे सचोटीचे गाणे
*****************

गाडी चालते चालते 
तेल सरते सरते 
धूर भरल्या पथात 
रोज येणे जाणे होते 

पथ खड्ड्यांनी भरला 
देह खिळखिळा झाला
गाडी किती रे खटारा 
बोले बाजूनी जाणारा 

धास्ती दिव्याची रोजची 
कधी पंक्चर व्हायची 
पण मिळता पगार 
भिती उद्याला उद्याची

मोल कष्टाचे मिळता 
मजा जगण्यात आहे 
बरबटलेल्या खिशाला 
पाप वेटाळून राहे

पडो हाताला रे घट्टे 
श्वास धपापो उरात
स्वेदगंगेच्या या काठी
तप घडावे सतत 

दत्त चालवितो जिणे
ऐसे सुख  समाधाने
त्यांच्या पायी रुजू होवो 
माझे सचोटीचे गाणे

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...