तुझे पुष्कळ फोटो आहेत
मी गॅलरीत साठवलेले
कुठून कुठून शोधून यत्ने
एक एक जमा केलेले
जेव्हा तू कुठे दिसत नाही
शोधूनही सापडत नाही
अन तुला पहिल्याविना
मला चैन पडत नाही
तेव्हा मग अलगद मी
तो खजिना उघडतो
अन त्या तुझ्या प्रतिमांना
डोळे भरून पुन्हा पाहतो
साऱ्या तुझ्या भावमुद्रा
माझ्या सोबत बोलतात
डोळ्यामध्ये डोळे तुझे
खोल हसुन पाहतात
सैरावैरा झालेले मन
हळूच शांत स्थिर होते
अन आत दाटले सारे
वेडे काहूर मिटून जाते
कधीकधी जरा घाबरतच
मी तयास स्पर्श करतो
आपलेपण दाटून मनात
एका विजेचा जन्म होतो
कधी कधी मला वाटते
मीही एक प्रतिमा व्हावे
अन तुझ्या प्रतिमेसोबतच
अष्टप्रहर बसून राहावे
विक्रांत प्रभाकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा