रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४

तुझ्या प्रतिमेसोबत






तुझे पुष्कळ फोटो आहेत  
मी गॅलरीत साठवलेले
कुठून कुठून शोधून यत्ने  
एक एक जमा केलेले

जेव्हा तू कुठे दिसत नाही
शोधूनही सापडत नाही  
अन तुला पहिल्याविना
मला चैन पडत नाही  

तेव्हा मग अलगद मी
तो खजिना उघडतो  
अन त्या तुझ्या प्रतिमांना
डोळे भरून पुन्हा पाहतो

साऱ्या तुझ्या भावमुद्रा
माझ्या सोबत बोलतात
डोळ्यामध्ये डोळे तुझे
खोल हसुन पाहतात

सैरावैरा झालेले मन  
हळूच शांत स्थिर होते  
अन आत दाटले सारे
वेडे काहूर मिटून जाते

कधीकधी जरा घाबरतच
मी तयास स्पर्श करतो     
आपलेपण दाटून मनात
एका विजेचा जन्म होतो

कधी कधी मला वाटते
मीही एक प्रतिमा व्हावे
अन तुझ्या प्रतिमेसोबतच   
अष्टप्रहर बसून राहावे

विक्रांत प्रभाकर







तिने सजावे





तिचे निग्रही बंद अधर
प्रतिक्रिया वा ना उत्तर  
हिरमुसलेले उदास डोळे
मावळलेले हास्य कोवळे
कुणास ठावूक काय घडले
इंद्रधनुचे रंग का विटले
तिचे अवघे दु:ख आतले
हवे मला जर घेता आले
तिने सजावे मुक्त हसावे
रान पाखरू होत गावे  
प्रभू एवढे असे मागणे
मिटो काजळी उणे दुणे

विक्रांत प्रभाकर

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०१४

विझल्यानंतर






विझलेल्या शब्दांना
पुन्हा राखेतून
बाहेर काढतोय
फुंकर मारतोय
पेटवू पाहतोय
कुठेतरी एक ठिणगी
जिवंत असेल अजुनी
हात काळवंडलेत
कपडे राखाडलेत  
चहूकडे पसरलाय
थंडगार निपचित
कोळश्याच्या थर
अरे काल या राखेत
प्रेम होतं धगधगणार
सहज स्पर्शानं
उचंबळून येणारं
विश्व मिठीत घेण्यासाठी
अनावर उत्सुकलेलं
पण आज त्यातलं
काहीही दिसत नाही
नाचणाऱ्या आगीचं
अन या मनातलं
चित्र विझत नाही
सर्व सोहळे आगीचे
असेच असतात का ?
सर्व उधान प्रीतीची
अशीच विरतात का ?
कुणास ठावूक का
पण अजूनही..
राखेखालील
जमीन गरम आहे !

विक्रांत प्रभाकर




शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०१४

चुकलेल्या सुरांचं गाणं






माणसं जपायचं कसब
माझ्यात कधीच नव्हत
प्रवाहावर वाहणं माझं
उगाच जगण होतं
मी मित्र मिळवले नाही
मित्रांनी मला मिळवलं
काहींनी टिकवलं
काहींनी सोडून दिलं .
या सुटण्या धरण्याच्या खेळात
वाईट एकाच गोष्टीचं वाटतं
ज्यांना खरच
हृदयापासून जपायचं होतं
त्यांनाच मन दुखवत गेलं
मन असं का असतं
मनाला खरच काय हवं असतं
मला कधीच नाही कळलं
पण  चुकलेल्या सुरांचं
जीवन एक गाणं झालं

विक्रांत प्रभाकर

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...