बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

काळ

काळ
*****
आला काळ गेला काळ
तरीही कुठे न गेला काळ 
काय कुणा सापडला तो 
आकड्यामध्ये मोजून साल 

स्मरणा मध्ये साठतो काळ
मरणा मध्ये  गोठतो काळ
स्मरणा मरणा ओलांडून 
फक्त क्षणात असतो काळ

म्हटले तर असतो काळ
म्हटले तर नसतो काळ
तरीही जीर्ण तनु मधून 
हलकेच डोकावतो काळ

स्वप्न सुखाचे असतो काळ 
स्वप्न उद्याचे रचतो काळ
जगण्याला या जीवनाला 
अर्थ नवा देत असतो काळ 

अर्थासाठी परि पसरले 
हात तेवढे पाहतो काळ 
हेच घडावे घडणे मित्रा 
होऊन वर्ष सांगतो काळ 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरी
******
गीतेच्या मांडवी वेल ज्ञानेश्वरी 
कुसुम कुसरी सजलेली ॥१

एकेक शब्दाच्या अगणित छटा 
वाटेतून वाटा मोक्षाच्या गा ॥२

काव्य कौतुकात रंगता जीवन 
जाते हरवून सहजच ॥३

अर्थाच्या एखाद्या मनस्वी स्पर्शात 
मृत्यूचे संघाट हरवती ॥४

ऐसी दैवीवाणी  होणे पुनरपी 
नाही रे कदापी इये लोकी ॥५

अगा मराठीया इथे जन्मलेल्या 
ओलांडून भाग्या जाऊ नको ॥६

ओवी श्रवणी वा येऊ देत मुखात 
जन्म पै सुखात नांदशील ॥७

नाही रे सांगत विक्रांत मनीचे 
संतांच्या मुखीचे अनुभव हे ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २८ डिसेंबर, २०२५

मंगेशसाठी

मंगेशसाठी
(वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.)
*********

एक पक्षी व्हावे वाटते
मला कधी मंगेश साठी 
पण कावळा चिमणी नको 
दुर्मिळ थोडा रंगा साठी

मित्रांचा मित्र तसा तो 
पण जिवलग पक्ष्यासाठी 
नाव कुठलेही सांगो तो 
हो म्हणावे दोस्ती साठी 

कधी काही राहतात भेटी 
मैत्रीच्या ना बसतात गाठी 
रुखरुखं ती ही मिटून जाईल 
होवून पक्षी त्याच्यासाठी 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


मैत्री



मैत्री
****
दुरावणे मैत्रीचा अंत नसतोच कधी 
हरवणे मैत्रीचा धर्म नसतोच कधी ॥

पार्टी एक निमित्त असते भेटण्याला
पार्टीविना अर्थ नसे काय कधी मैत्रीला ॥

सेंड ऑफ मुळीच  माहीत नसतात मैत्रीला 
येतीजाती निरोप असे ठावुक असते मैत्रीला ॥

गाठीभेटीविना वर्ष कधी महिने जातात
स्वल्पविरामा त्या कधी कुणी का घाबरतात ॥

जिथे थांबते तिथूनच कॅसेट पुढे सुरू होते 
मैत्रीचंही त्याहून वेगळे असे काहीच नसते ॥

एकदा सजली कि खरी मैत्री अमरवेल होते 
आणि फळाफुलावाचून फक्त स्नेहावर जगते ॥

अन् स्नेह संपला तरच मैत्रीचा अंत होतो 
तोवर तो एक चिरकालीन धुंद वसंत असतो ॥

आदरयुक्त मैत्री कधी भक्तीयुक्त मैत्री असते 
प्रीतीयुक्त मैत्री कधी खोल कधी उथळ वाटते ॥

पण मैत्रीचे सारेच रंग तरल तलम असतात
अनुबंध हेच रे जीवनाचे खरे तरंग असतात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २७ डिसेंबर, २०२५

ज्ञानदेवी

पथिक
*****

देवा मी पथिक तुझ्या अक्षरांचा  
चालतो सुखाचा महामार्ग ॥ .

शब्द रस काव्य मनी सुखावलो 
चिंब रे भिजलो भक्ती भावे ॥

श्रवणे वचने पठने मनने 
सुखाचे चांदणे भोगीयले ॥

कळले वाटते परी न कळते 
मन भांबावते ठाई ठाई ॥

कळल्या वाचून तरीही कळते 
अन हरवते माझे पण ॥

एकेका ओवीत जन्म ओलांडला 
अन पार केला मृत्यू फेरा ॥

एक ओवी तुझी हा ही जन्म माझा 
अर्थ आयुष्याचा कळू आला  ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

मागणे

मागणे
****
घडू दे शेवट आता प्रवासाचा 
दिस अखेरचा गोड करी ॥१
नाही बुद्धिमान नाही धनवान 
जगलो लहान सामान्यसा ॥२
नाही कीर्तीवंत नाही यशोवंत 
परी अंगणात तुझ्या झालो ॥३
पावलो ती सुखे लागती जीवना 
भोगले दुःखांना सवे काही ॥४
जैसी जन चार जगती जीवनी 
भिन्न रे त्याहूनी नच नाही ॥५
उतलो मातलो नाहीच वाहणी
अवघी करणी देवा तुझी ॥६
देवा सुखरूप आणले जगात 
नेई रे परत तैसाची तू ॥७
परी नेण्याआधी एकच विनंती 
देवा देई भेटी  एक वेळ ॥८
पाहता पाहता तुझिया रूपाला 
मिटू दे हा डोळा अखेरचा ll९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

चैतन्य डोह

चैतन्याच्या डोही
*************
तुझ्या चैतन्याच्या डोही हरवलो 
भरून पावलो ज्ञानदेवा ॥१

जैसे माहेराशी येता अवसरी 
माया न आवरी माऊलीची ॥२

काय अन किती देऊ लेकराला 
तैसे या जीवाला जोजारले ॥३

माय केले नाही फार येणे जाणे 
फक्त तुझे गाणे आळविले ॥४

अंतरीची तार जडली तुझ्याशी 
भेटला मजशी कृपा राशी ॥५

राहू दे प्रेमात तुझ्या रात्रंदिन
एवढे मागणं तुज लागी ॥६

रहा हृदयात डोळ्यांच्या डोळ्यात 
विक्रांत तुझ्यात घे सामावून ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...