बुधवार, २२ मे, २०२४

नाते

नाते
*****

ज्या नात्यात भय नसते
ज्या नात्यात शंका नसते
ज्या नात्यात चिंता नसते
तेच नाते खरे असते .

ज्या नात्यात मागणे नसते
ज्या नात्यात वापरणे नसते
ज्या नात्यात देणे असते
तेच नाते बहरत असते

ज्या नात्यात क्षमा असते
ज्या नात्यात ममता असते
ज्या नात्यात ऋजुताअसते
तेच नाते टिकावु असते

आपण  नाव तयाला देतो
सखी बहिण बंधू म्हणतो
थोरासमोर आदराने झुकतो
ते नाते नावापुरते असते

जेव्हा नाते व्यवहारी होते
सोबत राहणे अपरीहार्य असते 
म्हटलं तर तेही नाते असते 
परंतु ते नाते 'ना' ते असते 

असे नातेही जगावे लागते 
वरवर खोटे हसावे लागते 
स्वतःलाही फसवावे लागते 
नाते ते प्लास्टिकचे फुल असते

क्वचित कुणाला कळते नाते 
क्वचित कुणाला सापडते नाते 
त्यांनी जीवापाड जपावे ते नाते
नातेच जीवनाला अर्थ देत असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 









मंगळवार, २१ मे, २०२४

नर्मदातीरी


नर्मदा तीरी
*********
असतील तर असोत सोबती 
नसतील तर नसोत सोबती 
सुटत असता जीवन गाठी 
देह असावा नर्मदे काठी 
असली तर असु देत मुक्ती 
नसली तर नसू देत मुक्ती 
तिच्या प्रेममयी तीरा वरती 
जन्मोजन्मी घडावी वस्ती 
तसे फार नच मागणे मोठे 
कधी जायचे ते ठरले असते 
पण हट्ट धरता आई ऐकते 
नियमालाही मुरड घालते 
रोज रोज ते करी तुण तुणे
रोज रोज मी मागे मागणे 
तुझ्या तीरावर घडो जगणे 
तुझ्या तीरावर देह सुटणे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


सोमवार, २० मे, २०२४

घेई जगून

घेई जगून
**********
आपण ठरवले तसेच 
जर जीवन झाले असते 
ठोकताळे आराखडे 
पक्के बसले असते 
तर जीवन काय ते 
जीवन उरले असते

असेच व्हावे तसेच काही 
वाटत असते ज्याला त्याला 
पण जे हवे तेच मिळते 
कधी सांगा काय कुणाला 

पाडाचा तो पहिला आंबा 
बहुदा मिळतो कावळ्याला 
अन् पूनवेचे टिपूर चांदणे 
दिवाभिताच्या नशिबाला 

वाटा दिसती वळणे चुकती
पुन्हा मागुती येणे घडते
परतण्यात ती हार नसते
नवे क्षितिज तुझेच असते

 काच तुटते भांडे फुटते 
पुन्हा वितळूनी नवीन होते 
ऋतूचक्रा मधून  फिरते 
जीवन जगण्यासाठीअसते

दुःख वेदना कधी होईल 
जिवलगही सोडून जातील
परी व्यथेची करून चिता 
जळत जिणे असे मूर्खता 

कुठे मधाळ गोडी लागली 
कुठे जहाल शिवी मिळाली 
कुठे मवाळ बोल ऐकली 
कुठे मौनात मिठी फुलली 

क्षण जे येतील वाट्याला 
घेई जगून त्याच क्षणाला
 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, १९ मे, २०२४

निळा प्रश्न


निळा प्रश्न
***********
निळी सावली आभाळात 
सांग कुणाची आहे पडते ॥
सूर्य येऊनि चंद्र फुलुनि 
निळी निळाई का न ढळते ॥
पोकळीत या अवकाशाच्या 
अपार पुंज हे तारकांचे ॥
लखलखणारे झगमगणारे 
प्रखर प्रदीप्त नि जळणारे ॥
तरीही तयाला वेढून घेऊन 
शांतपणे जी आहे बसून ॥
ती वाट कुणाची काय पाहते 
ही निळी सावली कुठून येते ॥
निळी सावली पाहता पाहता 
ज्याची असे त्या मनी कल्पिता ॥
हळूहळू मग ती निळी निळाई 
माझ्यात घुसते मज न कळता ॥
मग मी ही माझा नच  उरतो 
निळा इवला कण रे होतो ॥
सुटल्या वाचून प्रश्न विलक्षण 
निळा प्रश्न मीच जातो होऊन ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १८ मे, २०२४

स्वामी शरण

स्वामी शरण
********

आपल्या भक्ताशी सदा सांभाळीशी 
हृदयी वसशी स्वामी राया ॥१

ऐहिक कौतुके किती एक देसी
सुखात ठेवीसी सर्वकाळ ॥२

 दुःख निवारिशि दैन्य हरविसी  
व्याधी दडविशी कृपा कर ॥३

अशुभ शक्तीला ताब्यात ठेवीशी 
अन वळविसी शुद्धपथी ॥४

प्रारब्धाची गती जरी भोगविशी 
बाहेर काढीशी सांभाळून ॥५

राहो जीवनाची दोरी तुझ्या हाती 
मागणे विक्रांती अन्य नाही ॥ .६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १७ मे, २०२४

रुतून बसणं


रुतून बसणं
********

जर मी तिला म्हटलं की 

मला अजूनही तुझीच स्वप्न पडतात 
तिला हे खरं वाटणार नाही कदाचित

अजूनही स्वप्नात तोच वेडेपणा येतो अंगात 
करतो मी काही बहाणे येतो तुझ्या अंगणात 

तिथे सुद्धा बहुतेक वेळा तू तर नाहीच भेटत 
आणि मग राहतो मी तिथेच पुन: पुन्हा रेंगाळत

 इतकं खोलवर मनात रुतून बसणं हे बरं नसतं 
की हे जागे पण ही मग नकोसं वाटू लागतं
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, १६ मे, २०२४

प्रिय दंतवैद्य .


प्रिय दंतवैद्य 
*******
या भयानक उन्हाळ्यात 
जेव्हा उघडून फ्रीज 
दोन घोट शेतपेयाचे 
जातात पोटात 
ठणका न मारता  
दातात आणि दाढात 
तेव्हा मला माझा 
प्रिय डेंटिस्ट आठवतो 

जेव्हा दात दुखणे 
सहन करता करता 
हळूहळू जाते वाढत
कळ येऊन जबड्यात
जाते मस्तकात 
ठणका मारत
तेव्हा खरंच हो
देव होता आठवत 

थंड काय गरम काय 
चपाती काय भाकर काय 
ताटात युद्धाला उभे ठाकलेले 
शत्रू सैन्य होते वाटत
अरे बापरे दात एवढे दुखतात 
खरंच माहीत नव्हतं 
खाण्याचेही एवढे वांधे होतात 
खरंच वाटत नव्हते 

म्हणूनच आता 
प्रत्येक घोटाला 
थंडगार सरबताच्या 
प्रत्येक चमच्याला 
आईस्क्रीम कुल्फीच्या
मी धन्यवाद देतो 
माझ्या प्रिय दंत वैद्य मित्राला
थँक्यू व्हेरी मच 
खूप खूप धन्यवाद .चेतन !!

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...