सोमवार, २० मे, २०२४

घेई जगून

घेई जगून
**********
आपण ठरवले तसेच 
जर जीवन झाले असते 
ठोकताळे आराखडे 
पक्के बसले असते 
तर जीवन काय ते 
जीवन उरले असते

असेच व्हावे तसेच काही 
वाटत असते ज्याला त्याला 
पण जे हवे तेच मिळते 
कधी सांगा काय कुणाला 

पाडाचा तो पहिला आंबा 
बहुदा मिळतो कावळ्याला 
अन् पूनवेचे टिपूर चांदणे 
दिवाभिताच्या नशिबाला 

वाटा दिसती वळणे चुकती
पुन्हा मागुती येणे घडते
परतण्यात ती हार नसते
नवे क्षितिज तुझेच असते

 काच तुटते भांडे फुटते 
पुन्हा वितळूनी नवीन होते 
ऋतूचक्रा मधून  फिरते 
जीवन जगण्यासाठीअसते

दुःख वेदना कधी होईल 
जिवलगही सोडून जातील
परी व्यथेची करून चिता 
जळत जिणे असे मूर्खता 

कुठे मधाळ गोडी लागली 
कुठे जहाल शिवी मिळाली 
कुठे मवाळ बोल ऐकली 
कुठे मौनात मिठी फुलली 

क्षण जे येतील वाट्याला 
घेई जगून त्याच क्षणाला
 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...