शुक्रवार, २४ मे, २०२४

सरोवर

सरोवर
*******
त्या मोहमयी सरोवराचे जल 
चाखले तुम्ही एक वेळ 
तुम्हाला तिथे पुन्हा यावे वाटणे
आहे अगदी अटळ 
तो स्पर्श शितल मधुर 
ती जीवावर पडणारी भुरळ 
ते तृप्तीची अवीट महूर 
ते निस्पंदतेत जाणारे पळ 
किती विलक्षण असतात 
ती स्वप्नांची मदीर कमळ 
ते पेशी पेशीत उमटणारे कूजन 
ते रोमांचित होणारे तनमन 
आणि हरवून गेलेला काळ वेळ 
खरे तर ते असे सरोवर 
अचानक अनाकलनीयपणे 
सापडणे जीवनाच्या पथावर 
हा मोठा चमत्कारच 
आणि त्या सरोवराचे आमंत्रण 
शुभ्र बाहू पसरून 
आपल्या प्रतिबिंबासह 
आपल्याला घेणे सामावून 
अन अपूर्णतेला जीवनाच्या देणे कारण 
किती विलोभनीय असते .
तरीही ते मोहमयीच आहे
अन सोडून जाणेच आहे 
हे कडवट आणि दुःखद सत्य
व्यापून उरते येता जागृतीच्या काठावर 
मग मधूर सुखाचे स्वप्नाचे ते ठिकाण 
ठेवून हदयात निघतो आपण
ओढत नेते जीवन आपल्याला दूरवर 
त्याच आपल्या धुळीच्या रुळलेल्या
म्हटले तर ठरलेल्या-नियत वाटेवर
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी ) ****** वळवले दाम ठोठावले काम  मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥ तुझाच भरोसा आता तीर्थंकरा उणीव न यावी तु...