सरती वाट
*******
उरलेली चार पावले त्यावर प्रेम करावे आणि भरभरून जगावे की
दिसणाऱ्या मुक्कामाकडे लक्ष देऊन
इतर सारे दुर्लक्ष करून
भरभरा चालावे कळत नाही
इतके वर्ष तीच पायपीट केल्याने
आता संपेल हे चालणे
आणि विश्रांतीच्या दगडावर बसून
चार श्वास घेता येतील शांतपणे
असे वाटणे साहजिक आहे
खरंतर प्रत्येकालाच आपली नोकरी
ही तशी ठिकठाक वाटते
अन अपरिहार्यही असते
मुद्दलात सोडायची सोयही नसते
तरीही कधीतरी ती संपणार असते
पण शेवटी शेवटी नोकरीच्या
वर्ष लांबते महिने मोठे होतात
प्रसंग नकोसे वाटतात
जबाबदाऱ्यांचे ओझे वाटू लागते
अन क्लेमचे नाव निघतात
प्रामाणिकपणे काम केलेल्या मित्रांची
सहकाऱ्यांची आणि स्टाफची
झालेली ससेहोलपट आठवते
अन् पोटात गोळे येतात
ऑडिटर अकाउंटंट क्लार्क हे अडथळयाच्या शर्यतीतील अडथळे वाटू लागतात .
आज सोबत असणारे
सहकारीही मित्र सल्लागार आणि हितचिंतक
उद्या फक्त हाय हॅलो चे उच्चारक उरणार
जणूकाही एक जग त्या एका तारखेला
कोणीतरी गिळणार
हे अटळ सत्य ही कुठेतरी बोचू लागते
अर्थात पुढेही नवीन आव्हान असणार
घेतली अंगावर तर वादळही येणार
बसले घरात तर स्वेटरही भेटणार
पण ही चार पावले
वेगळी आहेत विशेषही आहेत
या काल चक्रातील शेवटची आहेत.
म्हणून स्मृतीच्या कोंदणात
सजून बसत आहेत.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा