बुधवार, २९ मे, २०२४

वाटा


वाटा
*****
साऱ्याच वाटा समोरच्या जगायच्या असतात . 
समोर आल्यावर चालायच्या असतात . 
वाटा कधी कधी अपरिहार्य असतात 
तर कधी कधी बदलता येतात 
पण पर्याय हातात असेपर्यंतच .
 कारण काही वाटा परत फिरत नसतात 
एकतर्फी वाहतूक असते तिथे 
परत फिरायला वेळ नसतो हातात 
किंवा परतीचे मार्गही बंद होतात 
आणि मग जी वाट आपण चालतो 
ती निमुटपणे चालावी लागते .
नशीबवान असतात ते 
ज्यांना भेटते हवी ती हवी तशी वाट 
काटे कुटे दगड तर प्रत्येक वाटेवर असतात 
अगदी राजमार्गावरही कधी कधी ठेचा लागतात 
पण चालणाऱ्याला जी वाट सुटू नये
असे वाटते ती वाट खरच नशीबवान असते 
आणि चालणाराही 
बाकी कधी ऊन कधी सावली 
हा खेळ तर चालतच असतो .
कधी कधी वाटते वाट पाया खाली नसते 
तर ती मनात असते 
अन
चालण्यात आनंद वाटू लागला 
की वाट कुठली कुठे जाते याला मूल्य नसते .
काही लोक वाटेवरून घसरतात 
चुकत चुकत आडवाटेला ही लागतात .
कधी कुणाला ते कळतं तर कधी कळतही नाही तर कधी कोणी कळूनही 
ते मुद्दाम त्याच वाटेने चालत राहतात
त्या आडवाटेचे सुख त्यांना अधिक आवडू लागते 
शेवटी प्रत्येक वाटेला एक शेवट असतो . 
मुक्काम असतो जो येणारच असतो . 
प्रवास चांगला असो किंवा वाईट असो 
पथ सुखकर असो किंवा दुःख कर असो 
कालौघात बुडून जातो .
विस्मृतीच्या मातीत मिसळून जातो 
विराट विश्व संचालनात 
ती एक नगण्य हालचाल असते . 
तरी चालणाऱ्या साठी ती 
किती महत्त्वपूर्ण आणि मोठी असते 
कारण त्याच्यासाठी ती तेवढीच असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विश्वास

विश्वास ******* घुसू दे पायात लाख काटेकुटे दत्ता तुझ्या वाटे मुकु नये ॥ चालतो मी वाट दिशा धरुनिया नच जावी वाया धडपड ॥ दिशा हरवता...