शनिवार, १५ एप्रिल, २०२३

पिंजरा (उपक्रमा साठी )

पिंजरा
******
पाहून पिंजऱ्या-मधले पाखरू 
उरी गहिवरू 
येत असे ॥१

कडी बाहेरून घट्ट अडकून 
गेलेय निघून 
कोण बरे ॥ २

जगणे आहेच हे ही तसे तर 
मग क्षणावर 
का रे ओझे ॥३

पडेल पिंजरा तुटेल कडीही
जाईल पक्षीही
उडून हा  ॥४

पण भिंतीवर बसली मांजर 
पोटी गुरगुर 
सुप्त तिच्या ॥५

हिरवट डोळे काचा गोठले 
दिसती बसले 
प्रतिक्षेत ॥६

पक्षी पिंजरां नि करडी मांजर 
कुण्या क्षणावर 
नाव कुणाचे ॥७

तोवर करणे ही पोपटपंची 
हिरवी मिरची 
खात खात ॥ ८

जरी खोलवर मनात फडफड 
व्यर्थ धडपड 
उडण्याची ॥९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, १४ एप्रिल, २०२३

मी

मी
***
निशब्द एकांतात मनाच्या कुहरात 
जाणीवेच्या जगात 
उरलेला मी ॥१
अगणित अनंत आभाळाचे पट 
सहजच मिटत 
चाललेला मी ॥२
उमटला आघातात निघाला कानात 
शब्द त्या दरम्यान 
होतो जणू मी ॥३
डोळे तव रोखले करूणेने भरले
अस्तित्वच जाहले 
पाहणारा मी ॥४
मग माझ्यातले प्रश्नचिन्ह थोरले 
होवुनिया ठाकले 
शोधणारे मी ॥५
प्रश्ना पलिकडला उत्तरा अलिकडला 
संवाद खिळलेला 
घन मौन मी ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

मार्ग २

 
मार्ग २
****
कुणा लगबग त्वरा 
जाणे मुक्कामाच्या घरा ॥१
कुणी रमतो गमतो 
मजा बघत चालतो ॥२
कुणी थकतो झोपतो 
उद्या पाहू या म्हणतो ॥३
कुणी सारे विसरतो 
पथी घरची बांधतो ॥४
सारे पांथस्थ मुक्तीचे 
सोयरे गुरुच्या घरचे ॥५
पथ जीवाच्या मुक्तीचा 
पथ स्वात्म बघण्याचा ॥
जे का लागले मार्गाला 
ध्येय मिळणे तयाला ॥६
जया निकड जितकी 
तया प्राप्ती ही तितुकी ॥७
जे का थकले भागले 
पथी संसारी रमले ॥८
जाणे तयाही तै आहे 
जाग येताच ती पाहे ॥९
जाणे विक्रांत चालणे 
पाहू कधी  पोहोचणे ॥१०
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १२ एप्रिल, २०२३

मार्ग

मार्ग
******
जया ठाई जैसे बळ 
तया साधनी तो मेळ ॥१
गुरु होऊन कृपाळ
मार्गा लावती सकळ ॥२
कुणी मनाचे मवाळ 
होती भावात विव्हळ ॥३
कुणी बुद्धीने  तर्तार 
जणू ज्ञान तलवार . ॥४
कुणी सेवेसी तत्पर
तिथे करुणा अपार ॥५
कुणी  निग्रही कठोर
मन कोंदाटी अंतर ॥६
कुणी अडाणी संसारी 
ध्यान बाजारी देव्हारी ॥७
व्यक्ती जितुक्याजितुक्या 
युक्त्या तितुक्यातितुक्या ॥८
कुणा देती भक्ती ध्यान 
कोणा देती कर्म ज्ञान ॥९
कुणा रूढ कुलाचार 
मार्गी लावती साचार ॥१०
होत ज्ञानेशा सादर 
होय विक्रांत हा पार ॥११
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

 राऊत सिस्टर
**************†*

देव कृपेने मज ला भेटली 
एक आणखी छोटी बहिण 
विचित्र ती हट्टीच जरी की 
भरली बहुत मातृ मायेनं

अन्नपूर्णाच जणू दुसरी 
करीतसे संतुष्ट प्रसादानं
कधी भरवी शिरा कोरडा 
कधी देतसे हलवा आणून 

कृतज्ञता ती जणू ये भरून 
सत्कृत्याची वा काही रुजून 
देणे घेणे काहीच नसून 
दत्त देई मज  बंध अजून

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 


मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

तुझा ठाव

 


तुझा ठाव

***,***

कृपेचिये अंगी लागे तुझा ठाव 

बाकी धावाधाव 

व्यर्थ सारी ॥१

बांधुनिया बळ केला बहु योग 

धावूनिया याग 

आचारले ॥२

प्रेमाविण नाम कधी ना फळले

वाहूनिया गेले

काम क्रोधी ॥३

जाणुनिया सारे तेच करी सारे 

विक्रांत फुका रे 

भक्ती करी  ४

उरातील भूक करते बेचैन 

मग धीरावीन 

घडे चोरी ॥५

अगा माय बापा क्षमा आता करा 

हृदयाशी धरा 

दीनास या ॥६

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com
 ☘☘☘☘☘☘ .

रविवार, ९ एप्रिल, २०२३

हंबरू


हंबरू
*****
मनातले गाणे 
मनापार गेले 
आकाशी विरले 
वारे जैसे ॥१
मनात हुंदका 
दाटला शून्याचा 
स्पर्श माऊलीचा 
आठवला ॥२
डोळ्यात खळाळ 
आली इंद्रायणी 
गजर तो कानी 
निनादला ॥३
किती काळ ऐसा 
राहू दूर माय
अंधाराचे भय 
दाटलेले ॥४
होय कासावीस 
अंतरी अंतर 
विरह वादळ 
दुणावले ॥ ५
सांगता मागता 
शब्द सरू गेले 
अस्तित्व जाहले 
स्तब्ध उगे  ॥ ६
आता देणे घेणे 
तुझे तुच जाणे 
नूरले गाऱ्हाणे 
माझे काही ॥७ 
विक्रांत केवळ
अजान वासरू 
उरात हंबरू 
दाटलेला ॥ ८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .


अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...