शनिवार, १५ एप्रिल, २०२३

पिंजरा (उपक्रमा साठी )

पिंजरा
******
पाहून पिंजऱ्या-मधले पाखरू 
उरी गहिवरू 
येत असे ॥१

कडी बाहेरून घट्ट अडकून 
गेलेय निघून 
कोण बरे ॥ २

जगणे आहेच हे ही तसे तर 
मग क्षणावर 
का रे ओझे ॥३

पडेल पिंजरा तुटेल कडीही
जाईल पक्षीही
उडून हा  ॥४

पण भिंतीवर बसली मांजर 
पोटी गुरगुर 
सुप्त तिच्या ॥५

हिरवट डोळे काचा गोठले 
दिसती बसले 
प्रतिक्षेत ॥६

पक्षी पिंजरां नि करडी मांजर 
कुण्या क्षणावर 
नाव कुणाचे ॥७

तोवर करणे ही पोपटपंची 
हिरवी मिरची 
खात खात ॥ ८

जरी खोलवर मनात फडफड 
व्यर्थ धडपड 
उडण्याची ॥९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गाणे

गाणे **** काही उरली सुरली  माझी निरोपाची गाणी घेई उचलूनी हाती देई दूर वा सोडुनी ॥१ मुठ करता रिकामी  मुठ मुठ न उरते  होते साठवले ...