सोमवार, १७ एप्रिल, २०२३

गर्दी

गर्दी
*****

जयंतीला किंवा  उत्सवाला 
गर्दी करणारे वेगळे असतात 
गर्दी जमवणारे वेगळे असतात 
आणि गर्दी सांभाळणारे वेगळेच असतात

गर्दीत जमण्याचे वा गर्दी जमवण्याचे
प्रत्येकाचे कारण वेगळे असते 
बेरीज वजाबाकीही वेगळी असते 

कुणीतरी भावनेची हाळी दिली की 
देवाच्या धर्माच्या कर्माच्या 
शोषणाच्या संघर्षाच्या नावाने 
होतात  गोळा सारी मंडळी
अन आवाज करू लागतात 
बेजार  बेसहारा रस्त्यातून
लाल हिरवे निळे पिवळे 
झेंडे हातात घेऊन

अन मग फाटक्या घरापुढे 
आणि तुटक्या चाळीपुढे
लागतात हजारो रुपयांची बॅनर्स 
आणि झळकतात चेहरे 
भविष्यात येऊ घालणाऱ्या 
महत्त्वाकांशी नेतृत्वाचे
वर्गणी जमणाऱ्या हाताचे 
कायमच बुरुजावर 
राहू इच्छिणाऱ्या सरदारांचे

त्या रस्त्याला नसतं सोयर सुतक
त्या जयंतीचे त्या उत्सवाचे 
त्या रस्त्याला हवी असतात
फक्त चालणारी पाऊलं
आणि धावणारी चाकं 
ती पावलं अडखळतात 
ती चाकं थांबतात 
आणि गंतव्यावर जाणाऱ्या 
प्रत्येक वाटसरूचा हिरमोड होतो 
तो त्यांना व्यक्तही करता येत नाही 
डोळ्यातूनही बोलता येत नाही 
क्वचित कदाचित त्यांनाही त्यातच 
सामील व्हाव लागतं 
नाहीतर ती ठरतात गुन्हेगार .
आणि भोगतात शिक्षा चोरागत
आपल्या न केलेल्या कर्माची

कळपंच मोठी असतात
अन गर्दीच श्रेष्ठ ठरते 
तथाकथित विचारवंतही 
तिथे घेतात नमते .
वाहू द्या गर्दी वाजू द्या डीजे
आपले कान बंद करा 
आणि दार खिडक्या घट्ट लावा 
जर तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर .
पण त्यांना सांगायला जाऊ नका 
शिकवायला तर मुळीच जाऊ नका

नाहीतर घेतली जाईल तिथे 
तुमचीच शिकवणी
आणि मागावी लागेल क्षमा 
आपलेच दोन्ही कान धरुनी

आणि गर्दी झाल्यावर 
गर्दीच्या गदारोळात जर 
तुम्ही गेला चिरडून
कुणाच्यातरी पायाखाली येऊन 
किंवा उन्हात होरपळून 
वा विजेचा शॉक लागून
किंवा आणखीन कशानं
तर
मिळतील पाच लाख तुम्हाला 
जे येणार नाहीत कधीही तुमच्या कामाला

हे गर्दीचे तथ्य ज्यांना कळते
ते गर्दी व्हायचे नाकारतात
ते उगाचच मार खातात 
पण त्यांना हे स्वीकारावेच लागते
ते सतीचे वाण असते .

पण मला आपलं वाटते
गर्दीत चिरडून मरण्यापेक्षा 
कुठल्यातरी माळरानावर 
विशाल वृक्षा खाली 
सूर्यप्रकाशात किंवा चांदण्यात

 तन् मन व्यापलेले असावे आनंदाने
तेंव्हा मरावे सुखाने

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...