शनिवार, ८ एप्रिल, २०२३

कुठे जाण्यासाठी



कुठे जाण्यासाठी
**************

पुन्हा पुन्हा तोच डंख खोल मना होत आहे 
देहाच्या या कवचात जीव गुदमरत आहे ॥१
 
विकारांचे उठतात घोंगावती लोंढे मोठे 
पालापाचोळ्या गत हे मन वाहत आहे ॥२

तेच तेच व्यर्थ भोग त्याच त्याच रिंगणात 
गुलामसे जीवन हे तसेच फिरत आहे ॥३

खिळलेले रूपा डोळे रंगी रममान आहे 
रात्रीच्या या अंधारास उगा घाबरत आहे ॥४

तेच स्पर्श रुळलेले त्याच मऊ पायवाटे 
काट्यांचीच स्मृती उरी का बरे वाहत आहे ॥५

मग्न हे सुरात कान होत मदहोश असे 
अनित्यतेचा आक्रोश का खोल स्मरत आहे ॥६

वेटाळून गंध किती जीवास मोहवती हे 
पण वारा सरणाचा उर दडपित आहे ॥७

अन मश्गुल रसात शब्दात नाचते जिव्हा 
ते शून्य पार्थिवाचे का बळे विसरत आहे ॥८

तोच तेच स्वप्न अन कुठल्या अनाम स्मृती
कुठे जाण्यासाठी जीव हा तळमळत आहे ॥९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरणार परिक्रमा

गिरणार परिक्रमा ***†**†****** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ ...