साद घालते
*********
लोभ हाच रे मजलागी सदा स्मरावे तुज लागी
घननिळ या स्वप्नी माझ्या
सदा राहू दे मज जागी
हास जरासा डोळ्यातूनी
काया जाऊ दे मोहरूनी
तुझ्या कटाक्षासाठी एका
जन्म घेईल मी फिरूनी
घेशील कधी जवळ तू
मयूर पंख देशील तू
या आशेवर वेड्या मी रे
देहापार या नेशील तू
जग म्हणू दे खुळी झाले
लोकलाज मी विसरले
झाल्यावाचुनी स्पर्श तुझा
नकोच जीणे रे इथले
मी न गोकुळी वृंदावनी
मी न मथुरा त्या कौडीन्यी
वाटेवरती जन्माच्या या
साद घालते तव दुरुनी
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा