बुधवार, १९ एप्रिल, २०२३

रान

रान
*****
अतृप्तीचे रान घनावले गर्द 
जातिवंत जर्द 
नाग त्यात ॥१
विकार गरळ मुखी दाटलेले 
क्रूर टपलेले 
डसण्याला ॥२
सरती ना दंश वेदना अपार 
भान थाऱ्यावर 
येत नाही ॥३
मरणा वाचून घडते मरण 
कळल्या वाचून 
जगणे हे ॥४
निळकंठ बाबा करी दया आता 
गुरुदेव दत्ता 
मजवरी ॥५
सोडव हे वेढे पायी पडलेले 
भय दाटलेले 
मरणाचे ॥६
विक्रांत पामर देही नाही बळ 
तुची तू केवळ 
त्राता माझा ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वरदान

वरदान ****** उगा उगाच पथात पाऊस पडुन गेला  थकल्या जीवा तजेला क्षणात देऊन गेला    मागेपुढे होता दग्ध रखरखाट सारा  व्याकुळले प्राण...