मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

ज्ञानदेवांचे आकाश

ज्ञानदेवांचे आकाश
***************
तुझ्या शब्दाच्या या अपार आकाशात 
माझ्या इवल्या अश्या पंखांनी उडतांना ।
मी स्तिमित होतो पुनः पुन्हा ज्ञानदेवा 
विस्तारणारे ते क्षितिज विश्व पाहतांना ॥१

तुझ्या प्रेमप्रकाशात नखशिखात नाहतांना
अन तुझा पैस मनी विस्तीर्ण आठवतांना ।
होतो वेडा उखिताच जणू इथे चालतांना 
विसरतो सार सारेच शब्द शब्द वेचतांना ॥२

मान्य मजला अजूनही नाही येत रे 
मनाची या  नीट आराणूक करतांना ।
चंद्रकलेगत पसरले ज्ञानामृतकण तुझे 
चकोर तलग्यागत मवाळपणे वेचतांना ॥३

पण शब्द उपमा कविते सोबत जाणवतो
तू हळूच माझ्या मनात प्रवेश करतांना ।
तुझ्या प्रेमाने अन औंदर्याने भारलेले मन
सहज शांत होते  कुशीत तव निजतांना ॥४

त माऊली माझी तुच जीवाचा या विसावा 
तुझ्यासाठी जन्मा यावा मजला ज्ञानघना ।
जाणतो मी जन्म कोटी लागतील ओलांडया 
तुझे दर्शन ज्ञान सिंचन होण्यास रे या मना ॥५

तोवरी घडू दे रे हीच सेवा पुन्हा पुन्हा 
ग्रंथ ज्ञानेश्वरी नित्य मिळावा पारायणा  ।
शब्दोशब्दी वाचीत तुजला मनी घेत उगाणा
तुझ्या भेटीसाठी मी तुलाच करील प्रार्थना ॥६

जरी खुरट्या पंखांचे लेकरू विक्रांत हे
देई मज बळ माये कौतुकात हिंडतांना ।
कुर्मदृष्टी ठेवी स्निग्ध बाळ दूर वाढतांना
सदा सदा राख इया जगी मज बुडतांना ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आरसा

आरसा ****** तुझिया डोळ्यांनी मीच मला पाहतो वादळ संवेदनांचे कणाकणात वाहतो  कविता तुझ्यावरच्या  लिहून खुश होतो  मी तुला खुश करतो क...