मैत्री
*****
मित्र जपायचे असतात
कारण मित्र हेआपली
प्रतिबिंब असतात
आरशा वाचून पडलेली
मित्र हे आपली स्वप्न असतात
निद्रे वाचून दिसणारी
तिथे आपणच आपल्याशी बोलतो
आपणच आपल्याला ऐकतो
दिशा ठरवतो मार्ग बदलतो
आपल्या ध्वनी नादाचा
प्रतिध्वनी मित्र असतो .
पण कधी कधी
आपल्या त्या मित्राचे
मित्रही वेगळे होवू लागतात
तेव्हा ते मित्रही
वेगळे वाटू लागतात
वेगळे वागू लागतात
वेगळ्या रस्त्याने जाऊ लागतात
अन वेगळी गाणी गाऊ लागतात
त्याला काही इलाज नसतो
सारीच फळे एकाच झाडाची
किती दिवस सोबत राहतात
तरीही आपण असतो
शतशः त्यांचे ऋणी
त्या ओघळत्या सोनेरी क्षणी
जीवन सुंदर केलेले असते त्यांनी
तेच मित्र अन ती मैत्री सदैव राहावे ही
इच्छा असते मनात अन असावी ही
पण अट्टाहासने होत नसते काहीही
कारण आज उगवला
मित्र जरी तोच असला
तरी तो दिवस तोच नसतो
जरी तेवढाच सुंदर असला
तरी तसाच नसतो
जेव्हा मित्र सोबत असतो
तेव्हा तो त्या दिवसाचे सार्थक करतो
तो दिवस ग्रेटच असतो
कारण आपण आपल्या सोबत असतो
पण तो जातो
त्यानंतर तो चंद्र ही आपलाच असतो
रात्रही आपली असते
ते ग्रह तारका आपली असतात
नदी वृक्ष आपलीच असतात
मित्र होऊन आपल्याला रिझवतात
सदैव सोबत करत असतात
त्या वृक्षाची कुरणाची नदीची क्षितिजाची
आपली मैत्री ही तशीच उत्कट असते
तेही जीवनाचे गाणे असते .
कारण मैत्री ही मित्राहूनही मोठी असते .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा