शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

दत्त लेखणी

लेखणी
******
दत्त कीर्ती साठी 
जाहलो लेखणी 
सुख ते अजूनी
काय असे ॥१

दत्त रूप ध्यातो 
दत्त गुण गातो 
दत्ताला स्मरतो 
येणे गुणे ॥२

दत्ता विनवितो 
दत्ताशी भांडतो 
सलगी करतो 
लडिवाळ ॥३

सुखदुःख सारे 
दत्ताला सांगतो 
आशिष  मागतो 
हक्काने रे ॥४

घर दारा पोरे 
तया हाती देतो 
सांभाळ म्हणतो 
वेळोवेळी ॥५

दिसल्या वाचून 
विश्वास जागतो 
मजला पाहतो 
दत्तराज ॥६

विक्रांत दत्ताचा 
दास म्हणवितो 
सुखात राहतो 
सर्वकाळ ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०२२

देह वाहतो

देह वाहतो
********

मरणाच्या वाटे देह हा वाहतो 
क्षणक्षण खातो काळ त्याचा ॥१

तया निरुपाय असे जगण्याचा 
पिंड पोसायचा जन्मभर ॥२

जाती हत्ती घोडे रथी महारथी 
नवे उपजती लढावया ॥३

जन्म आपोआप झाला असे वाटे 
मरणही दाटे तैसेच ते ॥४

उदर भरण कुटुंबं पोषण   
यातच जीवन सरू जाते ॥५

विक्रांत हताश रिक्तता पाहत 
मनाच्या राज्यात निजू जातो ॥६

कोणा आळवावे सोडवा म्हणावे 
गुमान मरावे किंवा येथे ॥७

जरी सोडवता म्हणतो मी दत्ता 
कळपाच्या वाटा तरी चाले ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

मनिषा अभ्यकर ताई.

मनिषाताई . 
*********

लेक लाडकी ज्ञानाईची
गुपितं सांगते भक्तीची 

ज्ञान  कर्म अन योगाची
करून उकल शब्दांची 

कृष्ण सखासे ताईचा 
सदा सर्वदा प्रीतीचा

चिंतनात जे काही कळले 
ज्ञानकण जे त्वा जमविले 

जनहितार्थ करूणा ल्याले 
मुक्त हस्ते आम्हा वाटले 

अशीच राहो सदैव सजत
शब्द पुजा ही सुंदर घडत

डॉ.विक्रांत तिकोणे






गुरुवार, १५ डिसेंबर, २०२२

कळेना


कळेना
******
कळता कळेना 
मजलागी दत्त 
म्हणवितो भक्त 
तरीसुद्धा ॥१

 कळेना भजनी 
कथा प्रवचनी 
पूजेच्या साधनी
काही केल्या॥२

हरवले शब्द 
थकली कवणे 
झाले दीनवाणे
महाग्रंथ ॥३

चोखाळल्या वाटा 
किती एक इथे 
परी भेटले ते 
गाव रिते ॥४

नसते मरण 
परंतु आशेला 
जीवन पणाला 
लावले मी॥५

शेवटचा क्षण 
पाहिल मी वाट 
प्राण डोळीयात 
ठेवूनिया ॥६

घेऊनिया दत्त 
प्रतिमा विक्रांत 
हृदयाशी घट्ट 
धरीतसे ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

बुधवार, १४ डिसेंबर, २०२२

विरहण

विरहण
****

ते दुःख 
तुझ्या विरहाचे 
रात्रंदिन जाळणारे
बुडविले गाण्यात मी

विसरण्यास तुला 
तेच  मार्ग जुने
चोखाळले
पुन्हा  मी 

मागीतली
बदनामी अशी 
वेड्यात जमा 
झाले मी

यत्नांनीच 
साऱ्या पण
झाल्या तीव्र 
तव आठवणी 

आणि गेल्या 
खेचुनी मजला
पुन्हा तिथेच
शतखंड करुनी 

रिती रिती 
ही स्वप्न झाली
तन मन माझे
पोखरली

स्तब्ध तशाच 
रम्य आठवणी 
आणि सोबती
करूण विराणी

मिळू नये 
कुणास कधी
जगात प्रेम 
असे निष्फळ

सुकू नये
बाग कधीच
स्नेह पाणी 
घातले अपार

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

दगड



दगड
:*****
राजवाड्याच्या बागेमध्ये पडलेला 
एक क्षुल्लक दगड 
मिरवत होता फुशारत होता 
मी राजाच्या बागेतील दगड आहे म्हणून 
राजाला तर त्याचा पत्ताही नव्हता 
आणि पत्ता होणारही नव्हता 

तो दगड कदाचित 
राजवाडा होण्याच्या अगोदरही तेथे होता 
किंवा कुठल्यातरी सामानातून 
तिथे येऊन पडला होता 
किंवा कोणीतरी कुठून तरी  फेकला होता 
पण तेही त्याला आठवत नव्हते 

पण ज्या क्षणी त्याला जाणीव झाली 
आपल्या असलेपणाची आपल्या क्षुल्लकपणाची
आणि निरर्थकथेची तो झाला राजाचा दगड 
आणि त्या स्वनिर्मित सांत्वनेत 
त्याने शोधला अर्थ स्वतःचा स्वतःपुरता 
अन तो म्हणून घेऊ लागला स्वतःला 
राजाचा दगड राजाचा पाईक राजाचा समर्थक 
आणि राजाचा भक्त ही
फक्त आजूबाजूची शहाणे त्याला 
विक्रांत म्हणत होते एवढेच

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

रविवार, ११ डिसेंबर, २०२२

गाणं आभाळाचे

गाणं आभाळाचे
******

गाणं आभाळाचे तुझे 
माझ्या मनी सुरावले 
तनु सावळी आवेगी 
मज विजे लपेटले॥

लोट धमन्यात खुळे 
अन उर धपापले 
श्वास होतं सागराचा
पाणी डोळ्यात दाटले ॥

तुझ्या खुळ्या सहसाने 
किती नग ओलांडले 
सारे लावून पणाला 
प्रेम मिठीत घेतले ॥

ऐसा भेटता हा ऋतू 
झाले सार्थक जन्माचे 
प्रीत कळली धरेला 
द्वैत मिटले मनाचे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...