शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२

नसणे

नसणे
******

विक्रांत जगला अथवा की मेला 
दत्ताचा जाहला आहे आता॥१
कुणी ठेवो नावो कुणी गुण गावो 
चित्ता नाही ठावो कशाचाही॥२
नको धनमान नको यशोगान
दत्ताचे चिंतन पुरे मज ॥३
सरले कारण आता जगण्याचे
नाही मरण्याचे काम उरे ॥४
आहे तिथे आहे जाय तिथे जाय 
आणि सांगू काय मात इथे ॥५
घडले न काही घडणे न काही 
नसणे मी पाही माझे आता ॥ ६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘
 


गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

दरवळ

दरवळ
*******
तू एक दरवळ 
होऊन सभोवत 
असते वावरत 

आणि मी माझे 
आभाळ सावरत 
असतो त्यात 

मन ज्या म्हणती 
तेही नसते 
नच सापडते

तुझे पणाचे 
कोंदण भोवती 
दिशा उजळती 

तुझी ओळख 
मनात मुरते 
अन गाणे होते

कधी न सरावा 
आषाढ वाटतो 
तो घन मी होतो 

तुझे असणे 
पुरते मजला
या जगण्याला 

आणि बहाणे 
सार्‍याच सुखाचे
होतात साचे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

शिकारी



शिकारी
********
तुटलेल्या धनुष्याचा 
नेम सदैव चुकतो 
उलटून बाण पुन्हा 
मारणार्‍या लागतो ॥
लक्ष्य समोर दिसता 
हात  शिवशिवतात 
शिकाऱ्याचे चित्त मग 
साधना विसरतात ॥
शिकार मुळी नसते 
कधीसुद्धा ती शिकार 
मनाचा या मारेकरी
कुणा कसा कळणार ॥
कधी काम क्रोध मोह 
कधी मद व मत्सर 
अचानक येऊनिया 
नाचतात उरावर ॥
शिकारी होता शिकार 
उर्मी साऱ्या मिटतात 
चौहाटी पडते प्रेत 
गिधाडे विदारतात ॥
तुटताच धनुष्य ते 
म्हणुनि जाळून टाक 
शिवशिवताच हात 
दत्ताची करुणा भाक॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

ठरव तू


ठरव तू
*******

आशा निराशेचे सोडून वाहणे
तुझ्या दारी येणे केले देवा ॥१

आहे नाही भक्ती तूच सारे जाणे 
आम्ही तो पडणे तुझ्या दारी ॥२

सकाम निष्काम घडे आंदोलने 
तुझं जे करणे करी देवा ॥३

विक्रांता शोधणे हाती गवसले 
पुढचे पुढले ठरव तू  ॥४

तुझ्या चिंतनात किती सुख असे 
मन होय पिसे आनंदाने ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

नेई मज


नेई मज
******

दत्ताच्या ही आधी होता जिथे दत्त 
नेई मज तिथं गुरुनाथा ॥१

निर्गुणा नव्हता फुटला अंकुर 
आकारा आकार उमटला ॥२

कारणा कारण कळल्या वाचून 
असे अकारण सारे जिथे ॥३

तया त्या शून्याचा स्फोट होण्याआधी 
कोण कुठे होती कळो मज॥४

असेल धिंवसा मनी हा रे फुका 
जाणणे आणिका खेळ वृथा॥५

विक्रांत तटस्थ उघडून डोळा 
पोहचणे तळा घडेची ना ॥६


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

आरक्षण


आरक्षण
********
वाट जिची पाहिली मी सदा 
ती तूच जरी होतीस 
हाय पण किती उशिरा 
चुकल्या गाडीने आली होतीस 

हात अन हातात कुणाचा 
भलताच मिरवत होती
माझेही तसेच काही जरी
वेगळी दुनिया वाटत होती

बरे आता असू देत ग
पुन्हा येऊ नकोस अशी 
पुढच्या वाटा पुढची वस्ती 
थांब मज साठी जराशी 

आणिक तो चालक इथला 
बघ असे कुटील विनोदी 
देई अर्जी आधीच तयाला 
अन घेई आरक्षणाची तसदी
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

बीज


बीजपण हरवता
************
नसण्याचा अर्थ आता 
माझ्या असण्याला आहे 
असण्याचा भास काही 
तर दुसऱ्याला आहे 

जगणे हे व्यर्थ आहे 
असे कोणी म्हणतात 
जगण्यास सार्थ करा 
असे कोणी सांगतात 

माझ्यात हे जग सारे 
स्वप्न सत्य निद्रा भरे 
मीच माझी कळ आहे 
मीच माझे मूळ आहे 

सरणात देह जळे 
हा एक खेळ आहे 
विश्व दाटले माझ्यात
मी अनंत काळ आहे

बीजपण हरवता
वृक्ष वृक्षा गवसतो
आहेपण जाणवता
भास आभास मिटतो

 🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...