शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

तुपातल्या साखरेस


तुपातल्या साखरेस 

करायाचे असे काय 

विलोपन झाले तरी 
तिची गोडी कुठे जाय 

तैसी देवे देता मिठी 
माझे पण नाही होय 
चाखणाऱ्या कळे फक्त 
देवे केली काय सोय 

भक्ताविन देवा सुख 
भक्तीचे मिळत नाही 
भक्ता विन देवाचे ते 
देवपण उणे पाही

देवभक्त मिसळता 
माधुर्याला सीमा नसे
महासुख याहून रे
आणखी ते काय असे 

डब्यातील साखर ती 
चमच्यात ये बाहेर 
तुपामध्ये पडायला 
असे किती रे अधीर 

दत्त करी पण पिठी 
तिये पार भरडून 
एकत्वा नको कसर
जणू काही रे म्हणून


गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

देव खेळणे नसतो .

देव खेळणे नसतो .
************
कळ दाबता उठतो 
कळ दाबता बसतो 
आशीर्वाद ही देतो
देव खेळणे नसतो॥१

सर्वव्यापी सनातन 
विश्वाचा हरेक कण 
असुनिया निर्गुण 
लीलाधर तो सगुण॥२

देव गाभारी बसावा 
देव हृदयी धरावा 
मुळी नच रे हलावा
प्राणची तो  रे व्हावा॥३

देव स्वतःचं उठावा
भक्तासाठी रे धावावा
 कडकडून भेटावा
द्वैत भेद हा मिटावा॥४

कळ गूढ ती आतली
कुणा क्वचित कळली
खूण  खूणेनी  दिसली 
विद्या विक्रांता फळली॥५

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

मीच का ?

मीच का?

खिन्न वाटा जीवनाच्या 
मज सांभाळत नाही 
सावलीचे झाड कुठे 
मज सापडत नाही 

सोस जीवाला सुखाचा
गाठणे ते होत नाही
स्वप्न हाती येत नाही
चालणे थांबत नाही 

सरतोच दिन अन 
रात्र ती  राहत नाही 
पूर्णतेची आस माझी
पूर्णत्वास येत नाही 

दिले दान जीवनाने 
टाळता रे येत नाही 
मीच का रे मीच का रे ?
प्रश्न हे संपत नाही 

धुंडले अन बांधले 
चित्त साऱ्या सुखांनाही 
करूनिया लाख यत्न
गाठ का बसत नाही 

दिसतेच सुख जरी
बाजरी मांडले काही
असून खिशात दाम 
मज घेववत नाही


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘..

स्वामीमाय



स्वामीमाय
*******

कैसे स्वामीमाय तुम्हा म्या वर्णावे
आकाश मोजावे कैसे हाती ॥१

माझिया शब्दांचे इवले भांडार 
तुम्हा पायावर वाहियले ॥२

काय त्याचे मोल जरी ना जाणतो 
परी उधळतो वारंवार ॥३

मातीच्या भांड्यात मातीची व्यंजने
घेई कौतुकाने माय हाती ॥४

तैसी माझी बोल करावे स्वीकार 
तुम्ही कृपाकर मायबाप ॥५

विक्रांत वर्णाया जरी उताविळ 
स्वामीच केवळ वदवते॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘..

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

सुखाच्या गोष्टी

सुखाच्या गोष्टी
*************
हव्या सर्वकाळ  सुखाच्या या गोष्टी 
अस्तित्वाची स्मृती विसराया ॥१

कळल्या वाचून ओघळतो काळ 
विझतोच जाळ क्षणोक्षणी ॥२

अटळ अंताची  चाहूल मनात 
घडावा सुखांत तोही वाटे ॥३

अश्या या सुखाची  रोम रोमी उर्मी 
येतात उठूनी रात्रंदिनी॥४

घडणे ही खोटे सरणे ही खोटे 
नर्तन ते लाटे चाले सदा ॥५

मनाच्या या गोष्टी मना न कळती 
वारे घोंगावती दिन रात ॥६

उमटण्या आधी प्रतिमेचा अंत 
होय आरश्यात काय कधी ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

स्वामी पदी

श्रीस्वामीं पदी
**************

श्रीस्वामींच्या पदी
केली मी विनंती 
सदा देई भक्ती 
निष्कलंक ॥१
सांभाळ या भक्ता 
शरण जो आला
जाणून कीर्तीला
तुझ्या बापा ॥२
जाणतो जरी या
शब्दांच्या वाचून 
घेशी उचलून
निज दासा ॥३
पण काय करू
बोलल्या वाचून 
राहते ना मन 
तुज लागी ॥४
तुझिया कृपेला 
जरी पार नाही 
कळ थोडी तीही
 सोसवेना ॥ ५
विक्रांता स्वामींनी
पदरी घेतला 
आपलासा केला
धन्य झाला॥६


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२

पेलवेना


पेलवेना
******

तुटलेल्या वाटे चालणे ते कुडे
परी तेही घडे 
कुठल्या प्रारब्धे

तिथे दूरवर चांदणे सुंदर 
परी पंखावर 
ओझे हे मणाचे 

सावळे सुंदर स्वप्न डोळ्यावर 
परी ओठावर
उतरेना शब्द  

दत्त चालवतो म्हणून चालतो
अन्यथा घडतो 
एक कडेलोट

विक्रांता भक्तीची कृपाच देवाची
आजची उद्याची
सरू गेली चिंता

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...