रविवार, १७ एप्रिल, २०२२

साईनाथ

साईनाथ
****

जीर्ण देहावर 
जीर्ण प्रावरण 
चैतन्य किरण 
डोळीयात  ॥१

कृपेचा कुबेर 
दिनांचा आधार
व्याधी परिहार 
करी वैद्य ॥२

रामाचा फकीर 
एकत्वी पुकार
अल्लास साचार 
ओळखता  ॥३

दिव्य गुरूतत्व
धर्म देहातीत
जे वरदहस्त
सदा भक्ता ॥४

साई नामे ख्यात 
अखिल विश्वात  
जयाचा विक्रांत 
सदा भृत्य ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शनिवार, १६ एप्रिल, २०२२

वाडी दर्शन


वाडी दर्शन
********
वाडीचे पावन 
जाहले दर्शन 
चित्ती समाधान 
उजळले ॥१

गंध परिमळ 
दाटला चंदन 
सुखे तनमन 
पुलकित ॥२

घडे प्रदक्षिणा 
चित्ताने येथून 
पुण्यांची भरून 
गंगा आली ॥३

देई तुझे प्रेम 
दत्ता दयाघना 
नुठवी कामना 
अन्य काही ॥४

मनी भेटलासी 
तना भेट देई
चातकास होई 
चांदणे गा ॥५

विक्रांत न जाणे 
अन्य तुजविण
कृतार्थ जीवन 
झाले बापा ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

चैत्र

चैत्र
*****

चैत्र रंगाचा बहर
पानाफुलात नटला 
जीर्ण फांदीला खोडाला 
कैफ जीवनाचा आला ॥१
गेला ओघळून किती 
जीर्ण संभार पिवळा 
येण्या-जाण्याचा अनादि 
खेळ बंदिस्त चालला ॥२
रंग भरती डोळ्यात 
गंध दाटती मनात 
करी लगबग जाण्या 
ऊन सोनेरी दारात ॥३
स्वप्न जुनाट कोवळे 
हिरवी डहाळी होते 
कानी किलबिल तरी 
मनी विराणी जागते ॥४
धूळ परतीची उडे
मन पाऊल शोधते 
गंध दाटले काळोखी 
नभ निळे याद होते ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

तुझेपण

तुझेपण 
*********

तुझ्या नकळत
तू दिल्यास मला 
चार सुंदर कविता 
अगदी अलगद

ज्या आल्या कधी 
वार्‍याची 
मंद झुळूक होत
माझ्या मनात  
सुगंधाचे मुग्ध 
वरदान देत

त्या चार कवितांचे 
स्फुलिंग चेतवून
आलीस उमलून
नभातील टपोरी
चांदनी तू होवून 

माझ्या अंतरात 
मीच गेलो मग
गंधाळलेली 
एक रात्र होवून

जरी नव्हते 
नाव तुझे कधी
त्या कवितात
वा नव्हता संदर्भ
आडवळणाने
कुठल्या शब्दात

तू ही दाखवलेस 
तुला ते कधी
कळलेल नाही 
मी ही शब्दात
तुला ते कधी 
सांगितले नाही.

पण त्या कविता 
जगतांना 
अन तुला शब्दात 
पाहतांना 
कवी असण्याचे 
भाग्य मला कळले
तुझेपण 
माझ्यात फुलतांना 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

महामानव

महामानव
********

इथून तिथून इतिहास हा शोषणाचा आहे 
मी अन माझ्या वंशजांच्या सुखाचा आहे 

कधीतरी कोणी सांडून खुज्या स्वार्थाला 
राहतो उभा न्याय शोषितांना त्या द्यायला 

होतो विद्ध तो लढतांना शतवार या तिथे 
जळते ह्रदय त्याचे जणू वेदनांचे घर होते 

रक्तातून त्याच्या फुलतात लाख-लाख मळे 
धुत:कारले कालचे आज भोगतात सुख सोहळे

मार्टिन ल्युथर अब्राहम लिंकन फुले-आंबेडकर 
किती एक प्राण घेऊन लढले तळहातावर 

काय त्यांचे वंश आहे बसले कुण्या गादीवर 
काय त्यांची घरे आहेत महाल कुठे उंचावर 

ही गोष्ट वेगळी की कुणी करतात रे व्यापार 
घेऊन झेंडा त्यांचा उगा मिरवती खांद्यावर 

पुन:पुन्हा इतिहास होतो तो तसाच फिरून  शोषणारे येतात इथे पुन:पुन्हा नाव बदलून 

येतील महामानव जातील देवत्व मिळवून 
न जाणे खेळ हा पण कधी जाणार संपून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, १० एप्रिल, २०२२

राम संमत


राम संमत
*********

म्हणे राम राम 
कळल्या वाचून 
संतांच्या  स्मरून 
वचनास॥१

जाणतो मनात 
राम ठसा नाही 
दशदिशा पाही
दत्तमय ॥२

अनंत रंगात
सूर्याचा प्रकाश 
नटते आकाश
आकारांनी॥३

तशी सारी असे
तुझीच ती रूपे 
एका आड लपे
एक इथे ॥४

बहु केले प्रेम 
तुझ्या कथेवर 
तुझ्या भक्तांवर 
बळवंत ॥५

तयाच्या भक्तीचा 
मिळताच कण 
तुजला पाहीन 
तैसा रामा ॥६

तोवर विक्रांत 
म्हणे तुज दत्त 
हसून संमत 
होई  रामा ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

शोध कर्ता


शोधकर्ता
*******

हरवला माझ्यातून 
मीच तो
कुठे सापडेल आता  

हे ओझे जगण्याचे
दाटले
काय सांडवेल आता  

जाणतो अर्थ जरी 
कधी या 
जगण्याला नव्हता  

देऊनी पद प्रतिष्ठा 
त्यास मी 
दिवाणी मांडला होता  

प्रतिमेत त्या स्वतःच्या
जीव हा
प्रेमात पडला होता  

झालाच भंग शेवटी 
यत्न तो
व्यर्थ्यची गेला होता  

तुकडेच बांधले शेवटी 
अंती रे
उपाय काही नव्हता 

जगण्याला शोधतांना  
पडे हा
उघडाच शोधकर्ता  

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘




भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...