शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

गाणगापूर

 


गाणगापुरात

 **********


गाणगापुरात

नेई मला थेट 

धरुनिया बोट
दत्तात्रेया॥१

नेई रे संगमी 
आण बुडवुनि
पापे ती धुवुनि
झाली हाती॥२

नेई रे राउळी 
मोकळ्या अंगणी 
भक्तास भेटूनी
सुख होई ॥३

आणिक तुझिया
निर्गुण रूपास
पादुका द्वयास
पाहू दे रे 

होउ दे आरती 
उठो पडसाद
दत्त ह्रदयात 
गुंजो दे रे 

पालखीची धूळ 
लागावी कपाळी 
विक्रांत तिथली 
माती होवो 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

कहाणी

 

कहाणी
*******
एक आरंभ एक अंत 
असतोच प्रत्येक कहाणीला 
बहुधा सुरू होते 
कुठलीही कहाणी
उत्सुकतेने भरलेली 
स्वप्न सजलेली 
अपार अपेक्षांनी नटलेली 

ती पाने ते दिनरात 
किती भरभर उडून जातात 
सुखाची सकाळ 
सुखाची संध्याकाळ 
सुखात नाहते रात 

पण कहाणीच असते ती 
तशीच कशी राहणार 
काही पात्र बदलतात 
काही सोडून जातात 
काही नवीन येतात 
काही आपली मूळ 
भूमिका टाकून देतात
भलत्याच भूमिकेत घुसतात 

आणि मग सुरू होते 
एक टळटळीत दुपार 
तप्त न सरणारी
असह्य लाहीलाही करणारी 
ती वेळ

अन उगवते रात्रही
तशीच रुक्ष एकाकी 
पापणीस पापणी 
लागू न देणारी 

त्या नाटककाराला लेखकाला 
ही कुठली हौस असते कळत नाही 
प्रेमाच्या मैत्रीच्या वाटिकेत 
द्वेष असूया संशय हेवेदावे अन
शत्रुत्वाची बीज टाकून देतो तो

मग दोन रूळागत समांतर 
जीवन चालू राहते 
तर कधी खाली कोसळून पडते 

कहानीला रंजक करणे 
आणि मग मजा घेणे 
हे त्या लेखकाला 
फार फार आवडते 
हे नक्कीच 

सुखा कडून दुःखाकडे 
अन दु:खाकडून पुन्हा सुखाकडे 
जाणारी कहाणी
क्वचित असतेही कुणाची 
कोण्या आटपाट नगराच्या
धार्मिक राजाची 
किंवा व्रत आचरण करणार्‍या 
भोळ्या राणीची 
म्हणजे ती तशी 
बाहेरून दिसते तरी खरी 

बाकीच्या कहाण्या
कहाणीपण सार्थ करणाऱ्या 
झुरणाऱ्या तुटणाऱ्या 
तुटलेल्या कड्याशी येऊन 
थांबलेल्या खोळंबलेल्या 

कधी कधी बिघडलेल्या ओळीवर 
व्हाईटनर चे औषध लावत
स्वतःला खेचत 
जात असते की कहानी 
पुढे पुढे निरूपायाने

तर कधी 
फसलेल्या क्लायमॅक्सला 
भुतकाळात नेत 
संपलेल्या दिवसात 
राहते उगाच जगत 
ती कहाणी

तर सांगायचे होते 
प्रत्येक घराची एक कहाणी असते 
प्रत्येक मनाची एक कहाणी असते 
बहुदा पर्सनल डायरीगत 
कुलुप बंद असते 
पण कधीतरी कुणाची पाने सुटतात 
दाही दिशात पसरतात 
लोक ती धावून धावून वेचतात
अन  मजेने वाचतात
अन वाचतांना
मनोमन जाणत असतात
ही त्याचीच कहाणी आहे .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, ६ एप्रिल, २०२२

गोरखनाथ


गोरख नाथ
*********
गोरक्षाची भक्ती 
ध्यात असे चित्ती 
तशी व्हावी वृत्ती 
वाटे मज ॥१
गोरक्ष वैराग्य 
हृदयी उदावे 
जीवित हे व्हावे 
धन्य तैसे ॥२
गोरक्ष शिष्यत्व 
मनातच सजावे 
गुरु पदी व्हावे 
समर्पित ॥३
गोरक्षसा गुरु 
मिळावा जीवनी 
सार्थक कहाणी 
व्हावी माझी ॥४
विक्रांत नमितो 
नित्य गोरक्षास 
कृपा प्रसादास  
लाचावला ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

संसार

संसार 
**********

एकटे असा  वा दुकटे असा 
संसार कधीच संपत नसतो 
कवटाळून कधी दुःखाला 
जीव रडत बसत नसतो 

ती गेली की तो कोलमडतो 
चिमण्या हातास धरून 
पुन्हा उभा राहतो 
तो गेला की आभाळ फाटते 
पण सावरते सांभाळते 
ती विशाल वृक्ष बनते 
कारण आनंद 
हे जगण्याचे कारण असते 
तो नाकारणे यासारखे पाप नसते 

तो गेल्यावर तिने नटू नये 
छान सुंदर जगू नये 
हे कधीच मान्य करू नये 
पुरुषांचे दांभिक जग 
फारस मनावर घेऊ नये 

त्याचे तसे बरे असते 
त्याला दुसरी सहज मिळते 
तयारी असेल तर तिलाही 
दुकटे होणे शक्य होते 

अन ते तसे व्हावे ही 
पण गरज म्हणून नाही 
तडजोड म्हणूनही नाही 
तर आनंदाने युगल गीत 
गाता यावे म्हणून 
सुखाला आनंदाचा 
स्पर्श व्हावा म्हणून 

खरेतर एकटेपणात ही 
चांगले छान सुंदर जगता येते 
ध्येयाचे स्वप्नांचे हरवलेले पान 
पुन्हा उलगडता येते 

पण हा संसार 
करावाच लागतो 
जगात राहून वा वनात जाऊन 
एकटेपणाने व दुकटे होऊन 
हे मात्र विसरायचे नसते
अन आपण आपल्या 
आनंदाचे समायोजन 
जरूर करायचे असते.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

सोमवार, ४ एप्रिल, २०२२

हवे तर देई

हवे तर देई
********
हवे तर देई
जन्माचे दारभ्य 
परी तुझा दास्य 
सुटु नये ॥१

हवे तर देई 
रडणे अडणे 
दारी चे धरणे 
सुटू नये ॥२

हवे तर देई 
जगाची गुलामी 
लागे तंद्री नामी 
सुटू नये ॥३

हवे तर देई
देहास वेदना 
भक्तिची कामना
सुटू नये ॥४

हवे तर देई
कटू हेलनादी
संताची संगती 
सुटू नये ॥५

विक्रांत दत्ताच्या
मागतो चरणा 
देई दयाघना 
हेचि फक्त ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, ३ एप्रिल, २०२२

भाग्याचे लिखित

भाग्याचे लिखित
*************

तन सावळे सुंदर 
मन निळूले अंबर 
थेंब ओले पानावर 
तेसे डोळे पाणीदार ॥१

हसू पेरलेले ओठी 
भाळी रेशमाची दाटी 
चंद्र पुनवेचा जणू 
रोज येई धरेवर ॥२

सारे विरह जन्माचे 
जणू होतात क्षणाचे 
दृष्टी अवचित रूप 
येता सर्वांग सुंदर ॥३

चित्र असे हे कुठले 
खोल मनात बसले 
राधा भाग्याचे लिखित
कृष्ण जीव तिच्यावर॥४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शनिवार, २ एप्रिल, २०२२

अनुभूती



 अनुभूती 

*****

कशाला हव्यात
तुज अनुभूती 
सुक्ष्मातल्या गाठी 
स्थुळामध्ये 

भेटतील तया 
भेटू दे रे देव 
ज्याची त्याची ठेव
ज्याला त्याला 

कोणाला भेटते
माय नर्मदा ती
कोण ते पाहती
अश्वस्थामा 

कुणा हनुमंत 
भेटतात संत 
रामराया दत्त 
आणि कुणा 

ज्याचा त्याचा भाव 
ज्याचे त्याचे डोळे 
तेच तिथे फळे 
अन्य नाही 

विक्रांत कशाला 
वाचे तेच तेच 
चाल तू तुझाच
 पथ शांत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...