बुधवार, ३० मार्च, २०२२

आळंदीत

 

आळंदीत
********

चैतन्ये पिकला भक्तीने भारला 
वृक्ष हा थोरला आळंदीचा ॥
फांदी फांदीवर मोक्षाची वाहणी
कौतुक करणी माऊलीची ॥
उमटतो ठसा भक्त ह्रदयात 
ज्यांचे ह्रदगत  ज्ञानदेवी ॥
हरेक श्रांताला मिळतो विसावा 
सावलीत देवा तुझ्या इथे ॥
हवसे नवसे कितीक गवसे 
कोणी जात नसे रिक्त परी ॥
कळो वा न कळो घडते घडणे 
दिव्याने पेटणे दिव्यास त्या ॥
येऊन आळंदी विक्रांत हा धाला 
हृदयी ठेवला ज्ञानदेव ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

सोमवार, २८ मार्च, २०२२

दत्त रुजवतो

दत्त रुजवतो
**********

दत्त रुजवतो 
मनी माय मी 
दत्त रुजवतो ग  ॥ धृ॥

भजन पूजन 
ध्यान गायन 
रोज करतो ग 
दत्त रुजवतो ग ॥१

नापीक बरड
जरी जमीन ही 
रोज कसतो ग 
दत्त रुजवतो ग ॥२

 संत चरित्र 
 खत घालतो
 प्रेमे भरतो ग 
 दत्त रुजवतो ग ॥३
 
देह तापवून 
मन गुंतवून
तिफन धरतो ग 
दत्त रुजवतो ग ॥४

येईल पाऊस 
तया कृपेचा 
वाट पाहतो ग 
दत्त रुजवतो ग ॥५

विक्रांत मनी 
रोज गोड हे
स्वप्न सजवतो ग 
दत्त रुजवतो ग ॥६


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

रविवार, २७ मार्च, २०२२

घेई सांभाळून


घेई सांभाळून
***********
आम्हावर रुसे 
आम्हा नच पुसे
मग सांग काय कसे 
करू दत्ता ॥१

जाहलो  चाकर 
पडे पायावर 
भार तुझ्यावर 
टाकला मी॥२

काय भक्तीविन 
झाले हे जीवन
सरे कृपे विन 
मग असे ॥३

काय अवघे ते 
असे देवा खोटे  
नाटक वाटते 
भक्तीचे रे ॥४

पोपट प्रेमाने 
वेश्या स्वर्गी गेली 
मुक्ती अजामेळी
पुत्र मोहे ॥५

काय मी त्याहून 
असे हीन दीन 
तुज दयाघान 
अंतरलो॥६

विक्रांत येवुनि
करी विनवनी
घेई सांभाळुनि
चुक माझी ॥७


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

 

अवेळी पाऊस

अवेळी पाऊस
************
पडे अवेळी पाऊस 
मन तरारले तरी 
चाले हौदोस वाऱ्याचा 
सुखे निवलो अंतरी ॥

फटफटली पहाट 
गाली काजळ ओघळ
विश्व अस्ताव्यस्त सारे 
तृप्त सोनेरी सकाळ. ॥
 
काही गेले हरवले 
काही शोधले मिळाले 
काही सजले घडले 
नभ अंगणी निजले ॥
 
कधी देणाराही घेतो 
हक्क भांडून मागतो 
कधी मिठीत चिडतो 
दूर काळजा भिडतो ॥

ताल सरीचा तरंग
गीत उमटते उरी
सय सखीची एकांती 
फेर पुनःपुन्हा धरी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.


शनिवार, २६ मार्च, २०२२

डॉ वर्तक बोध

डॉ.वर्तक बोध
***********

शस्त्र त्याग होता
आक्रांत धावती
देशाला लुटती 
अनायासे॥

तुटते आसन 
होतो अपमान 
अब्रू धुळदान
होत जाते ॥

मग या देशात
सुख ते कुठले
मातीत लोटले
कमावले ॥

अहो शस्त्रावीन
शांती न नांदते
कथा ही दिसते
जगतात .॥

रामकृष्ण शस्त्र
घेवून लढले 
परशुरामे केले
तेच कार्य .॥

वधावे राक्षस
क्षत्रिय तामस
रक्षावे धर्मास
पुन:पुन: ॥

परी किती वेळा 
देवा साद द्यावी 
का न तू करावी 
सोय तुझी ॥

क्षमा दुर्जनास?
ठेव गुंडाळून 
शस्त्र परजून 
उभा रहा ॥

सांगे विनायक 
कितीदा तुजला 
काय रे कानाला 
भोक पडे ॥ 

विक्रांता भेटले 
डॉक्टर वर्तक 
दाविले प्रत्येक 
मर्म स्पष्ट ॥ 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

क्षणिक

क्षणिक

*******

आता माझा जीव

पडून राहते 

माझ्या जाणीवेत

मनाच्या तळ्यात
जगण्याचे स्वप्न
राहतो निहाळत ॥

सुखाच्या लहरी
दुःखाचे बुडबुडे
येतच राहतात

मोहाचे भोवरे
क्रोधाचे प्रपात
दिसत असतात ॥

कधी वाहणे होते
कधी अडणे होते
कधी पाहणे होते

त्या प्रतिबिंबातून 

बिंबाचा वेध घेत

नकळत हरवत जाते

तेव्हा असते ती
क्षणिक मुग्धता 
अनंत शुन्यात हरवली

अगदी अव्यवहारी
बिन पगारी
विना दुनियादारी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘.

गुरुवार, २४ मार्च, २०२२

कवितेचे कारण

कवितेचे कारण 
***********
जर मी लिहली प्रेम कविता 
ते म्हणतात 
प्रेमात पडलास की काय ?

जर मी लिहली भक्तिगीत 
ते म्हणतात 
साधू झालास की काय ?

जर मी लिहले देश धर्मावर 
ते म्हणतात 
कट्टर झालास की काय ?

कविता फक्त कविता असते
हे खराय त्यात
माणसाचे मन  उतरते !

जर मी प्रेमी नसेल 
भक्त नसेल 
तर कविता कशी लिहेल ! 

तर तुम्ही खुशाल समजा 
मी आज साधू झालो
मी आज प्रेमात पडलो

पण कवितेवरून 
कवितेचे कारण शोधणे
याहून हास्यास्पद काही नसते !


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.




झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...