रविवार, २९ डिसेंबर, २०२४

तन्वीस

तन्वीस
******
सुखे सारी तुजसाठी
यावी आकाश होऊन 
निळी कुसुंबी सोनेरी 
सहा ऋतूत सजून 

कधी सावळ्या मेघांनी 
तुज घ्यावे लपेटून 
ओल सौख्याची मृदुल
तुज जावी भिजवून 

कधी शरद किरणे 
तू गं घ्यावीत ओढून 
तुझ्या हास्यात चंदेरी 
जग जावे उजळून 

शुभ्र अभ्रांचा पसारा 
तुझ्या पदाला विसावा 
तुझ्या पाऊला कधी 
स्पर्श काट्यांचा न व्हावा 

लाखो तारकांनी तुज 
घेण्या आर्जव करावी 
तुझ्या प्रेमाने भरून 
आकाशगंगा वहावी 

नाती निर्मळ प्रेमळ
तुझी सजावी धजावी 
तुझ्या कोमल करांनी 
धरा मिठीत तू घ्यावी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

आधार

आधार
********

भिजल्या प्रश्नास कोरडे उत्तर 
ते ही बरोबर हवे कुणा ॥

रुजलेले बीज शुष्क माळावर 
किती जगणार कोणा कळे ॥

थकलेला देह यशाच्या शिखरी
वयाच्या उतारी किती काळ ॥

रोज नवी दिशा वाट नवी फुटे 
सरती संकटे काय कधी ॥

उतारी वाहतो प्रवाह पतित 
चाले हुडकीत सुख कुठे ॥

अवघे बुडती प्रश्नांच्या भोवरी 
शोधती आधारी सत्य काही ॥

घडो पुरुषार्थ जन्म जगण्याचा 
अर्थ कळण्याचा खुंटलेला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

ओझे

ओझे
****
वाहिले रे ओझे 
दिलेस तू दत्ता 
वाहवेना आता 
पुरे झाले ॥१

तुझे तूच सारे
घेई रे परत 
मज भगवंत
ठेव पायी ॥२

हिंडलो बहुत 
उबले जीवित
तुझिया मिठीत
पडो देह ॥३

इथे काही अर्थ
दिसेना मजला 
निरर्थ चालला 
प्रवास हा ॥४

दत्ता दयाघना
येई रे धावून 
जाई रे घेऊन 
मजलागी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

अलख

अलख
******
जन्म असा ओढाओढ 
पायावरी आले फोड 
तर मग काय झाले 
दत्त वैद्य सवे गोड ॥१

मळलेल्या जीवनाचे 
ओझे तेच वाहायचे  
परी मनी घंटा वाजे 
धूप गंध गाणं गाजे ॥२

प्रारब्धाची काठी पाठी
उकळते शब्द ओठी 
परी मनी स्वप्न सजे 
दत्त धन दिसे गाठी ॥३

कोण ओढे कुणास ते 
चालणारा चाले वाटे
ज्योत निरंजन पुढे
अलख पुकार दाटे  ॥४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.blogspot 
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

व्यवहार


व्यवहार
*******
नको हा  व्यवहार 
वाटतो संसार 
परी खांद्यावर 
भार आहे ॥१
कळेना मज का
हा जन्म चालला 
अर्थ हरवला 
इथे असा ॥२
हातात येऊन
जाते हरवून 
सुख वेडावून
पुन्हा पुन्हा ॥३
अन उरलेले 
बळ जगण्याचे
वदे करुणेचे 
शब्द सुने ॥४
गमे मजला रे
जड झाले ओझे
जन्म जीवनाचे 
भक्तीविना ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

पुणे शहर


पुणे शहर
*******
सरले मिटले काल पुजियले 
माथी मिरवले मातब्बर ॥
जुनाट वाड्यांच्या काल झाल्या चाळी 
इमारत ओळी आज उभ्या ॥
नाव गाव गेले बखरी लिहिले 
पराक्रमी झाले कारकून ॥
कुणाच्या रक्ताने कोण राजे झाले 
ऐश्वर्ये वाढले होते कोण ॥
अजून चालती फुटलेली नाणी
कुण्या पूर्वजांनी वेचलेली ॥
चार गुंठियाचे चार कोट झाले 
पूर्वज पावले अनेकांना ॥
चाले गजबज पुराण शहरी 
शेजारी पाजारी हरवले ॥
काळाची पाऊले कुणाला कळती
घडती मोडती किती जग ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

मागणे

मागणे
*****
आता माझे हे एकच मागणे
दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥

हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त 
स्पर्शात दृष्टीत भरावा तोच ॥

देहाची या माती पडो तया पदी
अन्य काही गती नको मुळी ॥

तयाच्या प्रीतीस व्हावे मी उत्तीर्ण 
सार्थक जीवन होऊनिया ॥

विक्रांत लाजतो देह हा वाहतो 
उदास जगतो दत्ता विन ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
 kavitesathikavita. .   
☘☘☘☘ 🕉️ 

तन्वीस

तन्वीस ****** सुखे सारी तुजसाठी यावी आकाश होऊन  निळी कुसुंबी सोनेरी  सहा ऋतूत सजून  कधी सावळ्या मेघांनी  तुज घ्यावे लपेटून  ओल स...