शुक्रवार, ४ मार्च, २०२२

झाड होणे

झाड होणे
*****
स्वप्नांच्या पलीकडे 
आता मी आलो आहे 
पण मन 
अजूनही तिथेच आहे 
स्वप्नात अडकलेले  

स्वप्न मी सोडली 
असेही म्हणू शकत नाही 
पण गळत असते पान
झाड रोखू शकत नाही  

त्या असंख्य 
जीर्ण पानांचा खच 
सभोवताली पडला आहे  
ना परतीच्या वाटेने 
आता बहर निघून गेला आहे  

आषाढाचे स्पर्श काही 
काळजामध्ये झरत आहे  
चैत्राचे डंख काही 
कणोकणी डसत आहे

 ते पाणवठ्या कडे जाणारे 
अन् पाण्यात भिजून येणारे पाय 
इकडे वळतात की काय  
मनी भ्रम दाटत आहे

हे झाड असणे 
फार वाईट असते
कारण त्याला सुखाने 
मरता येत नाही
हे अंकुरायचे स्वप्न
वठणार्‍या फांदीचे
कधीच जळत नाही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘




बुधवार, २ मार्च, २०२२

तुझे गाणे

तुझे गाणे
*******
मुरडल्या ओठातून 
गाली येई थोडे हसू 
काजळात दडलेले 
दिसे पण कुणा आसू ॥

हसण्याचा सोस खोटा
जीवा लावू नको असा 
उधळून देई जन्म 
सावरी कापूस जसा ॥

वाऱ्यावरी उडायाचे 
अंग होतं आभाळाचे 
उबदार ओलाव्यात 
हळूहळू रुजायाचे ॥

उडण्यात मजा आहे 
रुजण्यात मजा आहे 
नाही त्यात पडण्यात 
खरोखर सजा आहे ॥

बांधुनिया तनमन 
गाणे कसे खुलणार 
उसन्या त्या स्वरावर 
भाव कसे फुलणार॥

तुझे गाणे गा तू आता
येऊनिया छतावर 
गुलाबाचे हासू मग 
कुर्बान ते तुझ्यावर ॥ 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘३३०

मंगळवार, १ मार्च, २०२२

दत्तावाचून


दत्तावाचून
********

दत्तावाचून जीवन 
ते रे कसले जीवन ॥

दत्तावाचून जीवन 
आड पाणियावाचून 
काय अर्थ त्या खणून
श्रम फुकट जावून॥

दत्ता वाचून जीवन 
वृक्ष फळल्या वाचून 
येणे कशाला रुजून 
भार भूमीचा होऊन ॥

दत्ता वाचून जीवन 
पाणी सागर भरून 
तृष्णा कंठात घेऊन 
जळी जिणे थेंबाविन ॥

दत्ता वाचून जीवन 
बरे त्याहून मरण 
देहा कशाला वाहून
जावे सजीव होऊन ॥

दत्ता वाचून जीवन 
जाते व्यर्थ रे संपूर्ण 
जगा सोडून विक्रांत
जातो दत्ताला शरण ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘२४७

स्वीकार

मन गुंतले रे
तन गुंतले रे
क्षण गुंतले रे
हे तुझ्यात ॥
नीज नाही रे 
जाग नाही रे 
स्वप्न पाही रे 
रात्रंदिन ॥
जग हासते 
नाव ठेवते 
मज टोचते 
उगाचच ॥
जरी कळते 
मन लाजते 
नच राहते 
परी आत ॥
कशी येऊ मी 
तुझं पाहून मी 
प्रीत देऊ मी 
राजसा रे ॥
तुज कळेल का 
मन वळेल का 
प्रीत दिसेल का 
डोळीयात ॥
देई होकार 
सर्व आधार 
करी स्वीकार 
प्राण प्रिया ॥

३२५

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

भोवरा

मनाचा भोवरा 
***********
मनाचा भोवरा 
फिरे गरगर 
एका अक्षावर 
जाणिवेच्या ॥ 

कळते वर्तुळ 
स्थिर ते चपळ 
असतो केवळ
भास जरी 

नसलेले मन 
असले होऊन 
घडते जीवन 
गमे ऐसे 

कुणाच्या हातात 
भवर्‍याची दोरी 
कोण घरोघरी 
खेळतोय

इथे हे कळता  
सरे सारी चिंता 
राहितो फिरता 
गरगर

विक्रांत पाहतो 
अवघे फिरता 
अन फिरवता 
अंतर्यामी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘२३५

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

ते जग


ते जग
*****

इथे जिंकणे 
फारच सोपे असते 
इथे हरणे 
नेहमी अवघड असते 

 अन इथे
जिंकणारा काय 
खरोखरच 
जिंकत असतो ?


सारे काही हरवून 
कुणी दिवाना 
झेंडा जगण्याचा उंच 
मिरवत असतो !

म्हटले तर सोपे असते 
म्हटले तर अवघड असते  
ते जग खरोखर
वेगळे असते

तिथली समीकरणे 
कोडे भरलेली असती
अन कुणासही ती
कधीही सुटत नसती 

ते जग आलेच
जर कधी सामोरी
डोळ्यात भरून स्वप्न 
पाहावीत रुपेरी 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

मित्र भेटी

मित्र भेटी
********

कारण काही नसते 
तरी भटकत येतो
उगाचच काही गप्पा 
नि गोष्टी करून जातो

मित्रांना भेटायला का 
कारण काही लागते 
जीवलग दिसायला 
गरज कसली असते

खरतर नात्यातले
इथे कोणीच नसते 
देणे घेणे व्यवहारी
काही काहीच नसते

सुख दुःख तयासवे
काही वाटली जातात
मनातील भार काही
सल निघून जातात

ते ऋण त्यांचे हवेसे
कधी फिटत नसते
दिवसोंदिवस मनी
सदा वाढावे वाटते 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

आसावरी ताई श्रद्धांजली

रंग *** ( आसावरीताई काकडे ) रंग रेषा आणि शब्द  यात जीवा गुंतवूनी  एक निर्मळ आयुष्य  जगली ती मनस्विनी  खिडकीतील इवली तीच फुले आणि...