सोमवार, २४ जानेवारी, २०२२

रागावल्या नंतर

रागावल्यानंतर
***********

काहीसे तुटक दुखावले आत
होते शब्द रुष्ट तुझिया ओठात ॥

ठेवीन तुजला सदा आनंदात 
जरी ठरविले होते मी मनात ॥

काय करू पण चुकलेच कुठे 
अनवधानाने जशी काच तुटे ॥

पण त्या चुकीत नसे प्रतारणा 
दुराव्यात काय मिटतात खुणा ॥

मग भेटलीस पुन्हा एकवार 
फुलला मोहर धुंद मनावर ॥

हरखल्या जीवी गुंजे तव नाव 
डोळ्यात उमटे तोच प्रेमभाव ॥

सोडना गं सखी खोटा राग आता
देई पुन्हा तव हात माझ्या हाता ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, २३ जानेवारी, २०२२

पडदा

पडदा
******
भक्तीच्या सुखात 
द्वैते सुखावतो
दत्ताला पाहतो 
दुजेपणी ॥

कोणअसे दत्त 
कोण असे भक्त 
जरी ना जाणत 
अंतर ते ॥

पापा सवे गेले
सारे माझे पुण्य
मनी नाही अन्य
तया वीन ॥

घडेल हे जीने 
लिहिल मी गाणे
हसणे रडणे 
दिसेल रे॥

पडद्याचे भान
परी पडद्याला 
लागले यायला 
दत्त कृपे ॥

विक्रांत नावाची
चालली लहर
पाणी पाण्यावर 
आरूढले॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

अनंत


अनंत
********

दूरचे आकाश 
दूरचा प्रकाश 
मज जगण्यास 
आकारते॥

तया आकाशाचे
कोण रे आकाश 
प्रकाशा प्रकाश 
कोण देते ॥

मातीतून कण
येती उगवून 
करती पोषण 
देहाचे या ॥

मातीत सृजन 
करत जीवन 
एक एका विन
कामी न ये ॥

अशी विलक्षण 
सृष्टीची ही रचून
असतो भरून 
कोण इथे ॥

विक्रांत निशब्द
पाहून अनंत 
जोडतसे हात 
आपोआप ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


घोट आसवांचे.

घोट
*****

घोट मी घेतो आसवांचे 
बोल मी हे ऐकतो कुणाचे 
खरोखर मज हसू येते 
काय हे रे कौतुक स्वतःचे 

करती जे प्रदर्शन दुःखाचे 
त्यात महत्त्व नसते तयाचे 
"मी" भोगले रे दुःख एवढे 
छूपे दर्शन घडते याचे 

घोट घोट प्यायला इथे 
आसू काय लिम्का असे 
अन काढा पाटणकरांचा 
गोष्ट घोट घोटा ची नसे 

घोट घोट उगाळीत कुणी 
दुःख जेव्हा सांगू लागतो 
करा बहाना घाला चपला
मित्रत्वाने तुम्हास सांगतो 

त्या साल्याचा इगो फुगतो 
अन् ताप आपल्याला होतो 
अरे त्याहून बरा असे तो  
दुःखाला जो शिव्या देतो 

सुख हवे तुज दुःख नको 
असे कधीच होत नसते
एका घोटात दुःख प्यायचे
पुन्हा उभे राहायचे असते 

आणिक जे सिनिक रुग्ण
ज्याना रडणे हवे असते 
त्यांना त्यांच्या मुर्खपणात 
सरळ सोडून द्यायचे असते 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

तुज सांगतो

तुज सांगतो
*********

तुला शोधतो मी 
तुला पाहतो मी
जगण्यास काही 
अर्थ मागतो मी

रागावू नकोस 
माझ्या वागण्याला  
पुन्हा म्लान फुले
तुला वाहतो मी 

तुझी अभिलाषा 
बाळगे उरात 
रात्रं दिन स्वप्न 
एक पाहतो मी 

तुझे डोकावणे 
जीवनात माझ्या 
किती मुग्ध होते
आता जाणतो मी 

जाता हरवून 
पुन्हा त्या काजळी
कितीदा मलाच 
खूप कोसतो मी 

स्मृतिविन तुझ्या 
न गेला  दिवस 
क्षणात त्या किती
जन्म जगतो मी 

स्वागतास तुझ्या
पापण्यांचे पथ
अंथरून जीव 
उभा ठाकतो मी

येशी जर आता 
सांभळीन जीवी
रहा ह्रदयात
तुज सांगतो मी 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .







गुरुवार, २० जानेवारी, २०२२

गूढ ध्वनी

गूढ ध्वनी
*******
पुन्हा पुन्हा मन त्याच गर्द वनी 
जाते ऐकायला तोच गूढ ध्वनी ॥
तीच रम्य वाट अजून खुणावे 
कोणी जरी नाही वाटते थांबावे ॥
कुणीतरी कधी डोकावेल उगा 
वेळूतील वेडा सांगतसे भुंगा ॥
येईल येईल म्हणती पाखरे 
दिवसाचे स्वप्न असते साजरे ॥
ओघळती फुले घेण्या उचलून 
पाती गवताची येती मोहरून ॥
स्मृतीतला गंध येई मनातून 
स्पर्शाचे पालव देहाला फुटून ॥
शारद सुंदर पुनव  कालची 
उलटता पक्ष नसते आजची ॥
मिटता पापणी डोळी अवतरे 
नसलेले जग दिसे खरेखुरे ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

कैसे

कैसे
****

कैसे तुझे गावे
गुण दयाघना 
मज पेलवेना 
बोलणेही ॥१

कैसे तुज ध्यावे 
अपरा अनंता 
इवली या चित्ता 
आवरून ॥२

कैसी तुझी भक्ती 
करू भगवंत
नाहीस विभक्त 
आकळून ॥३

काय तुज देऊ 
जगत हे तुझे 
म्हणून या माझे 
प्रेम घेई ॥४

विक्रांत विकारी 
आला तुझ्या दारी 
सांभाळी सावरी
दत्तात्रेया॥५

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...