मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

ॐ कार गणेस

ॐ कार गणेश
***********

विश्वाचे हे बीज 
असे निराकार 
म्हणती ॐकार 
ऋषि तया  ॥

तयाने घेतले 
रूप हे साजरे 
गणेश गोजीरे 
प्रेमापायी ॥

प्रतिभा साकार 
प्रज्ञा अवतार 
सखा ज्ञानेश्वर 
तया वर्णी ॥

त्रिविध मात्रांनी 
जाहला ॐकार 
अ उ म हे स्वर
मिळूनिया ॥

अकार जणू की 
गणेश पावुले 
सुंदर सोनुले
शोभतात ॥

उकार जणू की 
गणेश उदर 
सुखाचा सागर 
मिरवता ॥

आणिक मकार 
मस्तक अपार 
वर्तुळ आकार 
विश्वव्यापी ॥

ययांनी येऊन 
ॐ कार होऊन 
टाकले व्यापून 
शब्दब्रह्म ॥

म्हणूनिया आद्य 
विश्वाचा या कोंब 
जाहला हेरंब 
सगुणात ॥

शोधता विक्रांत 
जन्माचे कारण 
देव गजानन 
दृश्य झाला ॥

जाताच शरण 
अभय देऊन 
दिले उघडून
मुलाधारा ॥

सुटता आधार 
रूपाचा गुणाचा 
देव गणेशाचा 
बोध झाला ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

साहेब

साहेब
*****

केबीनमध्ये तुकडे मोडीत 
साहेब बसतो आकडेमोडीत 
तीच भाजी त्याच डब्यात 
हिरव्या नोटा पाही मनात 

बेसीन झाली पिकदानीगत 
उद्दाम भाव बनेल डोळ्यात 
आज जरासे कमीच पडले 
जळे काहीशी खंत मनात 

तसा सराईत बक्कळ धूर्त 
सावज हेरतो येताच आत 
हळूहळू मग जाळे टाकीत
ड्रावरपाशीच नेई ओढत

बधला नाही जर का पक्ष 
घालवून देई बिनदिक्कत 
बेपर्वा अन् मुजोर भाषेत 
कर्तव्याचा पण पाढा वाचत 

कैसा सापास चंदन कळतो 
निषाध हाती सज्जन पडतो 
किती युगांचे राज्य रावणी 
कधीतरी मग राम जन्मतो

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

मनातील आशा


आशा
****:

मनातील आशा का
कधीच मरत नाही 
जळले सुख तरीही 
प्रतिक्षा मरत नाही 

वाहून गेले पाणी जे 
परतून येत नाही 
हरवून गेले पथ ते 
परत भेटत नाही 

ओसाड गेही पथिक 
आसरा मागत नाही 
गिधी विदारले प्रेत 
आक्रोश करीत नाही 

आले मनी म्हणून मी 
कविता लिहित नाही 
वेदने विना विक्रांत 
शब्द उमटत नाही 

दु:ख कुठल्या जन्माचे 
कधीच कळत नाही
प्राक्तनात लिहले ते
कधीच मिटत नाही

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

वेळापत्रक

वेळा पत्रक 
********

दत्त हसवतो 
दत्त रडवतो 
दत्त खेळवतो 
सुख दु:खी ॥

जन्म हा चुकला 
काळ रे हुकला 
तिमिरी पडला 
जरी वाटे ॥

जुनाट संस्कार 
कर्मठ आचार 
काही मनावर 
अगम्यसे ॥

तू न इथला 
कळते तुजला 
दावणी बांधला 
प्रारब्धाने ॥

परी भोग रे
दिन मोज रे
जन्म जग रे
वाट्या आला ॥

किती काळ कैसे 
जगावे हे ऐसे 
दत्ता ठाव असे 
वेळापत्रक ॥

दत्ता आठवून 
सारे सोपवून 
पार जन्मातून 
हो विक्रांत  ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

क्षणभर भेट व्हावी

भेट व्हावी
*******

क्षणभर भेट व्हावी दत्ता 
 तव क्षणभर भेट व्हावी रे 
तुझ्यावाचून जगण्याची 
या व्यथा मिटून जावी रे ॥

बहू पाहिल्या मूर्ती तुझ्या 
सुंदर मंदिरी सजल्या रे 
अन पादुका उंच शिखरी 
ऊर्जा वलय ल्याइल्या रे 

शैशवात तुज पाहिले 
काही कळल्या वाचून रे 
निद्रा जाग सीमेवर तू 
पाहिलेस मज हसून रे  

तसेच मुग्ध सुंदर दिसावे 
रूप मनोहर डोळ्यास रे 
विरहाची ही रात्र मिटावी 
दिनकर हो तू हृदयास रे 

त्या क्षणाची वाट पाहत 
उभा कधीचा विक्रांत रे 
सरो वेदना अवधूता ही
घे सामावून तुझ्यात रे

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

लळा

लळा
*****:

आळंदीचा राजा 
ज्ञानदेव माझा 
भक्ताचिया काजा 
आतुडला ॥

घनदाट ऊर्जा 
तिथे एकवटे 
पाप खरकटे 
धुऊ जाय ॥

पावन ती गंगा 
ज्ञानाची भक्तीची 
पेलत्या शक्तीची 
घेणाऱ्याच्या ॥

आस्तिक-नास्तिक 
नाही भेदभाव 
जसा सूर्यदेव 
जगताशी ॥

पापी पुण्यवान 
होतात पावन 
परिसस्पर्शान 
तेथीच्या रे ॥

विक्रांता अवघे 
पुण्य आले फळा 
म्हणूनिया लळा
माऊलीचा ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

Preference


Preference
**********

She prefered 24 carat Gold.
It's nothing but obvious,
gold gives stability,
gold gives security,
and of course, surety.
Of the future life.

What else one would like to have?
But then, what about flowers?
Oh flowers !
One can buy them lots,
if one has gold in hand.
And one can also live without flowers.

It's leisure 
It's pleasure 
but not absolute need.
Isn't it ?
So her choice is perfect !
Bravo .
She is gem 
really intelligent .
As life is hunger 
Life is money 
Life is Gold .

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .





झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...