मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

ॐ कार गणेस

ॐ कार गणेश
***********

विश्वाचे हे बीज 
असे निराकार 
म्हणती ॐकार 
ऋषि तया  ॥

तयाने घेतले 
रूप हे साजरे 
गणेश गोजीरे 
प्रेमापायी ॥

प्रतिभा साकार 
प्रज्ञा अवतार 
सखा ज्ञानेश्वर 
तया वर्णी ॥

त्रिविध मात्रांनी 
जाहला ॐकार 
अ उ म हे स्वर
मिळूनिया ॥

अकार जणू की 
गणेश पावुले 
सुंदर सोनुले
शोभतात ॥

उकार जणू की 
गणेश उदर 
सुखाचा सागर 
मिरवता ॥

आणिक मकार 
मस्तक अपार 
वर्तुळ आकार 
विश्वव्यापी ॥

ययांनी येऊन 
ॐ कार होऊन 
टाकले व्यापून 
शब्दब्रह्म ॥

म्हणूनिया आद्य 
विश्वाचा या कोंब 
जाहला हेरंब 
सगुणात ॥

शोधता विक्रांत 
जन्माचे कारण 
देव गजानन 
दृश्य झाला ॥

जाताच शरण 
अभय देऊन 
दिले उघडून
मुलाधारा ॥

सुटता आधार 
रूपाचा गुणाचा 
देव गणेशाचा 
बोध झाला ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...