सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

वादळ पाऊस

 

वादळ पाऊस
**********
रात्र आषाढी व्याकुळ 
वारा घोंगावे भेसूर 
पाणी वेढुन शहर 
जीवी उठले काहूर 

वाटा बुडाल्या जलात 
काय वाहते तयात 
रपरपतो पाऊस 
नाद गाजतो कानात 

थंड गारवा हवेत 
पक्षी घुसती छतात 
कुठे करूण आरोळ्या 
श्वान मारे आडोशात 

पाणी चढते पायरी 
चिंता सार्‍यांच्या नयनी 
दिवा लावून देव्हारी 
माय राहते बसुनी 

मोठी सरारते वीज 
लख्ख उजेड पाण्यात 
मग मेघांचा आकांत 
दणदणाणे जगात 

वृक्ष आकार भासती 
दैत्य बसले दडून 
देह वाहती विंधले 
फांद्या पडल्या तुटून 

असे पाहता पाहता 
निज घेई गवसून 
स्वप्न पाण्याचीच सारी 
लोंढा विक्राळ होऊन 

पाणी नसून श्वासात 
श्वास गुदमरणे आत 
धडपडून उठता 
जन्म दुसऱ्या जगात

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...