गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

काळाचा काळोख


काळाचा काळोख
**************

काळाचा काळोख 
खोलवर आत
गर्द विवरात 
अथांगसा ॥

तिथे न प्रकाश 
आकार आकाश
गूढ अवकाश 
अनिर्बंध ॥

सारी हालचाल
चाले वरवर 
लाट लाटेवर 
उमटते ॥

फेन बुडबुडे 
लोभस तरंग 
तयावरी रंग 
जीवनाचे ॥

अवघे सुंदर 
अवघे भीषण 
जीवन मरण 
चाललेले॥

अतळ जळाचा 
घेण्या जावा ठाव 
हाती येतो गाव 
क्लेशाचाच ॥

घेई रे हलके
ओंजळीत पाणी
जातसे वाहूनी
अर्धे जरी ॥ 

तेवढेच तुझे
तुजलागी पुरे 
अर्ध्यांलागी अरे 
वाहण्यास ॥

ओंजळीत पाणी
सागरात पाणी 
वेगळी कहाणी 
जीवा नाही॥

विक्रांत क्षणात 
जगतो जागून
गेली हरवून 
काळव्यथा ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...