********
गाठ रेशमी मृदुल
कधी बसती जन्मास
कोण मारते न कळे
भाग्य येवून भरास
गाठ सुखावते मना
द्वैत सुखावे भावना
गाठी मागून ये गाठ
गोड वाटते बंधना
गाठ आवडे जयास
नच काहीच सायास
वाटे नशिब फळले
पुण्य आले उदयास
कुण्या करंट्या जीवास
गाठी लागतात टोचू
बंध लागले मनास
उगा लागतात जाचू
गाठी सुटण्या सोडण्या
जन्म उताविळ होतो
फेरा चौर्यांशीचा डोळा
त्याचा सतत पाहतो
गाठ सोडता तोडता
जन्म होतो एक गुंता
सुखा उबगतो जीव
उरी बांधुनिया खंता
वाही मनात विक्रांत
काही काचणार्या गाठी
काही सुटल्या तुटल्या
काही गाणी झाल्या ओठी
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा